
>> अभय मिरजकर
सुमारे 45 मीटर उंचीपर्यंत वाढणारा डेरेदार, घनदाट आणि थंडगार सावली देणारा वृक्ष म्हणून कदंब वृक्ष ओळखला जातो. याची फुले अतिशय मोहक आणि सुगंधित असतात. कदंब वृक्ष हा शततारका या नक्षत्राचा आराध्य वृक्ष आहे. श्रीकृष्णाचा अत्यंत आवडता वृक्ष म्हणून याची ओळख आहे. ढगांचा गडगडाट ऐकल्यावरच कदंब फुलतो, असे म्हणतात.
दीर्घायुष्य असणारा कदंब 100 वर्षांपेक्षा अधिक काळ जगतो. फळे लहान असताना हिरवी आणि पिकल्यावर पिवळी दिसतात.
हिंदुस्थानसह बांगलादेश, इंडोनेशिया, श्रीलंका, कंबोडिया, लाओस, नेपाळ, म्यानमार, फिलिपाईन्स, मलेशिया, पापुआ न्यू गिनी आणि ऑस्ट्रेलिया आदी देशांमध्ये हा लोकप्रिय आहे. निओलामार्किया, कादंब, बुर फ्लावर ट्री, ऑटोसेफेलस, जंगली सिंचोना, मे वृक्ष असेही याला म्हणतात. कारण मे महिन्यात याला फळे येतात. नीप, प्रियक, हरिप्रिय अशीही याची नावे आहेत. क्षत्रिय कदम मराठा घराण्यातील लग्नात देवक म्हणून कदंब पुजला जातो.
पावसाळ्यात इतर फुलांचे दुर्भिक्ष असल्याने मधमाश्या हमखास कदंबाच्या वृक्षांवर आढळतात. फळे पावसाच्या शेवटच्या टप्प्यात पिकतात. त्यांना किंचित आंबट चवही असते. ग्रामीण भागातील मुले ही फळे खातात. अनेक पशुपक्षीदेखील या फळांची मजा लुटतात. वटवाघळांचे हे आवडते फळ आहे. या फळांचा बीजप्रसार वटवाघळांमार्फतच होतो. पश्चिम बंगालमध्ये भाद्रपदातील एकादशीला ‘कदंब उत्सव’ साजरा करतात. या दिवशी कदंबाचे रोप लावून त्याची पूजा करून, नृत्य-गाणी गाऊन हा दिवस साजरा केला जातो. कदंब वनातून वाहणाऱ्या सुवासिक वाऱ्याला ‘कदंब-नीला’ म्हणतात, तर फुललेल्या कदंबाच्या खाली गोळा होणाऱ्या पाण्याला ‘कदंबरा’, तर कदंबाच्या फुलांपासून बनवलेल्या मद्याला किंवा सुगंधित द्रव्याला ‘कादंबरी’ म्हणतात.
लाकूड आणि कागद बनवण्यासाठी कदंबाचा वापर करतात. झाडाची साल, पाने आणि इतर भागांपासून तयार केलेला अर्क अनेक रोग बरे करतो. कदंबाचे फूल ‘अत्तर’ अर्थात पर्फ्यूमच्या निर्मितीमध्ये वापरला जाणारा एक घटक आहे. झाडाची पाने, मुळे आणि साल रक्तातील साखरेची पातळी कमी करू शकतात. पाने आणि साल यात वेदनाशामक आणि दाहकविरोधी गुणधर्म आहेत, जे वेदना कमी करणारे म्हणून काम करतात. कदंब वनस्पतीच्या अर्कामध्ये जिवाणूंविरुद्ध लढण्याचे घटक असतात.
कदंब झाडाच्या मुळांच्या अर्कांमध्ये लिपिड कमी करणारे गुणधर्म असतात. कदंबाचे झाड कर्करोगावरील उपचार पद्धतीत मोठय़ा प्रमाणावर वापरले जाते. स्तनाचा कर्करोग, प्रोस्टेट कर्करोग, कोलन कर्करोग, अन्ननलिका कर्करोगाच्या हानीकारक पेशींच्या वाढीला हे प्रतिबंधित करते आणि त्यांचा प्रसार नियंत्रित करण्यासही मदत करते. रुग्णाला ओटीपोटात पेटके, सैल हालचाल आणि उलटय़ा होत असतील तर ही वनस्पती तुम्हाला तुमची पचनसंस्था निरोगी ठेवण्यास मदत करते.
कदंब रोपाच्या मुळाच्या सालापासून पिवळा रंग काढता येतो. फर्निचर लाकूड, सरपण, सजावटीचे झाड किंवा सावली देणारे झाड म्हणून याचा वापर केला जातो. फुलांसह फळे खाण्यायोग्य आहेत. किंचितशा आंबट असलेल्या कदंबाच्या फळांचा रस पोटाच्या पारींसाठी देतात. जखमांवर पानांचा रस, तर खोडाचा काढा सर्दी-खोकल्यावर औषधाचे काम करतो. याचा डिंक वा गोंद गुडघेदुखीवर अत्यंत चांगला उपाय आहे.
कदंबाच्या खोडाची साल चवीला कडू, तुरट असून शक्तिवर्धक व ज्वरनाशक असते. याची साल पाण्यात टाकून पाणी उकळवून काढा केला जातो आणि तो काढा सर्दी, खोकला यावर खूप उपयोगी असतो. जखमा झाल्यास पानांमधील अर्क काढून वापरतात. दाताच्या पायोरिया या विकारावर या पानाच्या काढय़ाच्या गुळण्या कराव्यात. कदंबाच्या सालीचे चूर्ण जखम लवकर भरून काढते. कदंबाचं पान आकाराने मोठं असतं व पान तोडल्यावर त्यातून गोंद निघतो. हा गोंद जखमेवर खूप उपयोगी असतो. कदंब कडू असतो तसेच वेदनाविनाशक व पाधातू वाढविण्यास उपयोगी असतो. सर्पदंशात सालीचा किंवा फळांचा काढा दिला जातो.
























































