मुद्दा – पाणी कपातीची वेळ का आली?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> वैभव मोहन पाटील

स्वतःच्या मालकीचे धरण असलेली महापालिका म्हणून नवी मुंबईचा लौकिक असला तरी गेल्या काही वर्षांपासून मोरबे धरणाचे पाणी शहराला अपुरे पडू लागले आहे. गावठाण व परिसरात लोकवस्ती मोठय़ा प्रमाणावर वाढत चालल्याने पालिकेचे पाणी नियोजन डळमळीत होताना दिसत आहे. गेल्या काही महिन्यांपासून नवी मुंबईतील विविध प्रभागांत पाण्याच्या बाबतीत सातत्याने नागरिक तक्रारी करताना दिसत आहेत. यामुळे दिवसातून दोनवेळा पाणी सोडण्याऐवजी एकदाच सहा ते सात तास पाणी वितरण करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. शहराच्या इतिहासात प्रथमच नागरिकांना सलग सहा ते सात तास पाणीपुरवठा होणार आहे. या वर्षी एप्रिल महिन्यात धरणात पाणीसाठा कमी शिल्लक राहिल्याने पालिकेने एप्रिलपासून शहरात आठवडय़ातून एक दिवस विभागवार पाणी कपात लागू केली. मात्र मोरबे धरण 100 टक्के भरल्यानंतरही महापालिकेने पाणी कपात मागे घेतली नाही. मात्र आता नव्या नियोजनानुसार दिवसातून एकदाच सहा ते सात तास नागरिकांना पाणी मिळणार आहे. याअगोदर शहरात साधारणपणे सकाळी आणि संध्याकाळी एकाच वेळेत पाणीपुरवठा करण्यात येत होता. मात्र पाण्याचा दाब, भौगोलिक अंतर आदी कारणांमुळे काही विभागांना जास्त तर काहींना कमी पाणी मिळत होते व वितरणातील ही विषमता दूर करण्यासाठी वेळापत्रक बदलल्याचे पालिकेचे म्हणणे आहे.

त्याचप्रमाणे नवी मुंबई महानगरपालिकेकडून विविध दुरुस्तीच्या कारणांमुळे शहराच्या विविध भागांत पाणी कपात करण्यात येते. मुंबई व मध्य मार्गावरील उपनगरांवरील अतिरिक्त भारामुळे मोठय़ा प्रमाणावर लोकसंख्या नवी मुंबईकडे सरकली आहे. यामुळे नवी मुंबई व परिसरातील लोकसंख्येत गेल्या काही वर्षांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. एकेकाळी कमी गर्दीची समजली जाणारी हार्बर रेल्वे प्रवाशांच्या प्रचंड गर्दीत धावत आहे. साहजिकच याचा भार नागरी सुविधांवर पडलेला आहे. पाण्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण असलेल्या नवी मुंबई महानगरपालिकेने शहराची 2035 पर्यंतची लोकसंख्या विचारात घेत मोरबे धरण विकत घेतले होते. या धरणाची पाण्याची क्षमता 450 दशलक्ष लिटर इतकी आहे. असे असले तरी गेल्या काही काळापासून महापालिका हद्दीतील वेगवेगळ्या उपनगरांमधील पाण्याचा वापर अनिर्बंध पद्धतीने सुरू असल्याचे निदर्शनास येत आहे. पाण्याचा वारेमाप उपसा अन् मनमानी वितरणामुळे पालिकेचे जल नियोजन विस्कळीत होण्याची भीती आहे. नवी मुंबईची पाणीपट्टी आज अत्यल्प आहे. महिन्याला 30 हजार लिटर पाणी वापरावर जेमतेम 50 रुपयांचे पाणी बिलाचे सूत्र गेली 15 वर्षे शहरात राबविले जात आहे. मात्र यामुळे पाणी वापरावरील नियंत्रण सुटत चालले आहे. पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील काही परिसरालाही पालिकेमार्फत पाणीपुरवठा करण्यात येत असल्याने मोरबे धरणातील पाण्याचा उपसा वाढला आहे. मागील महिन्यात एका दिवसात मोरबे धरणातून 526 दशलक्ष लिटर इतका पाण्याचा उपसा झाला. शहराच्या एका भागात अपेक्षेपेक्षा अधिक वापर तर दुसऱ्या भागात सरासरी ते कमी वापर असेही दिसून येत आहे. वाढीव वापराचा यंत्रणेवरदेखील ताण येत आहे. मोरबे धरणातून प्रक्रिया न केलेले पाणी भोकरपाडा येथील जलशुद्धीकरण केंद्रात आणले जाते. तेथील क्षमताही 450 दशलक्ष लिटर इतकी असताना तेथेही 475 दशलक्ष लिटर पाण्यावर प्रक्रिया केली जात आहे. धरणाच्या क्षमतेनुसार शहरातील पाण्याचा वापर व्हावा असे गणित असताना गेल्या काही काळापासून शहरातील पाण्याचा वापरही वाढला आहे. मोरबेतून निश्चित केलेल्या पाणी उपशापेक्षा 10 ते 15 टक्के अधिक उपसा होत आहे. याचा परिणाम भविष्यात पाणी टंचाईत होऊ शकतो. एमआयडीसीकडून मिळणारे पाणीदेखील अपुरे येत असल्याने धरणातील पाणी उपसा वाढला आहे. त्यामुळे एपंदरीत मोरबेतील अतिरिक्त पाणी उपशावर नियंत्रण आणण्याची गरज निर्माण झाली आहे. पाणी वापर मोजण्यासाठी जलमापक यंत्रे बसवण्यात आलेली असल्यामुळे अतिरिक्त पाण्याचा वापर होत असलेल्या भागांत विशेष सर्वेक्षण करण्याची गरज आहे. नागरिकांना पाणी बचतीबाबत अवगत करून जनजागृतीची गरज आहे. स्वच्छतेच्या बाबतीत आग्रही महापालिकेने पाणी वापराबाबतही दक्षता घेणे गरजेचे आहे. पाण्याचा अवाजवी वापर, गैरवापर, नादुरुस्त जलवाहिन्या, नळ व अनधिकृत जोडण्यांवर नियंत्रण आणणे अत्यावश्यक आहे. सध्या नव्याने प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आलेली एकदाच सलग पाणीपुरवठय़ाची पद्धत सर्व घटकांना सोयिस्कर नसून अतिरिक्त साठय़ाचे प्रावधान नसलेल्या नागरिकांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागू शकते. अशा वेळी पाणी वापरावर नियंत्रण आणण्याची आवश्यकता का निर्माण झाली याची कारणे शोधून त्या अनुषंगाने कार्यवाही करणे संयुक्तिक राहील.