आभाळमाया – सिंहेतील उल्का वर्षाव

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> वैश्विक,  [email protected]

दरवर्षी  17 आणि 18 नोव्हेंबरला सिंह राशीच्या पार्श्वभूमीवर पूर्वेच्या आकाशात रात्री बाराच्या सुमारास छान उल्का वर्षाव दिसतो. त्यातील उल्कांची संख्या त्यावेळच्या धूमकेतू स्थानावर अवलंबून  असते. अशा वेळी या तारखा अमावस्येला जवळ असतील आणि आकाश निरभ्र असेल तर हा उल्का वर्षाव मनोहारी दिसतो.

विल्हेम टेम्पल अणि हॉरॅस टटल यांनी 19 डिसेंबर 1865 रोजी एका धूमकेतूचे निरीक्षण करून त्याचा 33 वर्षांचा पुनरागमनाचा काळ ठरवला. म्हणून तो त्यांच्या नावे प्रसिद्ध आहे. याचा अर्थ त्यापूर्वी तो दिसत नव्हता असं नाही. गॉडफ्रीड कर्क यांनी 1699 मध्येच त्याचं उत्तम निरीक्षण केलं; परंतु त्यांना त्याचा भ्रमंतीकाळ ठरवता आला नव्हता. ‘हॅली’च्या प्रसिद्ध धूमकेतूच्या पठडीतलाच हा लंबवर्तुळाकार कक्षेतला धूमकेतू आहे. एडमंड हॅली यांनी त्या प्रसिद्ध धूमकेतूचा 76 वर्षांचा ‘पृथ्वीभेटी’चा काळ निश्चित केला. 1834, 1910 आणि 1986 मध्ये त्याची निरीक्षणं केली गेली. 1986 मध्ये तर आमच्या ‘खगोल मंडळा’ने आयोजित केलेल्या कार्यक्रमाला सुमारे 600 लोक आले होते. त्यात प्रसिद्ध लेखक अरुण साधू हेसुद्धा होते. त्यांच्याच हस्ते आमच्या ‘खगोल वार्ता’चे प्रकाशन झाले!

त्यानंतर आम्ही प्रत्येक धूमकेतूचा अभ्यास आणि छायाचित्रण करण्याचा प्रयत्न करू लागलो. 1998 मध्ये ‘टेम्पल-टटल’ 33 वर्षांनी पृथ्वीजवळून जाणार होता. त्या वर्षी सिंह राशीच्या पार्श्वभूमीवर या धूमकेतूच्या शेपटातील द्रव्यातून होणारा उत्का वर्षाव प्रेक्षणीय असणार याची कल्पना होतीच. आता तो नेहमी सिंह राशीच्याच पार्श्वभूमीवर किंवा सिंह राशीत का होतो, तर हा धूमकेतू जेव्हा पृथ्वीजवळ येतो तेव्हा त्याचा पृथ्वीच्या कक्षेला छेदण्याचा बिंदू नेमका सिंह राशीत असतो. अर्थातच तिथे त्याच्या शेपटातून जे द्रव्य बाहेर पडते ते 33 वर्षांनी त्याच्या आगमनाच्या वेळी अधिक आणि नंतरची 32 वर्षे साठलेले द्रव्य तुलनेने कमी कमी स्वरूपात पृथ्वीकडे उल्कांच्या रूपाने खेचले जाताना दिसते.

या वर्षी उद्या आणि परवा मध्यरात्रीपासून पहाटेपर्यंत सिंह राशीच्या पार्श्वभूमीवर ‘टेम्पल-टटल’च्या ‘टेल’मधून निसटलेल्या द्रव्याच्या उल्का पाहता येतील. तिथीनुसार ती अमावस्येनंतरची चतुर्थी आणि पंचमी असेल. या काळात चंद्र पश्चिम क्षितिजावर उगवेल आणि तिथेच मावळेल. प्रतिपदेची कोर तर सूर्यास्तानंतर फारच कमी वेळ दिसेल. द्वितीया किंवा बीजेची कोरही जास्त प्रकाशमान नसते. चतुर्थी-पंचमीचा चंद्र तीन ते चार तासांत मावळेल, तोही पश्चिमेलाच. त्यामुळे ढगाळ वातावरण आणि धूर, उजेडाचं प्रदूषण नसेल अशा ठिकाणी उल्का-निरीक्षणाची चांगली संधी आहे. अर्थात या वेळी उल्कांची आतषबाजी वगैरे दिसणार नाही. ती पाहायला 2031 पर्यंत वाट पाहावी लागणार आहे. कारण तेव्हा ‘टेम्पल-टटल’ धूमकेतूची पुन्हा एक फेरी होईल.

