
देशाचे पंतप्रधान ‘ना खाऊंगा, ना खाने दुंगा’, अशी घोषणा देतात. मात्र, पिंपरी महापालिकेत त्याच्या उलट कारभार सुरू असून, राज्य सरकारच्या वरदहस्ताने निवडणुका डोळ्यासमोर ठेवून डल्ला मारण्याचे काम सुरू आहे. वाकडमधील आरक्षित भूखंड खासगी विकसकाला विकसित करण्यासाठी देऊन यामध्ये दीड हजार कोटी रूपयांचा टीडीआर घोटाळा झाल्याचा सनसनाटी आरोप महाविकास आघाडीच्या वतीने शुक्रवारी (दि.15) पत्रकार परिषदेत करण्यात आला.
पिंपरी येथे झालेल्या पत्रकार परिषदेला शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पुणे जिल्हा प्रमुख ऍड. गौतम चाबुकस्वार, शहर प्रमुख ऍड. सचिन भोसले, चिंचवड विधानसभा प्रमुख अनंत काऱहाळे, शहर संघटक संतोष सौंदणकर, राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरद पवार) गटाचे शहराध्यक्ष तुषार कामठे, कॉंग्रेसचे शहराध्यक्ष कैलास कदम, देवेंद्र तायडे आदी उपस्थित होते.
वाकड, भुमकर चौकाजवळ महापालिकेच्या विकास आराखडय़ातील आरक्षण क्र. 4/38 ट्रक टर्मिनस व पार्किंगसाठी 4.31 आर तर 4/38 अ एमपीएमपीएल डेपोसाठी राखीव आहे. दोन्ही आरक्षणांचे मिळून 10 हजार 274 चौ. मी. क्षेत्र आहे. विकास आराखडय़ातील समावेशक आरक्षणांच्या तरतुदींनुसार भूखंड मालक मे. विलास जावडेकर इन्फिनिटी प्रा.लि. या संस्थेने महापालिकेसोबत 6 नोव्हेंबर 2023 करार केला. कंपनीने 87 हजार 318 चौरस मीटर बांधकाम करून देण्याच्या मोबदल्यात महापालिकेला 6 लाख 93 हजार 448 चौरस मीटर एमिनीटी टीडीआर देण्याचे ठरले. बांधकामाचा खर्च 568 कोटी 26 लाख आहे. बांधकामाचे क्षेत्र 78 हजार 318 चौरस मीटर आहे. 65 हजार 80 रुपये प्रमाणे प्रति चौरस मीटर बांधकाम खर्चाला मान्यता दिली. प्रत्यक्षात 2023-24 च्या रेडीरेकनरनुसार ती 26 हजार 620 रुपये होती. 38 हजार 640 रुपये प्रति चौरस फूट जादा दराप्रमाणे या प्रकल्पाचे अंदाजपत्रक फुगवले. त्यामुळेच ऍमिनिटी टीडीआरमध्ये मोठी वाढ झाल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या वतीने करण्यात आला.
ऍड. चाबुकस्वार म्हणाले, विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी पालिकेतील हा टीडीआर घोटाळा काढला. मात्र, शहरातील तीन आमदारांनी हा प्रश्न उपस्थित केला नसल्याने त्यांचाही यामध्ये सहभाग आहे की काय अशी शंका निर्माण झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास खाते असून, सरकारच्या वरदहस्तानेच पालिकेत भ्रष्टाचार सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला. आयुक्तांवर कोणाचाच वचक नाही, त्यामुळे ते सुसाट सुटले असून, सरकारने या घोटाळ्याची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी. महापालिकेची आर्थिक स्थिती चांगली असून, पालिकेने हे आरक्षण बांधकाम व्यावसायिकाला न देता स्वतः विकसित करावे, अशी मागणी चाबुकस्वार यांनी केली.
शहर प्रमुख ऍड. भोसले म्हणाले, निवडणुका डोळ्यासमोर मिंधे सरकार व त्यांच्या स्थानिक नेत्यांनी टीडीआरच्या माध्यमातून डल्ला मारला आहे. इतरांच्या मागे ईडी, सीबीआय लावणाऱयांनी टीडीआर घोटाळ्याची सखोल चौकशी करून दोषींना अटक करावी.
पालिकेतील भाजपच्या पाच वर्षांच्या सत्ता काळात आणि प्रशासकीय राजवटीत विकासकामांच्या नावाखाली कोटय़वधी रूपयांचे घोटाळे झाले आहेत. भाजपकडून करदात्यांची दिवसाढवळ्या लूट सुरू आहे. टीडीआर घोटाळ्याची चौकशी न केल्यास जनआंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा कॉंग्रेसचे शहराध्यक्ष कैलास कदम यांनी दिला.
आमदारांना 10 टक्के वाटले
टीडीआरच्या या घोटाळ्यात पालिका आयुक्त, नगर रचना, बांधकाम परवाना विभागातील अधिकाऱयांचा हात आहे. अधिकाऱयांना 10, तर तीन आमदारांना 10 टक्के रकमेचे वाटप झाल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष तुषार कामठे यांनी केला. पालिकेत प्रचंड आर्थिक लूट सुरू असून, आमदार, पालकमंत्र्यांचे नियंत्रण नाही. आयुक्त तर भाजपचे घरगडी असल्याप्रमाणे काम करत असल्याचेही कामठे म्हणाले.
भ्रष्टाचारामुळे शहराची नाचक्की
झारखंडमधील खासदाराकडे पैसे सापडले म्हणून शहरातील भाजपच्या नेत्यांनी आंदोलन केले. मात्र, दुसऱया राज्यातील भ्रष्टाचारावर बोलण्यापूर्वी भाजपने स्वतःच्या नाकाखाली सुरू असलेल्या भ्रष्टाचारावर अगोदर आंदोलन करावे. महापालिकेतील भ्रष्टाचारावर हिवाळी अधिवेशनात आवाज उठविण्यात आला. भ्रष्टाचारामुळे राज्यभरात पिंपरी-चिंचवड शहराची नाचक्की झाली असून, याला भाजपच कारणीभूत असल्याचा आरोपही महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱयांनी केला.



























































