
लता गुठे
मन ऐकेना माझे काही
माझ्या तालावं नाचेना
शब्दांनो तुम्ही तरी
याच्या कानात सांगा ना…
कवितेच्या या चार ओळी माझ्या लेखणीतून साकार झाल्या आणि नंतर मी विचार करू लागले, माझ्या मनाची कोणती अवस्था होती, ज्या वेळेला या ओळी मी लिहिल्या. मनाला समजावण्याचा प्रयत्न करूनही जेव्हा ते ऐकत नाही तेव्हा ते काम मी शब्दांना देते. ती अवस्था म्हणजे मनाचं सैरभैर होणे. आता सर्व शब्दांची वेगवेगळी फोड करणे शक्यच नाही. कारण ती एक मनाची अवस्था आहे. ती फक्त अनुभवता येते आणि दुसऱयाला तिचा अनुभव देण्यासाठी सैरभैर शब्दाचाच वापर करावा लागतो.
काही शब्दच इतके वजनदार असतात की, ते एखाद्या साच्यात असे काही फिट बसतात की, त्याच्यातून आपल्याला नेमके काय म्हणायचे आहे ते त्यातून उद्धृत होते. आता हेच पहा ना, मनाची अवस्था ‘सैरभैर’ या शब्दाने किती नेमकेपणाने सांगता येते. मन सैरभैर झाले जेव्हा आपण असे म्हणतो त्या वेळेला आपल्या आयुष्यात काहीतरी असे घडले असते की, ज्यामुळे विचारांची कालवाकालव होते. आपण एखाद्या व्यक्तीची वाट पाहत असतो आणि दिलेल्या वेळेत ती आपली प्रिय व्यक्ती येत नाही त्या वेळेला अनेक प्रश्नांचे वादळ मनात उतरते तेव्हा मन सैरभैर होते. काही शब्द मंद असतात, तर काही नेभळट असतात. म्हणजे उगीच, काहीतरीच, असंच… या शब्दांना धार नसते किंवा त्याचे काही खास अस्तित्व नसते, परंतु काही शब्द तीक्ष्ण, धारदार असतात. त्याला वेगळा आयाम असतो. त्या शब्दांना काहीतरी ठासून सांगायचे असते. उदाहरणार्थ, ‘अधोरेखित’ हा शब्द किंवा ‘ध्येयवादी’, ‘प्रकाशमय’ हे काही शब्दांमध्ये अशी लय, मांडणी असते की ते त्या भावनेच्या साच्यात अगदी अचूक बसतात. त्या शब्दांमधून आपल्याला नेमके काय म्हणायचे आहे ते त्यातून उद्धृत होते. शब्द उच्चारायला आणि ऐकायलाही मस्त वाटतात. ‘प्रकाशमय’ हा शब्द सकारात्मक ऊर्जा देतो. तो प्रेरक असा आहे. तसाच ‘आई’ शब्द मायेचे वलय निर्माण करतो. एखादी व्यक्ती म्हणाली की, ‘मी येण्याचा प्रयत्न करते’… अशा वेळेला समजून जावे की, ती येणार नाही, परंतु ‘मी नक्कीच येईन’ असे जेव्हा म्हणते त्या वेळेला तो शब्द नक्कीच आश्वासक वाटतो. नक्कीच शब्दात जसा ठामपणा आहे तसा ‘सैरभैर’ शब्द हा नेभळटही नाही आणि मंदही नाही. त्याला एक स्वतची गती आहे.






























































