आशियाई स्थापत्य वैभव – जपानचा स्थापत्य वारसा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>>डॉ. मंजिरी भालेराव

जपानमध्ये युनेस्कोने जागतिक वारसा असा दर्जा दिलेली 19 सांस्कृतिक, 6 नैसर्गिक अशी 25 स्थळे आहेत. जागतिक पातळीवर प्रसिद्ध असलेल्या अशा काही स्थानांमधील तोदाई-जी हे नारा या शहरातील भव्य बुद्धमूर्ती असलेले मंदिर आणि कियोमिझु-देरा हे कान्नोन म्हणजे अवलोकितेश्वर या देवतेला समर्पित केलेले मंदिर यांचा उल्लेख करायलाच हवा.
आशियाच्या स्थापत्य वैभवाची माहिती घेत असताना जपानमधील महत्त्वाच्या धार्मिक स्थापत्याची माहिती आपण घेतली. यामध्ये काही स्थाने ही जागतिक वारसा असा दर्जा मिळालेली होती, तर काही जपानचे राष्ट्रीय स्मारक असा दर्जा मिळालेली होती. युनेस्कोने जागतिक वारसा असा दर्जा दिलेली 19 सांस्कृतिक आणि 6 नैसर्गिक अशी एकूण 25 स्थळे आहेत. सर्व इथे पाहणे शक्य नसल्यामुळे त्यातील आत्यंतिक महत्त्वाची स्थानेच आपण पहिली. मालिकेच्या शेवटाकडे येताना अजूनही काही खूप महत्त्वाची, जागतिक पातळीवर प्रसिद्ध असलेली आणि चुकवू नये अशी काही या प्रकारातली स्थाने आहेत. त्यापैकी काहींची माहिती या भागात घेऊ या.

तोदाई-जी (पूर्वेकडील एक महान मंदिर) या नावाने प्रसिद्ध असलेले नारा या शहरामध्ये असलेले हे एक जागतिक वारसा स्थळ आहे. या मंदिरामध्ये असलेला ‘दाईबुत्सु’ (भव्य आकाराची बुद्धमूर्ती) हे एक मोठे आकर्षण आहे. जगातील सर्वात मोठी लाकडी इमारत म्हणून प्रसिद्ध असलेले हे मंदिर इ.स. 738 मध्ये स्थापन झाले होते, पण लोकांसाठी मात्र ते इ.स. 752 मध्ये उघडले गेले. सम्राट शोमु याच्या काळात या मंदिराची निर्मिती झाली. या काळात जपानमध्ये अनेक प्रकारच्या रोगराईमुळे मोठय़ा प्रमाणात जीवितहानी झाली होती. सम्राटाचा मुलगासुद्धा यात मृत्यू पावला. त्यामुळे सम्राट शोमु यांनी संपूर्ण जपानमध्ये सर्व प्रांतांमध्ये बुद्धाची मंदिरे उभारण्याचा आदेश दिला. त्याच वेळेस नारा येथे जगातील सर्वात मोठी कास्य मूर्ती तयार करण्यात आली. ‘बिरुशन बुत्सु’ (वैरोचन बुद्ध) याची ही मूर्ती 16 मीटर म्हणजे 55 फूट उंचीची होती. त्या काळातील सर्व प्रांतांतील मंदिरांमध्ये नारा येथील मंदिर हे प्रमुख मंदिर होते. जपानमध्ये त्या काळात असलेल्या सहाही बौद्ध पंथांचे ते महत्त्वाचे केंद्र होते आणि त्यांचे प्रमुख आचार्य या ठिकाणी असलेल्या मठात निवास करत असत. दक्षिण हिंदुस्थानातून याच काळात बौद्ध आचार्य बोधिसेन जपानमध्ये गेला आणि सम्राट शोमुला भेटला. त्याच्या मार्गदर्शनाखाली या भव्य बुद्ध मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली गेली.
पाच चौरस मीटरच्या परिसरात पसरलेल्या या मंदिर संकुलाच्या आवारात अनेक इमारती आहेत. त्यातील शोसो-इनमध्ये मंदिराच्या मालकीचा अमूल्य खजिना जपून ठेवला आहे. इ.स.च्या 8 व्या शतकातील अनेक मूर्ती आणि वस्तूंचा हा ठेवा फक्त हिवाळ्यामध्ये सामान्य लोकांना बघण्यासाठी खुला केला जातो. यामध्ये सम्राट शोमुच्या वैयक्तिक मालकीच्या 600 पेक्षा वस्तू आहेत, तर त्या काळातील 9000 पेक्षा जास्त कलावशेष आहेत. या परिसरात असलेल्या सांगात्सु-दो या इमारतींमध्ये ‘सद्धर्मपुंडरिक’ या ग्रंथाचे नियमित पठण केले जात असे. या परिसरातील ही सर्वात जुनी इमारत आहे. या मंदिराच्या परिसरात अनेक हरणे मोकळी फिरताना दिसतात. गौतम बुद्धांनी पहिले प्रवचन जिथे दिले त्या सारनाथ येथील मृगवनाची आठवण करून देणाऱया या परिसरात या हरणांना बघण्यासाठी पर्यटक खूप गर्दी करतात.

