रुचकर दिवाळी – दिवाळीचा गोडवा… आनंदाची रोषणाई…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> संजीव साबडे

दिवाळी म्हटलं की घरोघरी प्रेमाने, मेहनतीने साग्रसंगीत फराळ केला जातो, पण ते कोणी खात नसेल तर आपला हिरमोडच होतो. त्यामुळे नेहमीच्या ठरलेल्या फराळापेक्षा वेगळे पदार्थ घरी करायला व प्रसंगी विकत आणायला काय हरकत आहे? दिवाळीचा गोडवा वाढवणारे हे पदार्थ आवर्जून करून पहा.

दिवाळी सुरू झालीच की… शहरभर कंदील, दिव्यांची रोषणाई, अधूनमधून फटाक्यांचे आवाज सुरू झालेत. घरात चकल्या, चिवडा, लाडू, करंज्या, शेव, शंकरपाळय़ा असा सारा दिवाळीचा फराळ झाला का तयार? घरीच केलात सर्व की, काही पदार्थ मराठमोळय़ा दुकानांतून किंवा घरी बनवून पी करणाऱया मंडळींकडून विकत घेतले? घरी केलेले असोत की विकतचे, बहुतांशी मराठी घरांत दिवाळीत वरील खाद्यप्रकारच केले जातात. हे पदार्थ मराठी जिभेची चव आणि संस्कृतीला अनुसरूनच आहेत, पण अनेकदा दिवाळीच्या पहिल्या दोन दिवसांतच घरातल्या मंडळींना याचा कंटाळा येतो. दिवाळीत घरी आलेले अनेक पाहुणेही चकलीचा एकच तुकडा मोडून तोंडात टाकतात आणि “पुरे, गोड तर अजिबात नको,” असे म्हणून बेसनाचे व रव्याचे लाडू खायचे टाळतात. कारण घरोघरी हे पदार्थ समोर येतात. हे प्रकार घरी प्रेमाने, मेहनतीने केलेले असतात. ते कोणी खात नसेल तर आपला हिरमोडच होतो. त्यामुळे नेहमीच्या ठरलेल्या फराळापेक्षा वेगळे पदार्थ घरी करायला व प्रसंगी विकत आणायला काय हरकत आहे?

हिंदुस्थानात सर्वत्र दिवाळीचा सण मोठय़ा उत्साहाने साजरा होतो. दिवाळीला काही राज्यांत आपल्यापेक्षा वेगळे पदार्थ केले जातात किंवा त्यात काहीसा बदल केला जातो. आपल्या घरात वर्षानुवर्षे भाजणीच्या चकल्या केल्या जातात. त्या हलक्या झाल्या नाहीत, तर दात आणि जीभ तिच्याकडे पाहतही नाहीत. त्यामुळे पटकन तयार होणारी बटर घालून केलेली तांदळाच्या पिठाची चकली करायला काय हरकत आहे? ती हलकी होते आणि कुरकुरीतही. ती कडक होण्याची शक्यता कृतीमध्ये गडबड झाली तरच. छोटय़ा आकाराची कडबोळीही पाहुणे व घरची मंडळी पटकन तोंडात टाकतात. चकलीच्या भाजणीची कडबोळी होतात आणि आता तर तिखट, मीठ असे सारे मिक्स पिठ तयार मिळते.

दिवाळी फराळात तिखट पदार्थ करणे तुलनेने सोपे, पण बेसन लाडू, रवा लाडू, करंज्या करण्यासाठी मोठाच घाट घालावा लागतो. बेसन भाजण्याचा कार्पाम म्हणजे हातांना व्यायामच. करंजीसाठी ओल्या नारळाचे वा सुक्या खोबऱयाचे सारण नीट होणे, ते आत सारल्यावर तळताना करंजी न फुटणे, करंजी पोकळ न राहणे ही एक कलाच. गोव्यात नेवरी हे करंजीचे भावंड केले जाते. दोन्हीत फार फरक नाही, पण नेवरी अधिक स्थूल वा भरलेली असते. दिवाळीत उकडीच्या मोदकांप्रमाणे उकडीची करंजीही करून पाहा की. हळदीची पाने असतील तर करंजीला मस्त फ्लेवर येतो.

अनारसे करणे खूप अवघड. त्यामुळे अनारशांच्या वाटय़ाला फार कोणी जात नाही, पण इतर गोड पदार्थ विकत आणतो, तसे अनारसेही आणता येतील की. शिवाय आता अनारशांचे रेडी मिक्स मिळते की बाजारात. अनारशांप्रमाणे चिरोटे हा प्रकारही करायच्या भानगडीत कोणी पडत नाही, पण विकत मिळतो की हा उत्तम लहानसा गोड प्रकार. महाराष्ट्र व कर्नाटकची खासीयत असलेला प्रकार अमेरिकेतही मिळतो.

