
>> धनंजय कुलकर्णी
हिंदुस्थानी सिनेमाच्या इतिहासात कलात्मक तथा समांतर चित्रपटांची सुरुवात ज्या सिनेमाने झाली आणि ज्या सिनेमाला अधिकृतपणे न्यू वेव्ह सिनेमाचा पायोनियर सिनेमा म्हणून ओळखले जाते तो सिनेमा म्हणजे मृणाल सेन यांनी दिग्दर्शित केलेला आणि 12 मे 1969 रोजी प्रदर्शित झालेला ‘भुवन शोम’. हा सिनेमा खऱया अर्थाने हिंदुस्थानी सिनेमांतील एक माईलस्टोन सिनेमा ठरला. कारण यानंतर अशा सिनेमांची निर्मितीदेखील मोठय़ा संख्येने होऊ लागली. बुद्धिजीवी वर्गाला आवडणारा, ज्यात मनोरंजनाची मात्रा कमी असली तरी विचार करायला लावणारा आणि अधिकाधिक वास्तवदर्शी, इथल्या मातीतील असा हा सिनेमा होता.
दिग्दर्शक मृणाल सेन यांचा ‘भुवन शोम’ हा पहिलाच हिंदी चित्रपट. तसेच अभिनेता उत्पल दत्त आणि अभिनेत्री सुहासिनी मुळे यांचादेखील हा पहिलाच हिंदी चित्रपट आहे. महानायक अमिताभ बच्चन यांचादेखील हा पहिला हिंदी सिनेमा ज्यात त्यांनी अभिनय केला नाही, पण त्यांच्या आवाजामध्ये या सिनेमाची कथा पुढे जाताना दिसते. त्या अर्थाने अमिताभ बच्चन या चित्रपटाचे ‘व्हॉइस नॅरेटर’ आहेत.
सिनेमाचे कथानक इथल्या अस्सल मातीतील आहे. चित्रपटात तसं बघितलं तर महत्त्वाची दोनच पात्रे आहेत. भुवन शोम आणि गौरी… म्हणजेच उत्पल दत्त आणि सुहासिनी मुळे. हा सिनेमा कृष्णधवल आहे. चित्रपटाचे कथानक साठच्या दशकातील आहे. ही कथा ख्यातनाम बंगाली लेखक बलाईचंद मुखोपाध्याय यांच्या कादंबरीवर आधारित आहे. चित्रपटाचा नायक भुवन शोम (उत्पल दत्त) एक मध्यमवयीन, विधुर, कर्तव्यकठोर रेल्वे अधिकारी आहे. आपल्या तत्त्वांशी तो प्रचंड प्रामाणिक आहे. कर्तव्यात केलेली कसूर त्याला अजिबात आवडत नाही. त्यामुळेच एक खडूस अधिकारी म्हणून त्याची ख्याती आहे. स्वतच्या मुलाने कामात दिरंगाई केली म्हणून त्यालादेखील त्याने निलंबित केलेले असते. त्यामुळे एक निष्ठुर, कठोर आणि कडक शिस्तीचा अधिकारी म्हणून त्याचा लौकिक आहे. चित्रपटाची कथा सुरू होते ती अशाच एका प्रसंगापासून. एका तिकीट चेकरने प्रवाशांकडून अधिक पैसे गोळा करून भ्रष्टाचार केला असा त्याच्यावर आरोप आहे आणि त्याचा रिपोर्ट भुवन शोम तयार करतो आहे. हा तिकीट चेकर सखीचंद जाधव (साधू मेहेर) प्रचंड घाबरलेला आहे. भुवन शोम त्याचा रिपोर्ट लिहून ठेवतो. आता त्या तिकीट चेकरची नोकरी नक्की जाणार असते. आपल्या कामाच्या ‘स्टाईल’वर भुवन शोम खूश आहे.
