
मोठमोठय़ा कंपन्या, उद्योगधंदे मुंबईतून गुजरातला पळवणाऱ्या केंद्र सरकारने मुंबईतील हिरे व्यापाऱ्यांनाही गुजरातला पळवले आहे. मुंबईतील 26 हिरे व्यापाऱ्यांनी मुंबईला कायमचा रामराम ठोकला आहे. 135 हिरे व्यापाऱ्यांपैकी 26 व्यापारी मुंबईतून कायमस्वरूपी कार्यालये बंद करून सुरतला स्थलांतरित झाले आहेत. आता मंगळवारी 135 व्यापारी हिऱ्यांच्या व्यवसायाला औपचारिक सुरुवात करणार आहेत. तसेच 17 डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गुजरातमधील डायमंड बाजाराचे औपचारिक उद्घाटन करणार आहेत.
सूरतमधील डायमंड बुर्स हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. सूरतच्या डायमंड बुर्समध्ये एकूण 983 कार्यालये आहेत. सूरत डायमंड बाजारामध्ये व्यापार सुरू करण्यापूर्वी, एसबीआयने 20 नोव्हेंबर रोजी डायमंड बाजारामध्ये एका शाखेचे उद्घाटन केले आहे. आता पुढच्या महिन्यात मोदींच्या हस्ते या इमारतीचे उद्घाटन होणार आहे.

























































