
एखाद्या नेत्याचे कार्यकर्ते नेता म्हणेल तसं वागतात. मात्र थेट नेत्याचा कार्यक्षेत्रातील प्रश्न घेऊन ” आता पुरे झाले ” म्हणत कार्यकर्त्यांनी दंड थोपटले आहेत. हा प्रकार राजुरा विधानसभा क्षेत्रात घडला आहे. राज्यमार्गाच्या कामात होणारी दिरंगाई आणि कामाच्या निष्कृष्ट दर्जा बघता काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आंदोलनाच्या पवित्रा घेतला आहे.विशेष म्हणजे हा मार्ग राजुरा विधानसभा क्षेत्रातून जातो आणि या क्षेत्राचे आमदार काँग्रेसचे सुभाष धोटे आहेत.आता काँग्रेस कार्यकर्त्यांनीच आंदोलनाचा पवित्रा घेतल्याने आमदार धोटे यांची चांगलीच पंचाईत झाली आहे.
राजुरा विधानसभा क्षेत्रात गोंडपिपरी, राजुरा, जीवती, कोरपणा या तालुक्याचा समावेश आहे. विकासाच्या बाबतीत आजही हे तालुके मुख्य प्रवाहात आलेले नाहीत. गोंडपिपरी तालुक्यात अनेक समस्या उभ्या आहेत. तालुक्याचे उत्पन्नाचे मुख्य साधन केवळ शेती आहे. अशात तेलंगणा-महाराष्ट्राला जोडणाऱ्या राज्य मार्गाची घोषणा झाली. पाच वर्षांपूर्वी ऐन निवडणुकीच्या तोंडावर मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या मार्गाचे भूमिपूजन केले होते. आज पाच वर्ष होत आले असतानाही या मार्गाचे काम पूर्णत्वास गेले नाही. हा मार्ग मरणवाट बनलेला आहे. मार्गावर अपघाताची शृंखला सुरूच आहे. मार्गाच्या कामास विलंब का होतोय? याचे उत्तर द्यायला लोकप्रतिनिधी पुढे येत नाहीत. या मार्गाच्या कामाला घेऊन गोंडपिपरी तालुक्यात कमालीच्या संताप व्यक्त केला जातोय. हा संताप लोकप्रतिनिधींच्या अंगलट येणार आहे.ही स्थिती बघता काँग्रेसच्या आमदार असतानाही काँग्रेस पदाधिकारीकाऱ्यांनी आंदोलनाचा पवित्र घेतला आहे. चक्काजाम आंदोलन करण्यात येत असल्याचे निवेदन गोंडपिपरी काँग्रेस कमिटीने तहसीलदारांना दिलं आहे. निवेदनानंतर “आता सहनशीलता पुरे झाली” अशी हेडलाईन असलेली पोस्ट काँग्रेसकडून समाजमाध्यमात वायरल केली जात. काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेला हा इशारा नेमका कुणासाठी ? याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
काय म्हटलं निवेदनात…
गोंडपिपरी- धाबा-हिवरा-पोडसा या महामार्गाचा कामाला सुरवात होऊन पाच वर्ष झालीत.काम अद्यापही अर्धवटच आहे. अर्धवट कामामुळे अपघाताची संख्या वाढली आहे.या गंभीर बाबीकडे संबंधित विभाग दुर्लक्ष करीत आहे.मार्गाचे निष्कृष्ट बांधकाम आणि होणारी दिरंगाई बघता गोंडपिपरी तालुका काँग्रेसने आक्रमक पावित्रा घेतला आहे. दिनांक 21 नोव्हेंबर 2023 रोजी सकाळी 10 वाजता गोंडपिपरी तालुक्यातील धाबा गावाजवळील डोंगरगाव फाटा या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.
आमदार तुमचेच अन आंदोलनकर्ते तुम्हीच…
गोंडपिपरी तालुक्याच्या विकासासाठी हा मार्ग लाभदायक ठरणार आहे. हा मार्ग पूर्णत्वास जाण्याची प्रतीक्षा नागरिक करीत आहेत.मात्र हा मार्ग राजकारणाचा बळी ठरला आहे. या मार्गाला घेऊन आमदार सुभाष धोटे यांच्यावर टीका केली जात होती. या टीकेला बगल देण्यासाठी काँग्रेसने आंदोलनाच्या पवित्रा घेतल्याचं आता बोलले जात आहे. काँग्रेसचाच आमदार असताना आज काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना आंदोलन करण्याची गरज काय असे प्रश्न समाजमाध्यमातून विचारले जात आहे.




























































