खिचडी शिजविणाऱ्या बाईंनी घेतली प्रार्थना, सरपंच बनल्या शिक्षिका; यवतमाळ जिल्ह्यात शिक्षणाची दुर्दशा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

प्रसाद नायगावकर, यवतमाळ

शिक्षण हा प्रत्येक मुलाचा मूलभूत हक्क आहे असं सरकार जेव्हा सांगतं, तेव्हा खूप बर वाटतं. त्यासाठी सरकार सर्वशिक्षा अभियानही चालवतं. पण, वास्तवातलं चित्र मात्र याहून नेमकं उलट असल्याचं पाहायला मिळत आहे आणि त्याचं कारण ठरली आहे ती यवतमाळ जिल्ह्यातील कानडा जिल्हा परिषदेची शाळा.

मारेगाव तालुक्यातील या या शाळेत इयत्ता पहिली ते चौथी चे प्राथमिक शिक्षण दिले जातं. या शाळेची एकूण पटसंख्या आहे अवघी 9. या 9 विद्यार्थ्यांना शिकवायला एकूण दोन शिक्षक आहेत. पण शुक्रवारी हे दोन्ही शिक्षक गैरहजर होते. मग काय तर शालेय पोषण आहार शिजवणाऱ्या ताईने विद्यार्थ्यांची प्रार्थना घेतली तर सरपंच बाई चक्क शिक्षिका बनल्या. वास्तविक याच शाळेत दोन दिवसांपूर्वी शाळा पाहणीसाठी पथकही येऊन गेलं. तसंच, शनिवारी विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता परीक्षणासाठी सिस नावाची परीक्षाही घेण्यात आली. मात्र, शुक्रवारी दोन्ही शिक्षकांनी दांडी मारल्याने पोषण आहार शिकवणाऱ्या बाई आणि सरपंच यांना शिक्षकांची भूमिका निभवावी लागली.

अवघी नऊ इतकी पटसंख्या असलेल्या या शाळेतील शिक्षकांनी दांडी मारल्याची माहिती या गावच्या सरपंच सुषमा रुपेश ढोके यांना कळली. त्यांनी स्वतः शाळेत धाव घेत उपस्थित असलेल्या सात विद्यार्थ्यांना शिकवण्याचं काम केलं. तसंच, शाळेतील शिक्षक गैरहजर असल्याची माहिती देखील शिक्षण विभागाच्या केंद्रप्रमुखे आणि विस्तार अधिकारी यांना दिली. त्यानंतर शेजारील गावातील शिक्षक या शाळेत पाठवण्यात आला. सुषमा ढोके यांनी पालक व गावातील प्रतिष्ठित नागरिक यांच्या उपस्थितीत घटनेचा पंचनामा करून याची माहिती पंचायत समिती गटाविकास अधिकारी पद्माकर मडावी यांना दिली. या बाबत संबंधित शिक्षकांवर कारवाई होणार असल्याची माहिती मिळत आहे.

या बाबतीत प्राथमिक जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी किशोर पोंगरे यांच्याकडे विचारणा केली असता या या घटनेबाबत तक्रार प्राप्त झाली असल्याची पुष्टी करत चौकशीनंतर योग्य ती कारवाई करणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.