बीडमधील भीषण हल्ल्यांमागे व्यावसायिक गुंड – रोहित पवार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मराठा आरक्षण आंदोलन शांततेने सुरू असताना बीडमधील भीषण हल्ल्यांमागे व्यावसायिक गुंड होते. मात्र, पोलीस निरपराध तरुणांची धरपकड करत आहेत, असा हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी केला. हा प्रकार निषेधार्ह असून या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी आज बुधवारी त्यांनी पत्रकार परिषदेत केली.

आमदार पवार पुढे म्हणाले, हे गुंड फॉस्फरस बॉम्ब, पेट्रोल बॉम्ब घेऊन चार टोळ्या करून आले होते. प्रत्येकाच्या वेगवेगळ्या जबाबदार्‍या होत्या. त्यानुसार त्यांनी हे हल्ले केले, निवासस्थाने जाळली. यात कोणी जखमी झाला तर त्याला घेऊन जाण्यासाठी त्यांचीच रुग्णवाहिका सज्ज होती. या रुग्णवाहिका छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने आल्या, मात्र शहरात पोहचल्याच नाहीत, असेही ते म्हणाले. हल्ले सुरू असताना पोलिसांची भूमिका बघ्याची होती. त्यांनी या हल्लेखोरांना रोखले का नाही? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

आता पोलीस हल्ल्याच्या ठिकाणी उभे असलेल्यांची धरपकड करत आहेत, हल्ल्यांशी संबंध नसणार्‍या निरापराध युवकांना गुंतवणे चुकीचे असल्याचे सांगून या गंभीर घटनेनंतर गृहमंत्र्यांनी बीड येथे भेट द्यायला हवी होती, असेही ते म्हणाले.