रंगपट – फक्त एकदाच… 49 प्रयोग…!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> शब्दांकन – राज चिंचणकर

ज्येष्ठ अभिनेते व नाट्यनिर्माते रणजित मसुरेकर जागवत आहेत सिनेतारका रंजना यांची रंगभूमीवरची हृद्य आठवण…

सिनेतारका रंजना म्हणजे आमच्या रंजनाताई यांनी चित्रपटसृष्टी प्रचंड गाजवली, पण त्यांना अपघात झाल्यानंतर त्या व्हीलचेअरवर गेल्या. त्यानंतर मला असे वाटले की, इतकी प्रसिद्ध अभिनेत्री सध्या घरी बसून आहे, तर त्यांच्यासाठी आपण एखादे नाटक करायला हवे. त्यासाठी मी त्यांना भेटायला गेलो. त्यांनी त्यांची सर्व परिस्थिती मला सांगितली. तीन वर्षांनी त्यांनी मला नाटकासाठी होकार दिला. त्यांना वेगवेगळी स्क्रिप्ट्स मी दाखवली. त्यातले एक स्क्रिप्ट त्यांनी मान्य केले. नाटकाचे नाव होते ‘यस, व्ही आर गिल्टी’ आणि लेखक होते प्रा. अनिल सोनार, पण नंतर आम्ही या नाटकाचे नाव बदलून ‘फक्त एकदाच’ असे केले. रंजनाताईंचा होकार येताच नाटकाच्या रिहर्सल्स आम्ही सुरू केल्या. त्यांच्या घरातच आम्ही रिहर्सल्स करत होतो. भारत तांडेल यांनी दिग्दर्शित केलेले हे नाटक माझ्या ‘प्राची थिएटर्स’ या नाटय़ संस्थेतर्फे आम्ही रंगभूमीवर आणले.

आता प्रश्न असा होता की, प्रयोगासाठी रंजनाताईंना व्हीलचेअरवरून नाटय़गृहापर्यंत कसे न्यायचे? आमचा हा प्रश्न आमच्या नाटकाच्या नेपथ्याचे काम करणारे विजय मेस्त्राr यांनी सोडवला. ते म्हणाले, ‘‘आपण रंजनाताईंच्या घरापासून लाकडाचे रॅम्प बनवून, त्यात व्हीलचेअर ठेवून त्यांना खाली घेऊन येऊ. पुढे तेच रॅम्प आपण प्रत्येक नाटय़गृहाला वापरू. त्यांची आवश्यक तशी लांबी वाढवू म्हणजे त्या-त्या नाटय़गृहात रंजनाताईंना सुखरूप नेता येईल.’’ आमचा हा प्रयोग यशस्वी झाला. माझ्या सगळय़ा बॅकस्टेजवाल्यांचा मी खूप आभारी आहे. कारण त्या सगळय़ांनी प्रत्येक प्रयोगाला ही मेहनत घेतली. ‘फक्त एकदाच’ या नाटकाचे रंजनाताईंना घेऊन मी 49 प्रयोग केले. नंतर मात्र त्यांच्या प्रकृतीने साथ न दिल्याने 50 वा प्रयोग आम्ही करू शकलो नाही.

रंजनाताईंनी या नाटकासाठी अडीच महिने तालीम केली, खूप मेहनत घेतली आणि मग हे नाटक आम्ही रंगभूमीवर आणले. रसिकांनी नाटकाचे उत्स्फूर्त स्वागत केले. प्रत्येक प्रयोगाला रंजनाताईंना आणणे आणि नेणे, या जबाबदाऱया माझ्या कलावंतांपासून बॅकस्टेजवाल्या मंडळींनी उत्तम पार पाडल्या. अनेकांनी मला विचारले की, ‘‘हे नाटक रंजना यांना घेऊन करावे असे तुला का वाटले?’’ तेव्हा मी म्हटले, ‘‘चित्रपटसृष्टीत इतके नाव केल्यावर एका अपघातामुळे ताई बाजूला फेकल्या गेल्या आहेत आणि त्यांना परत ऊर्जा देण्यासाठी मी नाटक करतोय.’’ तसेच झाले, प्रयोग सुरू झाल्यावर ताईंच्या प्रकृतीमध्ये दिवसेंदिवस फरक पडत गेला. त्यांचे शब्दोच्चार इतके अचूक होते की, आम्हाला त्यांना वेगळे काही सांगावे लागले नाही.

ज्येष्ठ नाटय़निर्माते मोहन वाघ यांच्या सगळय़ा नाटकांचे सेट्स विजय मेस्त्राr यांनीच बनवलेले होते. आमचे कष्ट पाहून मोहन वाघ त्यावेळी त्यांना म्हणाले, ‘‘लक्षात ठेव, इथे दोन वाघ आहेत. एक मोहन वाघ आणि दुसरा रणजित वाघ. रंजूला घेऊन नाटक करणे ही सोपी गोष्ट नाही. रणजितने या नाटकाचे पाच जरी प्रयोग केले तरी मी त्याला ग्रेट समजेन.’’ आमच्या या नाटकाच्या एका प्रयोगाला ज्येष्ठ अभिनेत्री संध्याबाई, म्हणजे व्ही. शांताराम यांच्या पत्नी आल्या होत्या. प्रयोग पाहिल्यानंतर त्या मला म्हणाल्या, ‘‘आज शांताराम बापू असते, तर त्यांनी तुझे खूप काwतुक केले असते.’’ त्यावेळी त्यांच्या डोळय़ांतून अश्रू वाहत होते. मला खूप धन्य झाल्यासारखे वाटले. हे नाटक केल्यानंतर रंजनाताई मला म्हणाल्या, ‘‘रणजित, या नाटकात काम करून मी एक दिवस उभी राहीन याची मला खात्री आहे.’’ मला असे वाटते की, रंजनाताईंसारख्या अभिनेत्रीसाठी मी नाटक केले याच्यापेक्षा जास्त समाधान मला इतर कुठल्याच नाटकामुळे मिळालेले नाही.