
पावसाअभावी खरिपात मोठय़ा प्रमाणात नुकसान झाल्याने ज्यांच्याकडे काही प्रमाणात पाणी उपलब्ध आहे, अशा शेतकऱयांनी रब्बीची पेरणी केली आहे. ज्वारी, गहू, हरभरा आदी पिकांची पेरणी केल्यानंतर चांगले उत्पादन मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, वातावरणात बदल झाल्याने त्याचा फटका शेतकऱयांना बसत आहे.
ढगाळ वातावरण आणि पाऊस यामुळे ज्वारी, गहू, हरभरा, कांदा, तूर आदी पिके धोक्यात सापडली आहेत. तालुक्यात खरिपाचे 23 हजार 866 हेक्टर क्षेत्र असून, रब्बी हंगामात आजअखेर चारा पिके यासह जवळपास 50 टक्के क्षेत्रात रब्बीच्या पेरण्या झाल्याची माहिती तालुका कृषी कार्यालयाने दिली.
तालुक्यात ज्वारी 2567 हेक्टर, गहू 2894 हेक्टर, हरभरा 2100, मका 162 हेक्टर क्षेत्रात पेरणी झाली आहे. कमी पावसाने रब्बी पिकांची वाढ खुंटली आहे. त्यातच गेल्या चार-पाच दिवसांपासून तयार झालेल्या ढगाळ वातावरणाचा फटका बसणार आहे. अजूनही थंडी सुरू झाली नसल्याने रब्बी पिके धोक्यात आली आहेत. गेल्या काही वर्षांपासून कापसाच्या उत्पादनात तालुक्याने जिह्यासह राज्यात आघाडी घेतली होती. मात्र, यंदा पावसाळ्याच्या सुरुवातीला उशिरा पावसाला सुरुवात झाल्याने कपाशीची जवळपास 28 हजार हेक्टर क्षेत्रात पेरणी झाली. सध्या कपाशीवरील लाल्या आणि बोंड अळीच्या प्रादुर्भावामुळे कवडी तयार होऊन कापूस उत्पादक शेतकऱयांना मोठा फटका सहन करावा लागला आहे.
सध्या सात हजार ते सात हजार दोनशे रुपये प्रतिक्विंटल भावाने कापसाची खरेदी सुरू आहे. मात्र, अपेक्षित भाव नसल्याने अजूनही कापसाची म्हणावी त्याप्रमाणे आवक बाजारात दिसून येत नसल्याने शेतकऱयांना आर्थिक फटका सहन करण्याची वेळ आली आहे. तालुक्यातील सर्व सहा मंडळांत दुष्काळ जाहीर झाल्याने दुष्काळी परिस्थितीच्या संकटात देण्यात येणाऱया सवलतींची शासकीय पातळीवरून अंमलबजावणी करावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष दत्तात्रेय फुंदे यांनी केली आहे.

























