बेसनाचे लाडू करण्याऐवजी बेसनाच्या वडय़ा केल्या तर त्या जास्त होतात आणि आकर्षकही दिसतात. बेसन चांगले भाजले गेले असेल तर मस्त रंग येतो. वरून काजू व बेदाण्याऐवजी पिस्ता आणि सोललेल्या बदामांचे काप लावले की ती वडी खायची इच्छा होणारच. आणखी बेसनाचे दोन प्रकार म्हणजे म्हैसूर पाक आणि मोहन थाळ. म्हैसूर पाक हा नावाप्रमाणे पूर्वीच्या म्हैसूर प्रांतातील. म्हणजे कर्नाटक व तामीळनाडूतील. आपल्याकडे म्हैसूर पाक काहीसा कडक बनवतात. खमणसारखा दिसणारा, पण प्रत्यक्ष हा प्रकार अतिशय मऊ असतो. तुपात बनवलेला हा प्रकार खूपच छान. आपल्या बेसन वडीसारखाच. तो गुजराती व उत्तर हिंदुस्थानी नव्हे, तर दक्षिण हिंदुस्थानी दुकानातूनच घ्यावा. काही अय्यंगार बेकरीत व माटुंगा, सायन, चेंबूरमध्ये तो चांगला मिळतो. मोहन थाळ हा गुजरात, राजस्थानातील लोकप्रिय प्रकार. हेही आपल्या बेसन लाडूचे भावंड. बेसनवडीच्या जवळ जाणाऱया मोहन थाळमध्ये बेसन, साखर, तूप लागते आणि वरून सुका मेवा पसरवायचा. या वरील तीनपैकी एक पदार्थ केला तरी नेहमीच्या बेसन लाडूची गरज नाही.

काही केकसदृश्य, पण अंडे नसलेले आणि पूर्ण शाकाहारी तसेच भाजी व फळांचा वापर असलेले प्रकार करता येतील घरी. गोव्यातील व तळकोकणातील अत्यंत लोकप्रिय प्रकार म्हणजे काकडीचे धोंडसे वा सांदण. रवा, काकडीचा कीस, गूळ, खोवलेला नारळ, छोटा चमचाभर बेसन, वेलची एवढे प्रकार घरी असतील तर हा पदार्थ करता येईल. आधी रवा तुपात भाजून घ्यायचा. नंतर काकडीचा कीस तुपात परतून घ्यायचा, पण त्यातील पाणी राहू द्यायचे. त्यात मग खोवलेला नारळ, गूळ, वेलदोडा पूड मिक्स करायचे. मग भाजलेला रवा त्यात मिसळून ते हलवत रहायचे. मग गॅसवरून काढून एखाद्या पसरट भांडय़ात ओतायचे आणि कुकर व इडली पात्रात ठेवायचे. काही वेळाने हा प्रकार केकसारखा फुगतो. त्यात वरून व आधी काजूचे लहान तुकडे, बदाम व पिस्त्याचे काप घातले की हे धोंडसे दिसतात सुंदर. याखेरीज याच पद्धतीने लाल भोपळा, किसलेले सफरचंद किंवा त्याचा ज्यूस, पीच या फळांचाही केक केला जातो. परदेशात याला केक नव्हे, तर पाई म्हणतात. अॅपल पाई, पीच पाई, पंपकिन पाई ही तिथली नावे. आपण पाई वजा केक बनवताना रवा, साखर वा गूळ, वेलदोडा, सुका मेवा यांचा वापर करून काकडीच्या धोंडसेसारखे या प्रकरांचे मराठीकरण करावे.

सणासुदीला आपल्याकडे श्रीखंड, बासुंदी व खीर हे प्रकार ठरलेले, पण तांदळाच्या खिरीऐवजी घरी फिरनी हा प्रकार केला तर सर्वांना आवडेल. तांदूळ दोन तास भिजवून तिचा जाडसर रवा, घट्ट दूध, साखर, वेलचीची पूड, केसर व ते नसल्यास जिलबीचा किंचित रंग आणि सुका मेवा हे साहित्य लागते. दूध चांगले गरम झाले की त्यात तांदळाची पेस्ट, साखर, वेलची पूड, सुका मेवा व केसर हे सारे घालायचे आणि मिश्रण ढवळत रहायचे. बऱयापैकी घट्ट झाले की लहान-लहान बाऊलमध्ये ते ओतायचे आणि वरून आणखी थोडा सुका मेवा. ही फिरनी गरम चांगली लागतेच, पण फ्रीजमध्ये दोन तास हे बाऊल ठेवा आणि मग थंड खा. आपण तांदळाची, रव्याची, शेवयांची, गहुल्यांची खीर बऱयाचदा करतो, पण दक्षिणेत, विशेषत केरळमध्ये मूग व मुगाच्या डाळीची गूळ, नारळाचे दूध, नारळाचे बारीक काप आणि काजू व पिस्त्याचे काप घालून जी खीर करतात, तीही अप्रतिम. ही खीर गरम व ग्लासातूनच प्यायची. तिला पायसम म्हणतात. पायसचा अर्थ पवित्र. पवित्र सणासुदीला केल्या जाणाऱया खिरीला त्यामुळेच पायसम हे नाव पडले असावे. दिवाळीच्या सणाला ही खीर करणे अगदी योग्यच ठरेल.
[email protected]