
प्रसाद नायगावकर, यवतमाळ
यवतमाळ जिल्ह्यातील नेर येथे डॉक्टरांच्या बदलीच्या मागणीवरून चक्क भाजपा तालुकाध्यक्ष आमरण उपोषणाला बसले आहेत. जर सत्तेत राहून उपोषणाला बसावे लागत असेल आणि काम होत नसेल तर सामान्य नागरिकांची कोणती कामे शासनाकडून होत असलेलं असा प्रश्न उपस्थित होत आहे.
यवतमाळ जिल्ह्यातील नेर तालुक्यात आजूबाजूस जवळपास 100 गावे आहेत. या गावातील ग्रामीण व शहरी जनतेला आरोग्य सेवा देण्यासाठी शहरात ग्रामीण रुग्णालय थाटण्यात आले. पण हेच ग्रामीण रुग्णालय सध्या सलाईनवर आहे. वातावरणाच्या बदलामुळे सध्या अनेक साथीच्या आजारांचे रुग्णांत वाढ झाली आहे. अनेक खेड्यातील लोकं उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात येतात. येथील डॉक्टर शासनाकडून पगार घेतात पण त्यांनी आपली स्वतःची दवाखाने सुरु केली आहेत किंवा ते इतरांत खाजगी सेवा देत आहेत .यामुळे ग्रामीण रुग्णालयाची आरोग्य व्यवस्था पुरती ढासळली आहे. संबंधित डॉक्टरांच्या बदलीच्या मागणीवरून भाजप तालुकाध्यक्षांनी ग्रामीण रुग्णालयासमोरच आमरण उपोषण सुरू केले आहे. त्यामुळे सर्वत्र हा चर्चेचा विषय झाला आहे.
ग्रामीण रुग्णालयात कोणी अधिकारी वेळेवर येत नसल्याने इतर कर्मचारी सुद्धा त्याच पद्धतीने बेशिस्तपणे वागतात. काही कर्मचारी तर तळीराम बनून कर्तव्यावर येतात. कफ सायरफ, वेदनाशामक मलम यासारख्या महत्वच्या औषधाचा रुग्णालयात तुटवडा आहे. एक्स रे मशीन ही कायमच बंद असते .यामुळे रुग्णांना बाहेर जाऊन एक्स रे काढावा लागतो. याचा भुर्दंड सामान्य रुग्णांना बसत आहे. शिवाय रुग्णालयात सोनोग्राफी मशीन उपलब्ध नाही. सोबतच भौतिक सोयी सुविधांचा अभाव नेर ग्रामीण रुग्णालयात आढळून येतो. विशेष म्हणजे ग्रामीण रुग्णालयामध्ये ‘डॉक्टर दांपत्यावर’ जिल्हा शल्य चिकित्सक विशेष मेहरबान असल्याचा आरोप यावेळी उपोषणकर्ते तथा भाजप तालुकाध्यक्ष अनिल राठोड यांनी केला आहे. एकाच जागी वीस वर्षे सेवा देऊनही त्या डॉक्टरांची बदली का केली जात नाही. असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे. रुग्णालयातील एक- दोन वैद्यकीय अधिकारी जर सोडले उर्वरित डॉक्टरांना रुग्ण जेव्हा रुग्णालयात येतो, तेव्हा फोन करून बोलावण्यात येते. शासकीय वेळेत संबंधित डॉक्टर आपल्या खाजगी दवाखान्यात सेवा देत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांची बदली येथून करावी या मागणीच्या आधारावर ग्रामीण रुग्णालयासमोरच भाजपा तालुकाध्यक्षांचे आमरण उपोषण सुरू आहे.






















