मात्र आकाश निरीक्षणाच्या सरावासाठी शक्य असल्यास विद्यार्थी मित्रांना घेऊन जरूर उल्का वर्षाव पाहायला जा. दिवाळीची सुट्टी असल्याने एखाद्या खेडय़ात जाणंही शक्य आहे. त्या वेळी अगदी पंधरा-वीस उल्का दिसल्या तरी त्याची वैज्ञानिक माहिती सर्वांना देण्याचा प्रयत्न करा.

मुळात उल्का वर्षाव होतो कसा? ‘शूटिंग स्टार’ या इंग्लिश कल्पनेवरून आपल्याकडेही ‘तारा तुटतो’ असा वाप्रचार रूढ झाला, पण वैज्ञानिक दृष्टीने तो खरा नाही. तारे सूर्यासारखे महाप्रचंड असतात. ते ‘तुटत’ नसतात. सिनेमात दाखवतात त्याप्रमाणे ‘तुमने देखा वो शूटिंग स्टार’ वगैरे म्हणण्याइतपत वेळही ‘तारा’ नव्हे, तर कोसळती उल्का देतच नाही. अक्षरशः क्षणार्धात सट्कन उल्का पृथ्वीकडे झेपावते आणि जळून जाते. ती थोडी मोठी असेल तर त्याचा जळजळीत, तेजस्वी आगीनगोलक (फायरबॉल) दिसतो. अतिशय मोठी उल्का म्हणजे महापाषाण. तो धूमकेतूच्या शेपटातून नव्हे, तर एखादा फिरस्ता अशनी असतो. आपल्या महाराष्ट्रात 52 हजार वर्षांपूर्वी पडला तसा. तो मात्र उत्पात घडवून आणू शकतो.

धूमकेतू काय ते समजलं तर उल्का वर्षाव लगेच कळेल. ‘उर्ट’ नावाच्या ग्रहमालेपलीकडच्या ‘ढगात’ लाखो धूमकेतू असतात. सूर्याच्या प्रचंड गुरुत्वाकर्षणाने ते ग्रहमालेत प्रवेश करतात. ते पृथ्वीजवळ आले की, त्यांची मोठी शेपूट दिसते. मुळात केवळ धूळ, छोटे दगड, काही वायू आणि बर्फ यांचा गोळा असलेला गोल धूमकेतू सूर्याजवळ येऊ लागला की, सौर ऊर्जेमुळे त्याचा काही भाग वितळून द्रव्य बाहेर फेकले जाते. धूमकेतू सूर्याजवळ येताना ज्या राशीच्या पार्श्वभूमीवर सौरमालेत प्रवेशतो त्या राशीत त्याचे फेकलेले द्रव्य नंतरही पडून राहते. कारण परतताना त्याला ते पुन्हा ‘गोळा’ करता येत नाही. हेच छोटे दगडगोटे मग दरवर्षी ठरावीक तारखेला ठरावीक राशीतून पृथ्वीकडे खेचले जातात. पृथ्वीपासून तीन कोटी किलोमीटर दूर जाणारा हा धूमकेतू 33 वर्षांनी 12 लाख किलोमीटर इतका जवळ येतो. 1868 मध्ये त्यातून ताशी हजार उल्का पडताना दिसल्या. 1998 मध्ये त्यातून सिंह राशीच्या पार्श्वभूमीवरून प्रथमच आलेल्या ‘फायरबॉल’सह ताशी 300 उल्का आम्हीही पाहिल्या होता. ते क्षण आजही स्मरणात ताजे आहेत!