
आर्थिक अफरातफरच्या प्रकरणात अटकेसाठी घाई करणाऱया, मात्र आरोपींच्या जामिनाच्या सुनावणीत वेळकाढूपणा करणाऱया ईडीला मंगळवारी उच्च न्यायालयाने चांगलेच फटकारले. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे भान ठेवा, वेळकाढूपणा टाळा, आजचे काम उद्यावर ढकलण्याची वृत्ती सोडा, अशा शब्दांत न्यायालयाने ईडीचे कान उपटले आणि दापोलीतील व्यावसायिक सदानंद कदम यांच्या जामीन अर्जावर युक्तिवाद पूर्ण करण्यासाठी ईडीला बुधवारचा अल्टिमेटम दिला.
दापोली येथील साई रिसॉर्टच्या बांधकामाशी संबंधित कथित आर्थिक अफरातफर प्रकरणात सदानंद कदम यांना ईडीने मार्चमध्ये अटक केली. विशेष पीएमएलए न्यायालयाने जामीन नामंजूर केल्यानंतर त्यांनी अॅड. प्रेरणा गांधी यांच्यामार्फत उच्च न्यायालयाचे दार ठोठावले आहे. त्यांच्या जामीन अर्जावर मंगळवारी न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांच्यापुढे दोन सत्रांत सुनावणी झाली. यावेळी ज्येष्ठ वकील अमित देसाई यांनी जोरदार युक्तिवाद करीत ईडीच्या कारवाईवर तीव्र आक्षेप घेतला. पर्यावरण संरक्षण कायद्याच्या ज्या कलमांतर्गत आरोप केला जात आहे, तो प्रेडिकेट गुन्हा नसतानाही सदानंद कदम हे मागील नऊ महिने तुरुंगात आहेत, याकडे लक्ष वेधत अॅड. देसाई यांनी उच्च व सर्वोच्च न्यायालयाच्या विविध निकालांचा संदर्भ दिला. त्याची न्यायालयाने गंभीर दखल घेतली. यावेळी ईडीतर्फे युक्तिवाद करण्यासाठी वेळ मागण्यात आला. त्यावर संतापलेल्या न्यायालयाने वेळकाढूपणा करणाऱया ईडीचे चांगलेच कान उपटले.
आज सलग सुनावणी
जामीन अर्जावरील सुनावणीला दिरंगाई होता कामा नये, यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे स्पष्ट निर्देश आहेत. या निर्देशांची तुम्हाला जाणीव नाही का? तुम्ही खरंतर आजच युक्तिवाद पूर्ण करायला हवा होता, मात्र हे काम उद्यावर ढकलले आहे. उद्याच्या एका दिवसात युक्तिवाद पूर्ण करा, तुमचा वेळकाढूपणा न्यायालयाला मान्य नाही, असे सुनावत न्यायालयाने सदानंद कदम यांच्या जामीन अर्जावर बुधवारी सलग सुनावणी निश्चित केली. यावेळी न्यायालयाच्या सक्त निर्देशानुसार युक्तिवाद पूर्ण करण्यासाठी अतिरिक्त सॉलिसिटर जनरलना हजर राहावेच लागणार आहे. न्यायालयाने सदानंद कदम यांच्या अर्जावर वेळीच निर्णय देणार असल्याचे संकेत दिले.

























































