बीडीडी पुनर्विकासात दुकानाच्या बदल्यात घर, म्हाडाची हायकोर्टात हमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बीडीडी चाळ पुनर्विकासात येथील ज्या दुकानदारांना दुकानाच्या बदल्यात घर हवे असेल त्यांना अन्य भाडेकरूंप्रमाणे 500 फुटांचे घर दिले जाईल, अशी हमी म्हाडाने मंगळवारी उच्च न्यायालयात दिली. त्यामुळे दुकानाच्या बदल्यात घर हवे असलेल्या दुकानदारांना दिलासा मिळाला आहे.

न्या. गौतम पटेल व न्या. कमल खथा यांच्या खंडपीठासमोर म्हाडाचे वकील मिलिंद साठये व प्रकाश लाड यांनी ही हमी दिली. ज्या दुकानदारांना पुनर्विकासात घर हवे आहे त्यांनी तसा अर्ज म्हाडाकडे करावा. त्यांना घर दिले जाईल, असे म्हाडाकडून स्पष्ट करण्यात आले.

रहिवाशांप्रमाणे 500 चौ. फुटांचे दुकान मिळायला हवे, अशी मागणी करणारी याचिका बीडीडी चाळ दुकानदार संघाने केली आहे. या मुद्दय़ावर युक्तिवाद करण्यासाठी किमान अर्ध्या तासाचा वेळ द्यावा, अशी विनंती वरिष्ठ वकील अनिल अंतुरकर यांनी संघाच्या वतीने केली. बीडीडी चाळींचा पुनर्विकास झाला व इमारत उभी राहिली तर आमच्या मागणीला काहीच अर्थ राहणार नाही, असेही अॅड. अंतुरकर यांनी न्यायालयाला सांगितले. त्याची नोंद करून घेत न्यायालयाने ही सुनावणी 7 डिसेंबर 2023 पर्यंत तहकूब केली.

काय आहे प्रकरण

बीडीडी चाळ दुकानदार संघ व अन्य यांनी वरिष्ठ वकील अनिल अंतुरकर व अॅड. प्रथमेश भरगुडे यांच्यामार्फत याचिका केली आहे. वरळी, नायगाव, ना. म.जोशी मार्ग व शिवडी येथील बीडीडी चाळीत एकूण 16000 घरे आहेत. त्यातील 300 हून अधिक घरांना केवळ दुकानांसाठी परवाना मिळाला आहे. आमची जागा निवासी खोलीप्रमाणे 160 चौ. फुटांची आहे. पुनर्विकासात आमच्या सोबत दुजाभाव केला जात आहे, असा आरोप याचिकेत करण्यात आला आहे.

घर 500 फुटांचे, दुकान 160 फुटांचे का?

160 चौ. फुटांच्या घराच्या बदल्यात पुनर्विकासात 500 फुटांचे घर दिले जाणार आहे. आम्हाला 160 चौ. फुटांचा गाळा दुकानासाठी मिळणार आहे. हे चुकीचे आहे. बीडीडीतील पोलिसांना पुनर्विकासात 500 चौ. फुटांचे घर मिळणार आहे. बीडीडी चाळ परिसरातील झोपडीला पुनर्विकासात 300 चौ. फुटांचे घर मिळणार आहे. झोपडपट्टीधारक अधिकृत भाडेकरू नसताना त्यांना 300 फुटांचे घर मिळत आहे. आम्हाला 500 चौ. फुटांचे दुकान पुनर्विकासात मिळायला हवे, अशी प्रमुख मागणी याचिकेत करण्यात आली आहे.