
>>संजय मोने
अज्या ऊर्फ अजितपासून त्याचा ‘दादासाहेब’ होण्यापर्यंतचा प्रवास त्याने वेगळ्या पद्धतीने आत्मसात केला होता. आपल्या आगळ्या गुणकौशल्याने मिळवलेली ‘दादा’ किंवा ‘दादासाहेब’ ही पदवी तो एखाद्या डिग्रीसारखी मिरवत असे. या डिग्रीचा आब राखणं तसं फार कठीणही नव्हतं. पण…
या अज्याला मी ‘अज्या’ म्हणू शकत नाही. कारण आमच्या आधीच्या पिढीत तो जन्माला आला. साधारण पन्नासच्या दशकात. सधन आणि म्हणूनच उर्मट अशा सत्ताधाऱयाच्या घरात त्याचा जन्म झाला. त्याचे वडील शेतकरी होते. भाऊसाहेब म्हणायचे त्यांना. तसा साधासुधा माणूस. अज्याला आई होती. तिच्या नावावर काही जमीनजुमला होता. त्या काळातल्या एका शिक्षण संस्थेची ती पदाधिकारी होती, पण माऊलीने संस्थेची कचेरी उभ्या जन्मात कधीही पाहिली नव्हती. महिना-पंधरा दिवसांत काही फायली घरी यायच्या, त्यावर ती नवरा सांगेल तिथे आपला अंगठा उमटवायची. भाऊसाहेबांना एकंदर तीन अपत्ये. सगळ्यात मोठा दिलीप ऊर्फ दिल्या आयतोबा. त्यानंतर सरला आणि सगळ्यात शेवटी आजच्या लेखाचा मुख्य विषय अज्या ऊर्फ अजित.
सगळ्यात शेवटचं अपत्य म्हणून आधीच्या मुलांच्या इतकाच जल्लोष त्याच्या जन्मानंतर झाला. अजित हे नाव सुरुवातीला काही काळ होतं. शाळेत गेल्यावर त्याचा ‘अज्या’ झाला. मात्र काही काळानंतर तो ‘दादासाहेब’ या नावाने ओळखला जाऊ लागला, पण ते नंतर. यथावकाश अज्या शाळेत जाऊ लागला. बऱयापैकी मार्कबिर्कही त्याला मिळू लागले. शाळेत असताना तो त्याच्या वर्गातल्या मुलांच्या काही समस्या, त्या-त्या वयात ज्या काही असतात त्या सोडवायचा. उदा. शाळेला एखाद्या दिवशी सुट्टी हवी असेल तर एक छोटेखानी मोर्चा काढणे, सुट्टी हवी असल्याबद्दल घोषणा देणे इत्यादी कामात त्याचा पुढाकार असायचा. मात्र स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन, गांधी जयंती वगैरे दिवशी एखादं फर्डे भाषणही तो ठोकून द्यायचा. गावात काही गोष्टी एकत्र येऊन करायच्या असतील, त्यातही त्याचा हिरिरीने पुढाकार असायचा. कुठे कोणी आजारी पडलं तर त्याला जिह्याच्या हॉस्पिटलात नेणं, मग ते कितीही रात्री बेरात्री असो, तो तत्परतेने करायचा. या सगळ्यादरम्यान तो एक महाविद्यालयीन तरुण झाला आणि पुण्याला शिकायला गेला.
शिक्षणाबरोबर तो इतर गोष्टीही शिकत गेला. रात्री-बेरात्रीची जागरणं, कॉलेजात असताना निवडणुकांमुळे होणाऱया मारामाऱया (ज्यात तो स्वत कधीच नसायचा. पण इतरांकडून तो घडवून आणायचा. इतरांच्या माध्यमातून. हा ‘माध्यमातून’ शब्द त्यानेच निर्माण केला, जो आज सगळ्या वाहिन्यांवर रूढ झाला आहे) हे सगळं त्याने पुरेपूर आत्मसात केलं होतं. बघता बघता त्याच्या कॉलेजमधली तीन वर्षं आता संपत आली होती. या वेळी तो पहिल्यांदा स्वत कॉलेजच्या निवडणुकीत उतरला. आधीची तीन वर्षं त्याने आजूबाजूची परिस्थिती नीट पाहून ठेवली होती. गावात जसा तो सगळ्यांच्या उपयोगी पडायचा तसाच कॉलेजातही त्याने अनेकांना मदत केली होती. याच सुमारास त्याला ‘दादा’ किंवा ‘दादासाहेब’ ही पदवी चिकटली आणि ती तो एखाद्या डिग्रीसारखी मिरवत असे. मुलीबिलींच्या भानगडीत तो कधी पडला नाही. कारण त्याला यासाठी पुढचं आयुष्य पडलेलं असल्याचं भान होतं. एका दुसऱया विरोधी राजकीय पक्षाच्या लोकप्रिय विद्यार्थी संघटनेच्या मोठय़ा नेत्याचा पराभव करून त्याने आपलं अस्तित्व जाणवून द्यायला सुरुवात केली होती. आता तो आपल्या गावाहून पुण्यात जवळपास स्थायिक झाला होता. कुठून आणि कसं माहीत नाही, पण त्याचं घर झालं होतं. दोन-तीन ठिकाणच्या संस्थांमध्ये तो होता. एका जागेच्या बाबतीत मालकांमध्ये काही वाद चालला होता, तो त्याने सोडवून दिला. त्यासाठी एकाला गप्प करावं लागलं होतं आणि त्याचा खूप मोठा मोबदला त्याने मिळवला. त्या सगळ्या प्रकरणात मूळ मालक गायब झाला. त्याचा पुढे काहीही पत्ता लागला नाही. त्याला गायब करण्याची जबाबदारी ज्या माणसावर सोपवली होती तो तुरुंगात गेला होता, पण त्याच्या कुटुंबाचा सगळा खर्च त्यानेच केला. त्याच्या वयात आलेल्या मुलाला युवा शक्तीचा उपाध्यक्ष केला. अध्यक्ष अर्थात अज्याच होता. यादरम्यान दोन गाडय़ाही त्याच्या पदरी होत्या. अर्थात त्याच्या नावावर त्यातली एकही नव्हती. आता त्याचे आईवडील आणि भावंडेही त्याला ‘दादासाहेब’ म्हणू लागले होते. पुण्याच्या पालकमंत्र्यांशी त्याची घसट वाढली होती.
