महागाईचा ‘शाकाहारी’ झटका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> प्रा. सुभाष बागल

ग्रामीण भागात स्वस्ताई व शहरी भागात महागाई असते, असा सर्वसाधारण समज आहे, परंतु तो खोटा ठरतोय. कारण ग्रामीण भागातील दर 7.02, तर शहरातील 6.59 टक्के आहे. खेडय़ाचे स्वावलंबन हरवल्याचे हे निदर्शक म्हणावे लागेल. महागाई आहार पद्धती निरपेक्ष असते असाही एक साधारण समज आहे, परंतु महागाईच्या दराने शाकाहारी, मांसाहारी थाळीत फरक करून बुचकळय़ात टाकले आहे. जुलैच्या तुलनेत ऑगस्टमधील शाकाहारी थाळीचा खर्च 25 टक्क्यांनी, तर मांसाहारीचा 13 टक्क्यांनी अधिक होता.

महागाईची नवलाई आता उरलेली नाही हे खरे असले तरी तिचे काही पदर उलगडणे आणखी बाकी आहे, जे तिच्या नियंत्रणाच्या धोरणात्मक आखणीसाठी उपयुक्त ठरू शकतात. कोरोना आणि त्यानंतरच्या रशिया-युव्रेन युद्धाने जगाची आर्थिक घडी विस्कटली आहे. महागाईच्या रूपाने तिचा कमी-अधिक फटका सर्वच देशांना बसतोय. देशपरत्वे तिचा दर भिन्न आहे इतकेच. भारतात 6.8 टक्के दर (ऑगस्ट) असला तरी तुकाa 48, ब्रिटन 6.9, इटली 6.3, अमेरिका 3.2 व दक्षिण कोरियात 2.3 टक्के आहे. साधारणतः आर्थिक व्यवस्थापनाची बूज राखणाऱया देशात कमी व त्याकडे दुर्लक्ष करणाऱया देशांत तो अधिक असल्याचे लक्षात येते. आपल्याकडील दराचे उत्तरदायित्व ओघानेच धोरणकर्त्यांकडे जाते. ‘एक देश एक निवडणूक’ अशा बऱयाच काही घोषणा सध्या ऐकायला मिळतात, परंतु महागाईच्या दराने विविधतेतून एकतेचे दर्शन घडवलेय. राष्ट्रीय पातळीवरील दर 6.8 टक्के असला तरी राजस्थान 6.8, तेलंगणा 8.3, उत्तर प्रदेश 7.2 व झारखंडमध्ये 7.9 टक्के आहे.

‘इंडिया’ – ‘भारता’चे दर्शन महागाई दरातही होते. ग्रामीण भागात स्वस्ताई व शहरी भागात महागाई असते, असा आपल्याकडील सर्वसाधारण समज आहे, परंतु आता तो खोटा ठरतोय. कारण ग्रामीण भागातील दर 7.02, तर शहरातील 6.59 टक्के आहे. खेडय़ाचे स्वावलंबन हरवल्याचे हे निदर्शक म्हणावे लागेल. वाहतूक, दळणवळण सोयींच्या विकासातून राज्याराज्यांच्या तसेच ग्रामीण-शहरी दरातील तफावत किमान पातळीवर आणणे शक्य आहे. महागाई आहार पद्धती निरपेक्ष असते असाही एक साधारण समज आहे, परंतु महागाईच्या दराने शाकाहारी, मांसाहारी थाळीत फरक करून सगळय़ांनाच बुचकळय़ात टाकले आहे. जुलैच्या तुलनेत ऑगस्टमधील शाकाहारी थाळीचा खर्च 25 टक्क्यांनी, तर मांसाहारीचा 13 टक्क्यांनी अधिक होता. शाकाहारी थाळीच्या दरवाढीला भरड धान्ये, भाजीपाला, डाळी, भात, मसाले, दूध, दुग्धजन्य पदार्थांची दरवाढ कारणीभूत ठरली आहे. जुलैच्या तुलनेत ऑगस्टमधील त्यांच्या दरात अनुक्रमे 11.9, 26.1, 13.0, 23.2, 7.73 टक्क्यांनी वाढ झाली. गेल्या काही काळापासून ही दरवाढ काही केल्या थांबायचे नाव घेत नाही. ग्राहक किंमत निर्देशांकात भरड धान्याला 9.7 टक्के भार (महत्त्व) आहे. भरड धान्याच्या उत्पादनात जगात भारताचा तिसरा क्रमांक असला तरी त्याच्या दरवाढीने दोन अंकी मर्यादा पार करून बराच काळ लोटलाय. अल-निनोचे उद्भवलेले संकट व त्यामुळे उत्पादनात होणारी घट, राखीव साठय़ाने गाठलेला तळ यामुळे येत्या काळात भरड धान्याचे दर चढेच राहण्याची शक्यता आहे.

