राहुल नार्वेकर न्याय देऊ शकतील असे वाटत नाही – संजय राऊत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासोर आमदार अपत्रातेची सुनावणी सुरू आहे. एकीकडे मिंधे गट टाईमपास करत असताना दुसरीकडे विधानसभा अध्यक्षांच्या दिल्ली भेटी वाढल्या आहेत. याचाच उल्लेख शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे.

नाशिकमध्ये माध्यमांशी बोलताना विधानसभा अध्यक्षांच्या दिल्ली भेटीबाबत विचारले असता राऊत म्हणाले की, त्यांना सातत्याने दिल्लीला जावे लागणार. कारण दिल्लीतून निर्णय काय द्यायचा याचा आदेश घेऊन ते सुनावणी करतील. संविधानानुसार सर्वकाही पार पडले असते तर सर्व आमदार आतापर्यंत घरी बसले असते. याचदरम्यान, नार्वेकर न्याय देऊ शकतील का? या माध्यम प्रतिनिधींनी विचारलेल्या प्रश्नाला राऊत यांनी नाही असे उत्तर दिले.

राहुल नार्वेकर टिब्यूनल असून मी त्यांना विधानसभा अध्यक्ष मानत नाही, असे खासदार राऊत म्हणाले. सर्वोच्च न्यायालयाने नार्वेकरांकडे ट्रिब्युनलची जबाबदारी दिली आहे. सुनावणी घ्या आणि निर्णय द्या. यालाच ट्रिब्युनल म्हणतात. विधानसभा अध्यक्षांचा आम्ही नेहमीच आदर करत आलो आहोत. पण जो व्यक्ती पदावर बसला आहे तो आदरास पात्र आहे का? कायदा आणि संविधानाचा आदर करतो का? असा सवाल राऊत यांनी उपस्थित केला.

हे वाचा – 31 डिसेंबरला सरकार पडणार, 2024 ला देशात अन् महाराष्ट्रात नवीन सरकार बसणार! – आदित्य ठाकरे

संविधानाच्या दहाव्या परिशिष्टात स्पष्ट सांगितले आहे की फुटीला कोणताही आधार नाही. हा कायदा स्पष्ट सांगतो की पक्ष सोडून गेलेल्यांना अपात्र करायला हवे. आता 1 वर्ष झाले. तारीख पे तारीख सुरू आहे. हा कायदा, हे संविधान आहे का? कोण विश्वास ठेवणार तुमच्यावर? तुम्ही संविधानाच्या चिंधड्या उडवत आहात, अशा शब्दात संजय राऊत यांनी फटकारले.

धनुष्यबाण-घड्याळ चिन्हांवर गद्दार निवडून येणार नाहीत, म्हणून शिंदे-अजित पवार गटाचे आमदार-खासदार भाजपमध्ये जाणार; संजय राऊत यांचा मोठा दावा

यावेळी किरीट सोमय्या यांनी केलेल्या कोरोना काळात मुंबईत झालेल्या कथित घोटाळ्यांच्या आरोपांनाही राऊत यांनी उत्तर दिले. राऊत म्हणाले, ते बहुतेक उत्तर प्रदेश सरकारबाबत बोलले असावे. कोरोना काळात तिथे ऑक्सिजन पुरवठा झाला नाही, प्रेतांचा खच पडला, गंगेत प्रेतं वाहून गेली. गुजरातमध्ये स्मशानात जागी नव्हती. मध्य प्रदेशमध्ये जे मृत आहेत त्यांच्यावर उपचार केल्याचे दाखवून कोट्यवधींचा घोटाळा झाला. किरीट सोमय्या यांना तेच सांगायचे असावे, पण चुकून त्यांनी मुंबईचा उल्लेख केला. कोरोना काळात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मुंबईसह महाराष्ट्राला वाचवण्यात आले. तुम्ही याबाबत जनमत घ्या. देश त्यावेळी कसा तडफडत होता आणि मुंबईसह महाराष्ट्रात उद्धव ठाकरे काय करत होते हे संपूर्ण देशाने, जगाने, डब्ल्यूएचओने पाहिले, असेही राऊत म्हणाले.