‘मिचाँग’ वादळ आंध्र प्रदेशात धडकले; 12 जणांचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बंगालच्या उपसागरात 2 डिसेंबर रोजी निर्माण झालेले मिचाँग वादळ आंध्र प्रदेशात धडकले. ताशी तब्बल 100 किलोमीटर वेगाने वाहणाऱया वाऱयाच्या तडाख्यामुळे दुपारी 1 वाजता बापटला येथे नेल्लोर-मछलीपट्टणम येथे भूस्खलन झाले. त्यानंतर दोनच तासांत वादळाचा जोर ओसरला आणि ते पुढे सरकले. या वादळाच्या प्रभावामुळे चेन्नईत पावसाचा कहर जारी आहे. मुसळधार पावसामुळे आतापर्यंत 12 जणांचा मृत्यू झाला आहे.

पावसाचा सर्वाधिक प्रभाव आंध्र प्रदेश आणि तामीळनाडूत दिसला. दोन्ही राज्यांत 100 हून अधिक लांब पल्ल्याच्या गाडय़ा रद्द झाल्या, तर 50 हून अधिक विमान उड्डाणे रद्द करण्यात आली. पाऊस आणि वादळामुळे जीवितहानी होऊ नये तसेच नागरिकांना तत्काळ मदत मिळावी यासाठी आंध्र प्रदेशातील किनारी भागात एनडीआरएफ आणि एसडीआरएफची पथके तैनात करण्यात आली असून या पथकांनी दोन दिवसांत तब्बल 9 हजारांहून अधिक नागरिकांना सुरक्षित स्थळी पोहोचवले.

दोन दिवसांत तीन महिन्यांचा पाऊस

तामीळनाडूमध्ये मिचाँग वादळाने रविवारी दुपारी कहर केला. अवघ्या दोनच दिवसांत पावसाने तीन महिन्यांची कसर भरून काढल्याचे तामीळनाडूच्या मुख्य सचिवांनी सांगितले.
– वादळाचा प्रभाव आणखी दहा दिवस राहील असे हवामान विभागाने म्हटले आहे. आंध्र प्रदेशात उद्या रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
– तामीळनाडूत किनारी भागात रेड अलर्ट असून एनडीआरएफची 7 पथके तैनात करण्यात आली आहेत.