
>> डॉ. ऋषिकेश कांबळे, [email protected]
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देश समृद्ध करण्याच्या दृष्टीने काही ठोस पावलं उचलली होती. त्यातील महत्त्वाचं पाऊल म्हणजे शेतकऱयांचे प्रश्न समोर ठेवून देशातील नद्या जोडण्याचा संकल्प त्यांनी केला होता. हिमालयात उगम पावणाऱया नद्या परस्परांना जोडून त्यांचं पाणी मध्य भारत म्हणजे महाराष्ट्रापर्यंत आणून देशातील शेती समृद्ध करता येऊ शकते असं त्यांचं ठाम मत होतं. शेती समृद्ध झाली पाहिजे, शेतकरी सुखी झाला पाहिजे आणि पर्यायाने शेतमजूरसुद्धा सुखी झाला पाहिजे. त्यासाठी महाराष्ट्रात उगम पावणाऱया नद्या दक्षिण भागात वाहतात. नदीजोड प्रकल्पातून नद्यांना मुबलक पाणी आल्यास संपूर्ण देश सिंचनाखाली आणण्यासाठी बाबासाहेबांच्या संकल्पनेतील नद्या परस्परांना जोडल्या गेल्यास अवघा देश सिंचनाखाली येऊन पाण्याचा प्रश्न सुटू शकतो.
हिंदुस्थानच्या जडणघडणीत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान आहे हे नव्याने सांगण्याची आवश्यकता नाही. डॉ. बाबासाहेब दलित आणि बहुजनांचे नेते होते. 1932 ला महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यात स्वतंत्र की संयुक्त मतदारसंघ याबाबत संघर्ष झाला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दलित, पददलित, बहुजनांच्या हिताच्या दृष्टीने केलेली स्वतंत्र मतदारसंघाची व्यूहरचना गांधीजींना कळत होती. पण, स्वतंत्र मतदारसंघामध्ये दोन प्रकारचे प्रतिनिधित्व गृहीत धरलेले होते. एखादा मतदारसंघ एससीसाठी राखीव असल्यास त्या मतदारसंघातील एससीचेच मतदार त्यांचा प्रतिनिधी निवडतील. पण, त्या मतदारसंघात एससी मतदाराशिवाय भिन्न जाती-धर्माचे मतदार असू शकतील अशी संरचना होती, हे गांधींना कळत होते. म्हणून गांधीजींनी कडवा विरोध करून ते प्राणांतिक उपोषणाला बसले आणि बाबासाहेबांना स्वतंत्र मतदारसंघाचा हट्ट सोडून संयुक्त मतदारसंघाच्या मसुद्यावर सही करावी लागली.
पुणे करारानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर दलित आणि बहुजनांच्या हिताच्या दृष्टीने विचार करीत होते. परंतु, ते फारसे कडवे राहिलेले नव्हते. मग प्रश्न असा आहे की, बाबासाहेबांनी कोणती भूमिका घेतली होती? तेव्हा असं लक्षात येईल की, ते समस्त देशाच्या जडणघडणीच्या दृष्टीने विचार आणि कृती करत होते. 1937 च्या निवडणुकीत बाबासाहेबांच्या स्वतंत्र मजूर पक्षाच्या 16 जागा निवडून आल्या होत्या. 1938 नंतर बाबासाहेब ब्रिटिशप्रणीत मंत्रिमंडळात सहभागी झाले. तेव्हा त्यांनी रचनात्मक अशा काही घटना घडविल्याची इतिहास साक्ष देतो.
डॉ. आंबेडकरांनी देश समृद्ध करण्याच्या दृष्टीने काही ठोस पावलं उचलली होती. त्यातील महत्त्वाचं पाऊल म्हणजे शेतकऱयांचे प्रश्न समोर ठेवून देशातील नद्या जोडण्याचा संकल्प त्यांनी केला होता. हिमालयात उगम पावणाऱया नद्या परस्परांना जोडून त्यांचे पाणी मध्य भारत म्हणजे महाराष्ट्रापर्यंत आणून देशातील शेती समृद्ध करता येऊ शकते, असं त्यांचं ठाम मत होतं. शेती समृद्ध झाली पाहिजे, शेतकरी सुखी झाला पाहिजे आणि पर्यायाने शेतमजूरसुद्धा सुखी झाला पाहिजे त्यासाठी महाराष्ट्रात उगम पावणाऱया नद्या दक्षिण भागात वाहतात. नदीजोड प्रकल्पातून नद्यांना मुबलक पाणी आल्यास संपूर्ण देश सिंचनाखाली आणण्यासाठी बाबासाहेबांच्या संकल्पनेतील नद्या जोडल्या गेल्यास अवघा देश सिंचनाखाली येऊन पाण्याचा प्रश्न सुटू शकतो. त्यांच्या प्रयत्नांमुळे दामोदर डॅम किंवा भाक्रा नांगल धरण उभे राहिले. त्यामुळे उत्तरेकडील पाच राज्यांचा पिण्याचे पाणी आणि सिंचनाचा प्रश्न सोडवला गेला.
1964 मध्ये दामोदर डॅमच्या लोकार्पणात पंतप्रधान जवाहरलाल नेहरू असे म्हणाले होते की, आपण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे ऋणी असले पाहिजे. केवळ त्यांच्या प्रयत्नामुळे दामोदर डॅम तयार झाल्याने जवळपास पाच राज्ये सिंचनाखाली येतील आणि त्यांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही निकालात निघेल.