गहू, बिगर बासमती तांदळावर निर्यात बंदी लादून दर आटोक्यात आणण्याचा प्रयत्न सरकारकडून केला जात असला तरी त्याला फारसे यश येताना दिसत नाही. आता तर डाळ 200 रुपयांवर गेलीय. लागवडीखालील क्षेत्रात झालेली घट, प्रतिकूल नैसर्गिक परिस्थिती यामुळे तूरडाळीसह इतर डाळींसाठी येत्या काळात अधिक पैसे मोजण्याची तयारी लोकांना ठेवावी लागेल. भाजीपाल्याच्या दरवाढीचा नेहमीच बाऊ केला जातो. खरे तर ही वाढ तात्कालिक असते. हंगाम बदलाच्या संधीकाळात ती होते आणि काही काळानंतर ती संपुष्टात येते. दीड-दोन महिन्यांपूर्वी टोमॅटोच्या दरवाढीवरून बराच गदारोळ माजला होता. टोमॅटोची दरवाढच महागाईला जबाबदार असल्याचे चित्र निर्माण करण्यात आले होते. शासनानेही तडकाफडकी नेपाळकडून त्याची आयात करून गदारोळ शमवला होता. दर सध्या रसातळाला गेले आहेत तरीही सरकार मात्र बघ्याची भूमिका घेण्यापलीकडे काही करत नाही. दराने सध्या तळ गाठलेला असला तरी ग्राहक किंमत निर्देशांकात विशेष फरक पडलेला नाही. शेतकरी मात्र हवालदिल झालाय. मसाले, मिरची, दूध, दुग्धजन्य पदार्थांच्या दरात येत्या काळात घट न होता वाढच होण्याची चिन्हे आहेत.

थोडक्यात काय, तर येत्या काळातही शाकाहारी थाळीच्या दरात वाढच संभवते. साहजिकच त्याचा फटका शाकाहारींना बसणार आहे. भरड धान्ये, मसाले, खाद्यतेल, भात हे दोन्हीकडील सामाईक घटक त्यांच्या दरवाढीचा दोन्हीकडे सारखाच परिणाम होणार यात शंका नाही. असे असले तरी अंडी, मटण, मासे, चिकन यांच्या दरात गेल्या काळात विशेष वाढ झालेली नाही. ब्रॉयलर चिकनच्या दरात केवळ एक ते तीन टक्क्यांनी वाढ झालीय. खाद्यतेलाच्या दरात 17 टक्क्यांनी घटच झालीय. गॅस सिलिंडरच्या 200 रुपये कपातीचा लाभ दोन्हीकडे सारखाच होणार आहे. त्यामुळे येथून पुढच्या काळातही दोन्ही थाळींच्या दरांतील तफावत कायम राहणार आहे. 30 टक्के भारतीय शाकाहारी असल्याचा दावा केला जातो. राज्यपरत्वे आहार पद्धतीत भिन्नता पहायला मिळते. राजस्थान (68.7 टक्के), हरयाणात (87.9 टक्के) शाकाहारींचे प्रमाण अधिक तर आंध्र प्रदेश, तेलंगणा, तामीळनाडू, केरळ, ओडिशा, पश्चिम बंगाल अशा किनारपट्टीच्या राज्यांत मांसाहारींचे प्रमाण 95 टक्क्यांपेक्षा अधिक आहे. आहाराचा संबंध पोषण व आरोग्याशी असल्याने थाळीच्या दराची चर्चा करणे आवश्यक ठरते. तिच्या दरवाढीची किंमत स्त्रिया व बालकांना आरोग्याच्या रूपाने मोजावी लागते. देशातील 15.3 टक्के लोकसंख्या कुपोषित असल्याचा दावा तज्ञांकडून केला जातो. त्यात स्त्रिया, बालकांचे प्रमाण अधिक असणार हे स्पष्ट आहे. पाच वर्षांखालील बालकांपैकी 32 टक्के वाढ खुरटलेली, तर 19 टक्के कमी वजनाची आहेत. ऑनिमियाग्रस्त स्त्रियांचे प्रमाण 57 टक्क्यांपेक्षा अधिक आहे.

आरोग्याशी निगडित सर्व समस्यांचे मूळ खाद्यान्नाच्या वाढत्या किमतीत आहे यात शंका नाही. केवळ खाद्यान्नाच्या उत्पादन वाढीने या प्रश्नाचे निराकरण होणार नाही. रोजगाराच्या माध्यमातून त्याच्या खरेदीसाठी लागणारी क्रयशक्ती लोकांच्या हाती येईल, अशी व्यवस्था करावी लागेल. तरच खऱया अर्थाने सर्वांना अन्न व पोषण सुरक्षा प्राप्त होईल.

[email protected]