
>> शब्दांकन – राज चिंचणकर
अभिनेता वैभव सातपुते सांगत आहे, रंगकर्मी विजय चव्हाण यांच्या निमित्ताने घडलेला एक प्रसंग.
नाटय़ व सिनेसृष्टीचे ‘विजू मामा’ म्हणजेच विजय चव्हाण या दिग्गज कलाकारासोबत काम करण्याची संधी, मला ‘ऑन डय़ुटी 24 तास’ या सिनेमाच्या निमित्ताने मिळाली. त्यावेळी मामांसोबत छान दोस्तीच झाली होती. 25 दिवस आम्ही एकत्र होतो. सिनेमाचे शूट संपले आणि ‘कविता’ या माझ्या नाटकाच्या तालमी बोरिवलीत सुरू झाल्या. एकदा आमची तालीम चालू असताना कळले की, खाली नाटय़गृहात विजू मामांच्या ‘जळू बाई हळू’ नाटकाचा प्रयोग सुरू आहे. तालमीत ब्रेक झाल्यावर मी तडक मामांना भेटायला गेलो. प्रयोग सुरू होता. मामा मेकअप रूममध्ये बसले होते. थोडय़ा टेन्शनमध्ये वाटले. मामांनी मला पाहून ‘अरे, वैभ्या’ अशी हाक मारली. त्यांच्या पाया पडत असतानाच ते म्हणाले, ‘बरं झालं आलास ते. प्रयोग कर.’
एक क्षण मला काही कळलेच नाही. मामा मला हाताला धरून तडक विंगेत घेऊन गेले आणि म्हणाले, ‘ते बघ. अंकुश धावडे या नाटकातल्या कलाकाराला कावीळ झाली आहे. त्यांना उभेही राहता येत नाहीय आणि आज दिवसभरात तीन प्रयोग आहेत. आत्ता हा इथे सुरू आहे, दुपारी वाशी आणि रात्री वांद्रे येथे कॉन्ट्रक्ट शो! जाम टेन्शन आले आहे. काहीही कर, तू उभा रहा.’ मी मामांना म्हटले, ‘मी असा कसा उभा राहू? मला काहीच माहिती नाही नाटकाबद्दल.’ त्यावर मामा म्हणाले, ‘हे बघ, आता दुसरा अंक सुरू आहे. हा प्रयोग मी मारून नेतो. तू पुढचे दोन प्रयोग सांभाळ. तोवर तुझी तालीम आटप आणि माझ्या गाडीत येऊन बस. आपण जाता-जाता वाक्ये बोलून घेऊ.’ हे ऐकून मी तर उडालोच. पण नाही म्हणून चालणार नव्हते.
माझी तालीम संपवून खाली आलो. प्रयोग संपला होता. किशोरी अंबिये, सारा श्रवण, गौरव मोरे, मी आणि विजू मामा असे आम्ही त्यांच्या गाडीत बसलो. प्रवासात सगळ्यांनी मला नाटकातल्या त्या ‘दळवी’ या पात्राची वाक्ये सांगितली. ते नाटक संतोष पवार यांनी दिग्दर्शित केले असल्याने त्यात सर्वकाही ‘एनर्जेटिक’ होते. मी वाक्ये टिपून घेतली. बोरिवली ते वाशी हे तसे मोठे अंतर. त्यामुळे चर्चेला वाव मिळाला. वाशीला पोहोचलो. रविवार असल्याने बुकिंगही तगडे होते. मी प्रथम अंकुश धावडे यांच्या मापाचे कपडे घालून पाहिले, पण ते घट्ट झाले. मात्र तिथल्या तिथे सर्व मॅनेज करण्याशिवाय गत्यंतर नव्हते. पटकन मेकअप उरकून घेतला. मामांना आदराने चरणस्पर्श केला आणि म्हणालो, ‘मामा, काही चुकले तर सांभाळून घ्या.’ तिसरी घंटा झाली, प्रयोग सुरू झाला. मनात आले की, संधी वारंवार मिळत नाही. त्यांनी ठेवलेल्या विश्वासाला आपल्याला पात्र ठरायचे आहे.
माझी एन्ट्री आली, स्टेजवर गेलो आणि सगळी वाक्ये न चुकता बोललो. पहिला अंक संपला. मध्यांतरात मामा म्हणाले, ‘वैभ्या, मिळाले तुला.’ दुसरा अंकही चोख केला. मामांनी मिठी मारली. रात्रीचा प्रयोगही उत्तम झाला. मामांचा निरोप घेण्यासाठी गेलो तर मामा समोरून उठून आले. एक मोठ्ठा नट हात जोडून उभा होता. माझ्या डोळ्यांत पाणी होते. मामा म्हणाले, ‘वैभ्या, वाचवलेस रे बाबा.’ वास्तविक मी फार काही केले नव्हते. कलाकार म्हणून मी माझे कर्तव्य पार पाडले होते. विजू मामांचा ‘फॅन’ कोण नाही? आता तर त्यांनी अशा वागण्याने मनात घर केले. माणसे उगीच का मोठी होत असतात? हा अनुभव मला खूप काही शिकवून गेला. पुढे काही दिवसांनी अंकुश धावडे यांचे निधन झाल्याची बातमी मला कळली. वाईट वाटले. मग मीच पुढे ते प्रयोग करू लागलो. प्रयोगाला येऊन त्या पात्राचे कपडे घालताना मन सुन्न व्हायचे. या नाटकाचे मी 35 प्रयोग केले. माझ्या मनावर कायम कोरली गेली आहे ती ही आठवण आणि कुणाच्या तरी जाण्याने माझ्या वाटय़ाला आलेला ‘जळू बाई हळू’ नाटकातला ‘दळवी’…!

























