एका हॉटेलमध्येही त्याने गुंतवणूक केली. त्यालाही आता वर्ष होऊन गेलं. लोकसभेच्या निवडणुकीला त्याने केलेलं काम वरपर्यंत पोहोचलं होतं. ती निवडणूक त्याला काही कोटी रुपये मिळवून चांगलीच फळली होती. त्याचा भाऊही गावाकडून निवडून आला होता. बहिणीचा नवराही बँकेच्या संचालकांपैकी एक होता. त्याचा एक विरोधक अचानक कुठे दिसेनासा झाला तेव्हा विरोधकांनी थोडाफार दंगा केला, पण त्याने त्या सगळ्याकडे दुर्लक्ष केले. निवडणूक लढवून तो आता आमदार झाला होता. लाल दिव्याची गाडी, रेस्ट हाऊस, आजूबाजूला असणारे लोक, गर्दी या सगळ्याची त्याला आता सवय झाली होती. दिवसाचे अठरा तास तो काम करायचा.
गावाकडे त्याने बरीच माया जमवली होती. आता त्याला घरचेही वचकून राहू लागले होते. नुकतंच त्याने एका माणसाला, (आता तो त्याचा कार्यकर्ता झाला होता) खुनाच्या आरोपातून सोडवून नगरसेवक म्हणून निवडूनही आणलं होतं. त्या बदल्यात त्याने पुण्याजवळच बरीच जमीन खरेदी केली होती. त्याचा मोठा भाऊ दिलीप आयतोबा त्याची देखभाल करू लागला. त्यामुळे आता त्याच्या सगळ्या आयुष्याचा प्रश्न निकालात निघाला. एका हिंदी मालिकांमधून काम करणाऱया तारकेबरोबर त्याची मैत्रीही चर्चेत होती. पण त्याने नेहमीप्रमाणे त्या चर्चेकडे लक्ष दिलं नाही. बदल्यात त्याने आपल्या मोठय़ा भावाचं लग्न एका अतिशय देखण्या मुलीबरोबर करून दिलं आणि तिला महिला शाखेची पदाधिकारी केलं. त्याचा स्वभाव तसा उमदा होता. दिसायलाही तो देखणा होता. सगळ्या व्यापातून वेळ काढून नियमित व्यायाम करायचा त्याचा नेम कधी चुकला नाही. काही कलावंत त्याचे मित्र होते. त्यांच्याबरोबर तो अनेक वेळा असाच गप्पा मारायलाही वेळ काढायचा. सर्व पक्षांतले आमदार त्याचे मित्र होते. श्रीमंत माणसांची कामं तो फारच वेगात निकालात काढायचा. नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षात त्याने 153 कोटी उत्पन्न असल्याचा दाखला दिला होता. काही काळातच मंत्रीपदाची शपथ घेताना त्याचा ऊर भरून आला होता. त्याच्याकडे असलेल्या वीस-पंचवीस आमदारांचा गट हे त्याला मंत्रीपद मिळवून द्यायला कारणीभूत होतं.
त्याची हजारो कोटीची मालमत्ता परदेशातल्या बँकेत असल्याची बोंब उठली, पण तो शांत होता.भविष्यात सर्वात योग्य आणि लायक माणूस म्हणून तो मुख्यमंत्रीपदी विराजमान होईल. त्याला आता फार वेळ उरला नाही. असा हा अज्या ऊर्फ दादासाहेब. काही कारणाने मी त्याला भेटलो तेव्हा त्याने आमच्या व्यवसायाबद्दल काय करता येऊ शकतं याबद्दल दीर्घ चर्चा केली. त्याचा त्याबद्दलचा अभ्यास फार सखोल होता. चर्चा संपताना तो म्हणाला,
“त्या अमुक अमुक बाई सध्या काय करतात? एकदा आमची भेट घडवा!”
ती वेळ मी येऊ दिली नाही आणि देणारही नाही.
रेखाचित्र : संजय मिस्त्री
[email protected]





























