आपल्या रोजच्या कामातून ब्रेक घ्यावा म्हणून पक्ष्यांची शिकार करण्यासाठी भुवन शोम सौराष्ट्रामध्ये जातो. त्या एका दिवसात त्याला जे अनुभव मिळतात, त्यावर हा संपूर्ण चित्रपट आहे. भुवन शोम शिकारीसाठी खेडय़ात जातो. तिथे त्याची गाठ एका तरुण मुलीसोबत पडते. ही मुलगी असते गौरी (सुहासिनी मुळे). ती त्याला शिकारीसाठी मदत करते. प्रचंड करडय़ा शिस्तीचा भुवन शोम गावातील साधेसोपे, मनमोकळे आणि परस्परांना मदतीचे वातावरण बघून अंतर्बाह्य बदलतो. त्याच्यातील होत जाणारे बदल आणि माणूसपणाकडे त्याची होणारी वाटचाल दिग्दर्शकाने फार सुंदर रीतीने टिपली आहे. ‘खरा आनंद हा इतरांना मदत करण्यात असतो’ हा मूलमंत्र तो नकळतपणे गौरीकडून शिकून घेतो. गौरीचे निर्व्याज प्रेम, माया त्या कर्तव्यकठोर अधिकाऱयाला माणूस बनवते. जेव्हा भुवन शोमला कळते की, आपण ज्या तिकीट चेकरला निलंबित करणार आहोत, तो गौरीचा नवरा आहे, तेव्हा तो गोंधळतो, आतून हलतो. पक्ष्याची शिकार त्याच्या हातून व्हावी म्हणून गौरी हरप्रकारे त्याला मदत करत असते.तिला माहीतदेखील नसतं की, आपल्या नवऱयाला निलंबित करणारा साहेब हा आपल्या समोर आहे.
चित्रपटाला अतिशय सुंदर असे संगीत विजय राघव राव यांनी दिले आहे. यात एक अतिशय गोड राजस्थानी लोकगीत नायिकेच्या तोंडी आहे. अभिनेत्री सुहासिनी मुळे अतिशय गोड दिसते या चित्रपटात. अनेक वर्षांनंतर ‘लगान’ या चित्रपटात तिला पाहिले. दिग्दर्शक मृणाल सेन यांचे दिग्दर्शन कौशल्य आपल्याला प्रत्येक फ्रेममध्ये दिसते. या सिनेमात अॅनिमेशनचा खूप चांगला वापर करून घेण्यात आला हेदेखील या सिनेमाचे एक वेगळे वैशिष्टय़ म्हणावे लागेल.
चित्रपट अनेक पातळ्यांवरून आपल्याशी संवाद साधतो. शहरी आणि ग्रामीण संस्कृतींचा, सामाजिक जाणिवांचा चांगला परिपाठ इथे आपल्याला दिसतो. चित्रपटातील परस्परांना वाटणाऱया भयाचे फार सुंदर चित्रण केले आहे. चित्रपटात एका दृश्यात एक रेडा भुवन शोमच्या मागे लागतो. त्या रेडय़ापासून त्याची सुटका गौरी करते. म्हणजे रेडय़ाला भुवन शोम घाबरतो, रेडा गौरीला घाबरतो आणि गौरीचा नवरा सखीचंद जाधव भुवन शोमला घाबरतो…असे एक भयाचे सुंदर वर्तुळ येथे दाखवले आहे.
दिग्दर्शकाने चित्रपटात प्रतीकांचा वापर फार सुंदर रीतीने केला आहे. चित्रपटात शेवटी काय घडते? भुवन शोम तिकीट चेकरला टर्मिनेट करतो का? गौरीची त्यावर काय प्रतिक्रिया असते? नक्की काय घडते? या सिनेमाचा शेवट सांगून मी स्पॉयलर देत नाही, पण हा सिनेमा यू टय़ूबवर उपलब्ध आहे. तुम्ही नक्की पहा. त्या वर्षीच्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यामध्ये ‘भुवन शोम’ला सर्वोत्कृष्ट चित्रपट, मृणाल सेन यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक आणि उत्पल दत्त यांना सर्वोत्कृष्ट अभिनेता अशी पारितोषिक मिळाली. तसेच चौथ्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचे ज्युरी अवार्ड मिळाले.
[email protected]
(लेखक चित्रपट अभ्यासक आहेत.)





























