अशाच प्रकारचे अजून एक महत्त्वाचे स्थळ म्हणजे कियोमिझु-देरा. कान्नोन म्हणजे अवलोकितेश्वर या देवतेला समर्पित केलेले हे मंदिर म्हणजे जवळच्या डोंगरातून वाहत असलेल्या ओटावा नावाच्या शुद्ध आणि स्वच्छ पाणी असलेल्या झऱयाच्या शेजारी असलेले मंदिर. ‘स्वच्छ किंवा पवित्र पाण्याच्या झऱयाचे मंदिर’ म्हणून हे ओळखले जाते. इ.स. 778 मध्ये बांधलेले हे मंदिर जपानमधील सर्वात प्राचीन पंथांपैकी एक असलेल्या होस्सो या पंथाचे होते. शोनिन हा येथील प्रमुख आचार्य होता. पूर्वी तो नारा येथील मंदिरात पुजारी होता, पण त्याला एकदा “ओटावा नावाच्या शुद्ध पाणी असलेल्या झऱयाच्या शेजारी मंदिर बांध” असा दृष्टांत झाला. तेव्हा त्याने हे मंदिर बांधले. इ.स. 798 मध्ये शोगुन तामुरामारो याने या परिसरात मोठी इमारत बांधली. या मंदिराचे सध्याचे रूप इ.स. 1633 मध्ये तयार झाले. प्रचंड मोठय़ा लाकडी ओंडक्यांनी बांधलेले हे मंदिर बांधताना एकही लोखंडी खिळ्याचा वापर केलेला नाही असे सांगितले जाते. प्राचीन चीनमधून जपानमध्ये आलेल्या स्थापत्य परंपरेचे हे एक वैशिष्टय़ मानले जाते.

या मंदिराची मुख्य अधिष्ठाती देवता म्हणजे महाकारूणिक कान्नोन म्हणजे अवलोकितेश्वर आहे. या देवतेची भव्य मूर्ती मुख्य मंदिरात आहे. इ.स.च्या 17 व्या ते 19 व्या शतकाच्या काळात म्हणजे एदो काळ या नावाने प्रसिद्ध असलेल्या काळात इथे एक वेगळीच प्रथा सुरू होती. मंदिर जमिनीपासून जवळ जवळ 10 मीटर म्हणजे 43 फूट उंचीवर आणि विविध टप्प्यांमध्ये बांधले होते. या 43 फूट उंचीवर असलेल्या कठडय़ावरून जर खाली उडी मारली आणि ती व्यक्ती जगली तर त्या व्यक्तीच्या सर्व इच्छा पूर्ण होतात, असा समज प्रसृत झाला होता. या काळात 234 लोकांनी अशा उडय़ा मारल्या होत्या आणि त्यापैकी 85 टक्के लोक जिवंत राहिले होते. पुढे 1872 मध्ये यावर बंदी आणण्यात आली.

या परिसरात अनेक इमारती आहेत, पण त्यापैकी एक अत्यंत प्रसिद्ध आणि लोकप्रिय आहे ती म्हणजे जीशु मंदिर. ज्या स्त्राr-पुरुषांना आयुष्याचा जोडीदार शोधायचा असतो ते इथे येतात. इथे 10 मीटर अंतरावर असलेल्या दोन दगडांच्या मधून डोळे बंद करून जो यशस्वीपणे चालू शकेल त्याला त्याचा खरा साथीदार मिळेल अशी श्रद्धा आहे. त्यामुळे असंख्य लोक आपले नशीब आजमावण्यासाठी इथे येतात. नेत्रसुखद निसर्गरम्य वातावरण हे या मंदिर समूहाचे अजून एक वैशिष्टय़ आहे. त्यामुळे इथे मोठय़ा प्रमाणात पर्यटक भेट देतात.
अशा प्रकारची अनेक प्रेक्षणीय स्थळे जपानमध्ये आहेत, पण उरलेल्या आशियाच्या वारशाचीही थोडक्यात ओळख करून घेणे आवश्यक असल्याने जपानची ओळख इथे थांबवून पुढच्या लेखात आशियाची सफर करू. .

[email protected]

(लेखिका टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, पुणे येथे संस्कृत आणि भारतीय विद्या विभागप्रमुख आहेत.)