दिवाळी विशेष – सग्यासोयऱ्यांच्या आनंदाचं प्रमेय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मनाला सुखावणारा, समाधानाचे थेंब साठवणारा दिवाळी सण… प्रत्येकाच्या अंतर्मनाच्या गाभ्यात साठवून ठेवावा असा हा आनंदसोहळा साजरा करताना मनातल्या भावना व्यक्त करत आहे अभिनेत्री सोनाली कुलकर्णी

दिवाळीला समानार्थी शब्द आहे आनंद आणि कुटुंब. जगण्यासाठी अनिवार्य अशा या गोष्टी आपण सणाच्या निमित्ताने अनुभवतो. आता कुटुंबाच्या व्याख्या विस्तारत चालल्या आहेत. त्यामुळे आपली मित्रमंडळीही आपल्या जिवलगांच्या वर्तुळात सामावलेली. त्यामुळे मला असं वाटतं की वर्षभर कितीही काम केलं तरी दिवाळी कुटुंब, मित्रमंडळी यांच्यासोबत साजरी झाली पाहिजे. म्हणजे माझ्यासाठी तर हे न बदलता येणारं प्रमेय आहे.

लग्नाआधी आणि आताही दिवाळी आणि माझे जिवलग ही माझ्यासाठी अनिवार्य गोष्ट होती. त्यामुळे फार कमी वेळा म्हणजे अंगदी एक-दोनदाच दिवाळीत मी बाहेर होते. सणाच्या निमित्ताने जितक्या माणसांना आपण भेटतो तितका आपला आनंद द्विगुणित होत असतो आणि आपण एकमेकांना फक्त वेळ ही मौल्यवान गोष्ट देऊ शकतो, असे मला वाटते. माझे स्वतचे काही आनंदाचे नियम आहेत. म्हणजे माझ्यासाठी सगळय़ांनी एकत्र मिळून फराळ करायचा, फराळाचा आस्वाद घ्यायचा हे मला फार आवडते. चिरोटे, लाडू, कडबोळय़ा, चकली, लाडू हे सगळे मला आवडते. मी स्वत काही पदार्थ घरी तयार करते, काही बाहेरून ऑर्डर करते. माझ्या सासुबाईंच्या पद्धतीनुसार दिवाळीच्या पहिल्या दिवशी इडली चटणी केली जाते, तर माझ्या आईकडे दही पोहे केले जातात. मग मी फराळासोबत हे पदार्थ आलटून पालटून करते. हा रीती, संस्कृतीतला बदलही सणांच्या निमित्ताने आपण अनुभवतो. दिवाळीत रांगोळी काढणे हा माझ्यासाठी एक सुखद सोहळा असतो. फार विलक्षण अशी काही माझी रांगोळी नसते, पण नेहमी न मिळणारा मनाचा निवांतपणा मी काही क्षण का होईना त्यावेळेपुरता अनुभवते. शिवाय त्यानिमित्त केली जाणारी तयारी हा भाग आहेच. माझी दिवाळीतील अत्यंत आवडती आठवण म्हणजे आम्ही लहानपणी आमच्या कॉलनीत दिवाळीचे विशेष हस्तलिखित तयार करायचो. ‘शिशिर’ नावाचे हे हस्तलिखित म्हणजे दिवाळी अंकच असायचा. कॉलनीतील सगळय़ा सदस्यांचा सहभाग यात असायचा. कोणी चित्र काढायचे, कोण लेख लिहायचे, कुणी अंकाची सजावट करायचे. त्यामुळे ‘शिशिर’ वाचणे हा आनंददायी भाग असायचा.

