
राज्यासह परराज्यांतून 5 लाखांहून अधिक संख्येने आलेल्या भाविकांनी कार्तिकी एकादशीचा उपवास सोडून द्वादशीला परतीचा प्रवास सुरू केला आहे. एसटी बस, रेल्वे, खासगी ट्रक, टेम्पो, जीप गाडय़ांचा आधार भाविक घेत आहेत, तर मानाच्या दिंडय़ा पौर्णिमेपर्यंत पंढरीत मुक्कामी असणार आहेत. गोपाळपूर येथील गोपाळकाला पूर्ण केल्यानंतरच पालख्यांचा परतीचा प्रवास सुरू होतो.
कार्तिकी यात्रेकरिता दशमी, एकादशी व द्वादशी असे तीन दिवस पंढरपूर येथे वास्तव्यास असलेल्या भाविकांनी एकादशी साजरी करून द्वादशीला परतीचा प्रवास सुरू केला आहे. बहुतांश भाविक स्वतःच्या वाहनाने तसेच एसटी बसेस व रेल्वे प्रवास करीत असल्याचे चित्र दिसून येते. खासगी वाहनांसाठी प्रशासनाने शहर व परिसरात 18 ठिकाणी पार्ंकग व्यवस्था केलेली आहे. भाविकांची संख्या 6 लाखांपेक्षा जास्त असल्यामुळे वाहनांची संख्यादेखील वाढलेली आहे. वाहतूककोंडीचाही सामना करावा लागत असल्याचे चित्र दिसून येते. सोलापूर जिह्यात पावसाने पाठ फिरवली असली तरी यंदा जादा संख्येने भाविक आले आहेत. जिह्यातील भाविक एकादशी दिवशीच माघारी परतले आहेत.
वारीनंतर स्वच्छतेसाठी 1300 कर्मचाऱयांची नियुक्ती
कार्तिकी एकादशीच्या सोहळ्यानंतर शहरात प्रचंड अस्वच्छता निर्माण झाली असून, यासाठी नगरपरिषदेने व्यापक अशी स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे. त्यासाठी 1300 कर्मचारी 24 तास राबत आहेत. एकादशीच्या रात्रीपासूनच 24 तास स्वच्छता व कचरा गोळा करण्याचे काम हाती घेतले आहे.
शहरासह 65 एकर, नदीपात्र वाळवंट, प्रदक्षिणा मार्ग, दर्शनबारी पत्राशेड गोपाळपूर रोड, मंदिर परिसर आदी ठिकाणच्या स्वच्छतेसाठी 1300 स्वच्छता कर्मचाऱयांची नियुक्ती केली असून, यामध्ये 350 कायम, तर 950 हंगामी कर्मचारी तसेच इतर नगरपालिकेकडूनही स्वच्छतेसाठी कर्मचारी नेमण्यात आले आहेत. घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत तसेच 41 घंटागाडीद्वारेही कचरा गोळा करण्याचे काम यात्रा कालावधीत अहोरात्र चालू राहणार आहे. शहरामध्ये कचरा त्वरित उचलण्यासाठी आरोग्य विभागाकडील 4 टिपर, 2 कॉम्पॅक्टर, 1 डंपरप्लेसर, 4 डंपिंग ट्रॉलीने व जेसीबीच्या साहाय्याने दररोज 70 ते 100 टन कचरा उचलण्यात येत आहे. यात्रा कालावधीमध्ये स्थानिक नागरिकांनी व भाविकांनी आरोग्य सुव्यवस्थित राहण्यासाठी नगरपालिका प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहनही मुख्याधिकारी डॉ. प्रशांत जाधव यांनी यावेळी केले आहे.
पांडुरंग महाराज घुले यांना वारकरी पुरस्कार प्रदान
वै. ह.भ.प. तात्यासाहेब वासकर यांच्या स्मरणार्थ वारकरी संप्रदायात उल्लेखनीय कामगिरी करणाऱया विभूतीस मागील 25 वर्षांपासून ‘वारकरी पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात येते. यावर्षी 26 वा वारकरी पुरस्कार प्रसिद्ध कीर्तनकार तथा देहू येथे गाथा मंदिर उभा करून वारकरी संप्रदायाचा देश-विदेशात प्रचार करणारे पांडुरंग महाराज घुले यांना प्रदान करण्यात आला.
येथील काळा मारुती मंदिरानजीक असणाऱया वासकर वाडय़ात शंकर महाराज बडवे यांच्या हस्ते व विठ्ठल महाराज वासकर यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा पार पडला. मानपत्र, स्मृतिचिन्ह, शाल व श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. या कार्यक्रमास केशव महाराज नामदास, भागवत महाराज शिरवळकर, सोपान काका टेंभूकर, भागवत महाराज चवरे, नामदेव महाराज लबडे, वैभव महाराज राक्षे, बंडा महाराज कराडकर आदी मान्यवर उपस्थित होते.



























