डॉ. आंबेडकर यांना राष्ट्राच्या समृद्धीची दृष्टी होती. त्यामुळे ते राष्ट्रपुरुष म्हणून ग्राहय़ धरावेच लागतील. बाबासाहेबांनी लढवलेल्या एका केसमध्ये महर्षी धोंडो केशव कर्वे यांचे चिरंजीव रघुनाथराव कर्वे यांनी त्यांच्या ‘समाज स्वास्थ्य’ मासिकात लिहिलेले हायस्कूलपासून लैंगिक शिक्षणाची गरज व्यक्त करणारे लेख खूप वादग्रस्त ठरले. त्यामुळे कर्वेंच्या विरोधात खटला न्यायालयात गेला. कर्वे यांना एकही ब्राह्मण वकील मिळाला नाही म्हणून ते कोल्हापूर संस्थानात माधवराव बागलांकडे गेले. बागल यांनी डॉ. बाबासाहेबांना न भेटता इकडे कशाला आलास, असे म्हणत एक पत्र कर्व्यांच्या हाती दिलं. ते त्यांनी बाबासाहेबांकडे दिले. बाबासाहेब म्हणाले की, तू लिहिलेले अग्रलेख आणून दाखव. त्यानंतरच मी वकीलपत्र घ्यायचं की नाही त्याचा विचार करेन. तीनही अग्रलेख वाचल्यानंतर कर्व्यांची भूमिका राष्ट्रहिताच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची असल्याचे लक्षात येताच त्यांनी वकीलपत्र घेतलं. मात्र, ही केस ते हरले. बाबासाहेबांनी त्यांच्या आयुष्यात लढलेल्या 98 केसेसधील ही एकमेव पराभूत झालेली केस ठरली. बाबासाहेबांना केस हरल्याचं वाईट वाटलं. ही केस ते जर जिंकले असते तर कदाचित तेव्हापासून शिक्षणव्यवस्थेत लैंगिक शिक्षण आवश्यक करता येऊ शकले असते. मात्र, तसं झालं नाही.
कामगार कायदे केवळ बाबासाहेबांमुळे अस्तित्वात आले. ब्रिटिशकाळात कामगारांच्या कामाचे तास बारा होते. बाबासाहेबांचं श्रमशक्तीचं आकलन अतिशय उत्तम होतं, कोणतीही व्यक्ती इफेक्टिव्ह म्हणजे परिणामकारक आणि इफिशियंट म्हणजे सक्षमपणे किती तास काम करू शकते, याचा सूक्ष्म अभ्यास त्यांनी केला. साडेतीन तास कोणतीही व्यक्ती प्रभावीपणे आणि क्रियाशीलतेने काम करू शकते. एक तासाचा अवकाश दिल्यास पुन्हा साडेतीन तास व्यक्ती उत्तम काम करू शकते, हे मानसशास्त्र बाबासाहेबांनी जाणलं आणि कामगारांच्या कामाच्या आठ तासांचा कायदा केला.
घटना समितीची निवडणूक झाली, तिथपर्यंत जो कर भरत असे तो आणि जो कमीत-कमी चौथी पास आहे, अशांनाच मतदानाचा अधिकार होता. सामान्यांना मतदान करणे दुरापास्त होतं. असे असताना जो देशाचा नागरिक म्हणून जन्माला आलेला आहे आणि 18 वर्षांपेक्षा अधिक वयाची आहे, अशी प्रत्येक व्यक्ती स्त्राr असो की पुरुष, कोणत्याही जाती-धर्माची असो केवळ या देशाचा नागरिक असो तो मतदार झाला, तो फक्त बाबासाहेबांमुळेच.
1947 ला आपण ब्रिटिशांच्या मगरमिठीतून मुक्त झालो. 26 नोव्हेंबर 1949 ला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला संविधान दिलं आणि समतेचे सूत्र मांडत स्त्रियांनासुद्धा मतदानाचा अधिकार दिला. जगभरातील इतिहास ज्या ब्रिटिश लोकशाहीचा गौरव करतो, त्या ब्रिटिशांच्या ग्रेट ब्रिटनमध्ये 1958 पर्यंत स्त्रियांना मतदानाचा अधिकार नव्हता, तो बाबासाहेबांनी 1950 मध्ये आपल्या देशातील महिलांना दिला. ही आभाळाएवढी घटना डॉ. बाबासाहेबांनी देशाच्या उभारणीसाठी केलेलं कार्य म्हणून इतिहाससिद्ध आहे. देशाची फाळणी झाली, तेव्हा बाबासाहेबांनी पत्रपरिषदेत देशातून पाकिस्तानात जाणारं नद्यांचं पाणी रोखलं पाहिजे, असं सांगितलं. तेव्हा बॅरिस्टर जीनांना पाण्यासाठी 21 ऑगस्ट 1947 रोजी युनोत युक्तिवाद करावा लागला. असे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे राष्ट्रप्रेम होते. 6 डिसेंबर 1956 या दिवशी उज्ज्वल आणि संपन्न देशाचं स्वप्न पाहणारा एक महापुरुष आपल्यातून निघून जातो, याचं अपार दुःख देशातील कोणत्याही नागरिकाला निश्चितपणे झालं पाहिजे.



























































