अमेरिकन ऑगर मशीन फेल; आता हातांनी खोदणार बोगदा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उत्तराखंडच्या सिलक्यारा-डंडालगाव बोगद्यात 12 नोव्हेंबरपासून अडकलेल्या 41 मजुरांना बाहेर काढण्याचे सर्व प्रयत्न फेल ठरले आहे. अमेरिकेतून आणलेली ऑगर मशीनही कुचकामी ठरली. त्यामुळे आता खोदकाम करण्यात माहीर असलेल्या रॅट मायनर्सना बोलावण्यात आले आहे. हे रॅट मायनर्स अतिशय वेगाने बोगद्याचे आडवे खोदकाम करणार आहेत. माथ्यावरूनही खोदकाम सुरू असून आतापर्यंत 32 फुटांचे खोदकाम करण्यात आले. आपत्ती निवारण पथकाने सोमवारी  अडकलेल्या ऑगर मशीनचे 13.9 मीटर लांब पार्टस् काढून घेतले.

कसे काम करतात रॅट मायनर्स…

अत्यंत अरुंद अशा जागेत जाऊन खोदकाम करण्यात या मजुरांचा हातखंडा असतो. त्यामुळे त्यांना रॅट मायनर्स असे म्हणतात. अतिशय प्रतिकुल परिस्थितीत आणि अरुंद जागेत तसेच अधिक वेगाने खोदकाम करण्यासाठी या मजुरांना विशेष प्रशिक्षण दिलेले असते. हे रॅट मायनर्स 800 मिमीच्या पाईपमध्ये घुसून खोदकाम करणार आहेत. 2-2 च्या ग्रुपमध्ये हे मजूर बोगद्याच्या ठिकाणी खोदकाम करणार आहे. 12 मीटर आडवे खोदकाम केल्यानंतर मजुरांची सुटका होऊ शकणार आहे.