’70 तासांचा कामाचा आठवडा’ या विधानाला काँग्रेस खासदाराचा पाठिंबा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

इन्फोसिसचे सह संस्थापक एन. आर. नारायण मूर्ती यांनी एका पॉडकास्ट मुलाखतीमध्ये कर्मचाऱ्यांनी किमान 70 तास तरी काम करायला हवे असे विधान केले होते. त्यांच्या या विधानावर वेगवेगळ्या स्तरावर अनेक प्रकारच्या प्रतिक्रिया उमटल्या. काहींनी त्यांच्या विधानाला पाठिंबा दिला तर काहींनी त्याचा विरोध केला. काँग्रेसचे खासदार मनीष तिवारी यांनी  नारायण मूर्तींच्या या विधानाला पाठिंबा दर्शवला आहे.

मनीष तिवारी यांनी आपल्या “X” हँडलवरून पोस्ट शेअर करत नारायण मूर्तींच्या विधानाला पाठिंबा दर्शवला आहे. 70 तासांच्या कामाच्या आठवड्याबद्दल लोकांनी इतका विरोध का दर्शवावा हे समजत नसल्याचे तिवारी यांनी ट्विटद्वारे म्हटले आहे. “देशातील काही लोकप्रतिनिधी दिवसाचे 12 – 15 तास काम करतात. मी स्वत: रविवारची सुट्टी केव्हा घेतली होती हे देखील आठवत नाही. राजकीय क्षेत्रात रविवार हा पूर्ण कामाचा दिवस असतो, मग तुम्ही निवडून आलेले असाल किंवा नसाल, काम सुरु ठेवावे लागते.” असे मनीश तिवारी यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे.

पुढे, “जर हिंदुस्थानाला खरोखरच महाशक्ती व्हायचे असेल तर, आठवड्यातील 70 तासांच्या कामाचे वेळापत्रक बनविने गरजेचे आहे. एक दिवस सुट्टी, आठवड्यातून 70 तास काम आणि वर्षाला 15 दिवसांची सुट्टी असे वेळापत्रक देशात असणे गरजेचे आहे,” असे तिवारींचे म्हणणे आहे.

काही दिवसांपूर्वी एका पॉडकास्टमध्ये इन्फोसिस कंपनीचे सह संस्थापक नारायण मूर्तींची मुलाखत घेण्यात आली होती. या मुलाखतीत जर हिंदुस्थानाला जगातील अर्थव्यवस्थेत उल्लेखनीय प्रगती केलेल्या देशांची बरोबरी करावयाची असेल तर, तरूण पिढीला अधिक मेहनत करण्याची गरज असल्याचे मत मूर्तीं यांनी व्यक्त केले.