िदवाळी कुटुंबासोबत साजरी करायला आवडते त्यामुळे एक-दोनदा जेव्हा दिवाळीत बाहेर जाण्याचा प्रसंग आला तेव्हा अगदी मारून मुटकून मी गेलेली आहे. म्हणजे त्यावेळी मी एकटीच लांब आणि घरचे सगळे एकत्र असणार असे फार वाईट वाटलेले तेव्हा. यानंतर एकदा दिवाळीत हैदराबामध्ये शूटिंग होते. तो दिवाळीचा अनुभव मात्र विलक्षण होता. एका मुस्लिम डॉक्टरांच्या कुटुंबात आमचे शूटिंग सुरू होते. त्यावेळी ईद आणि दिवाळी एकत्र आली होती. ऐन दिवाळीत आम्ही शिरकुर्मा खाऊन दिवाळी साजरी केली होती. मी शाकाहारी आहे हे त्यांना कळले होते. त्यामुळे माझ्यासाठी इतके सुंदर जेवणाचे ताट सजवून आणलेले होते. त्यांच्या धर्माच्या सणात आपली दिवाळीही सामावून गेली होती. अक्षरश भारावून गेले होतो आम्ही सगळे. असे पाहिले की आपल्या विचारांचा खुजेपणा आपल्या लक्षात येतो. संस्कृती कोणतीही असो सगळेच सणवार असे सगळय़ांना सामावून घेणारे आहेत आणि असायला हवेत. सहसंवेदना जपत संस्कृती जपणे हे संस्कार सणांतून रुजले पाहिजेत आणि हे जपणारे विचार आपल्या आजूबाजूला आहेत हा दिलासा बरेच काही देणारा आहे.

दिवाळी हा पारंपरिकता, संस्कृती साजरी करण्याचा सोहळा. म्हणूनच स्वतवरती कोणताही शिक्का लावून न घेता अगदी सहजपणे सण साजरे करता यायला हवेत. मी स्वत अगदी तसेच सण साजरे करते. याचा विचार करताना अगदी मनाच्या तळात जाऊन चाचपले तरी या गोष्टी आपल्याला प्रचंड आवडतात हेच उमगते, यात कोणतेही दुमत नाही. आपण ज्याला पारंपरिक गोष्टी म्हणतो त्या सगळय़ा आनंद देणाऱयाच तर आहेत. मग या आनंदाला नाक मुरडण्याचा प्रश्नच येत नाही. दिवाळी असो वा कोणताही सण प्रत्येक वेळी वेगळय़ा चष्म्यातून बघण्यापेक्षा त्यातून मिळणारा आनंद लुटण्याचा, वाटण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपले सण साजरे करण्यात कसला आलाय संकोच? आपण संवेदनशील असलेच पाहिजे, परंतु आपण त्याचा अतिरेक तर करत नाही ना हेही पाहायला हवे. आता आपल्या आजूबाजूचे वातावरण ढवळून निघाले आहे, परंतु ते फार काळ टिकणारे नाही याचे सुतोवाच हे सणवार करीत असतात.

दिवाळीसाठी सकारात्मकता हा अलीकडे आपण वापरत असलेला शब्द, परंतु दिवाळी म्हणजे आनंद, प्रेम हेच प्रमेय आपण जुळवत आलो आहोत. तुळशीपाशी लावलेला दिवा, दारासमोरचा आकाश कंदील, फराळाचे सजलेले ताट आणि सोबतीला कुटुंबाचे प्रेम ही माझी दिवाळीची व्याख्या आजवर बदललेली नाही. आनंद साजरा करण्यासाठी कोणतीही वर्गवारी न करणारा, साध्या साध्या गोष्टीतही मनाला सुखावणारा, समाधानाचे थेंब साठवणारा दिवाळी सण म्हणूनच प्रत्येकाला हवाहवासा वाटणारा आणि वाट पाहायला लावणारा वाटतो. प्रत्येकाच्या अंतर्मनाच्या गाभ्यात साठवून ठेवावा असा हा आनंदसोहळा निर्मळ, निसंकोचपणे साजरा व्हावा. शुभ दीपावली.
शब्दांकन : शुभांगी बागडे