अनिल देशमुख यांना सत्र न्यायालयाचा दिलासा, देशभर फिरण्यासाठी आणखी तीन महिन्यांची परवानगी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना गुरुवारी सत्र न्यायालयाने मोठा दिलासा दिला. मुंबईबाहेर नागपूर तसेच उर्वरित देशभरात फिरण्यासाठी यापूर्वी दिलेली सूट विशेष न्यायालयाने आणखी तीन महिन्यांसाठी कायम ठेवली. त्यानुसार त्यांना 31 जानेवारीपर्यंत स्वतःच्या नागपूर मतदारसंघासह देशभर दौरा करता येणार आहे.

अनिल देशमुख यांच्यातर्फे अॅड. इंद्रपाल सिंग यांनी विशेष न्यायाधीश राहुल रोकडे यांच्याकडे अर्ज करून मुंबईबाहेर प्रवासासाठी परवानगी मागितली होती. त्यावर तपास यंत्रणांनी उत्तर सादर केल्यानंतर न्यायाधीश रोकडे यांनी देशमुख यांना त्यांचा मतदारसंघ असलेल्या नागपूर जिह्यासह उर्वरित देशभरात फिरण्यासाठी 31 जानेवारीपर्यंत मुभा दिली. कथित 100 कोटींच्या खंडणी वसुली प्रकरणात देशमुख यांना मुंबई उच्च न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला होता. जामिनाच्या अटीनुसार मुंबईबाहेर जाण्यास देशमुख यांना न्यायालयाची परवानगी घेणे बंधनकारक आहे. त्यानुसार न्यायाधीशांनी त्यांना यापूर्वीही सूट दिली होती. ती सूट आणखी तीन महिने कायम ठेवण्यात यावी, अशी विनंती देशमुख यांच्यातर्फे अॅड. सिंग यांनी केली. त्यावर देशमुख यांना 31 जानेवारी 2024 पर्यंत संपूर्ण देशभर प्रवास करण्यास मुभा दिली. त्यामुळे देशमुख यांना मोठा दिलासा मिळाला आहे..