केक खावा प्रेमाने

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> संजीव साबडे

पूर्वी केवळ वाढदिवसाला म्हणून आणल्या जाणाऱया केकचं अप्रूप आता सरलं आहे; परंतु ख्रिसमस म्हटलं की केक आणि त्यानिमित्त प्लम केक, काजू, मनुके, बेदाणे घातलेला हे समीकरण मात्र अजूनही तसंच आहे. ख्रिसमसनिमित्त केले जाणारे खास पारंपरिक पदार्थ आणि मुंबईतल्या वेगवेगळ्या केक, पेस्ट्री, पाई यांची चविष्ट सफर अनुभवूया.

ख्रिसमस जवळ आलाय… अगदी पुढच्या आठवडय़ात. हा सण म्हणजे ख्रिश्चनांची दिवाळीच. आपण आकाशकंदील लावतो, तर ते स्टार लावतात. आपण किल्ले उभारतो, तर ते ख्रिसमस ट्री, विविध वस्तू व दिव्यांची माळ लावून सजवतात. आपण लहान मुलांना नवे कपडे वगैरे घेतो, तर ख्रिस्ती मंडळींच्या घरातील लहान मुलांसाठी सांताक्लॉज भेटवस्तू ठेवून जातो. त्यांच्या घरीही गोडधोड केलं जातं. दिवाळी चालते तुळशीच्या विवाहापर्यंत, तर ख्रिसमस एका दिवसाचा असला तरी त्याची रोषणाई आणि जल्लोषाचं वातावरण असतं 31 डिसेंबरची रात्र संपून नववर्ष सुरू होईपर्यंत.

आपल्याकडे दिवाळीला फराळाची ताटं एकमेकांच्या घरी जातात, अगदी तसंच ख्रिसमसलाही होतं. फराळातील अनेक पदार्थही सारखेच असतात. महाराष्ट्रात व वसई परिसरात चिवडा, चकल्या, करंज्या, शंकरपाळय़ा वगैरे प्रकार केले जातात. त्यातही ओल्या नारळाची करंजी नक्की. काही घरात चॉकलेट्स बनवतात आणि फराळाच्या ताटात त्यांचा हमखास समावेश करतात. घरी केली नसली तर बाहेरून नक्की आणली जातात. गोव्यात बेंबिका, दोस, दोदोल हे स्थानिक पदार्थ नक्की या काळात दिसतात. ख्रिसमसच्या काळात वा आगेमागे गोव्यात गेल्यास तेथील गोड पदार्थही खाता व शिकता येतील.
तामीळनाडू, केरळ, आंध्र प्रदेश या राज्यांत गोड चकली (स्वीट वा अच्चू मुरक्कू), नेयप्पम (गोड वडे), नारळाचे लाडू, विविध प्रकारची खीर, शेवयांचा शिरा, म्हैसूर पाक हे पदार्थ केले जातात. त्यापैकी नेयप्पम, गोड चकली, म्हैसूर पाक दुकानातही मिळतो. उत्तरेकडील राज्यात राहणारी ख्रिस्ती मंडळी मोतीचूर वा बेसनाचे लाडू, तिळाची चिक्की, गाजराचा हलवा, मावा बर्फी व पेठा हे प्रकार करतात. म्हणजे दिवाळीत जे केले व खाल्ले जातात हे सारे पदार्थ हिंदुस्थानी आहेत. मुख्य म्हणजे, दिवाळी व ख्रिसमस हे सण सर्वधर्मीय मंडळींना जोडतात. याखेरीज ख्रिसमसमध्ये सर्वत्र एक पदार्थ हमखास असतो आणि तो म्हणजे केक. यावेळी प्लम केक आणला व बनवला जातो. काही जण फ्रूट केक आणतात. काहींच्या केकमध्ये रम वा ब्रँडी असते, तर काही केकसाठी अंडय़ाचा वापर केला जातो. ख्रिसमसच्या आधीच खास केक आणले जातात. ते घरी बनवणारे कमीच. हे सारे केक गर्द वा हलक्या तपकिरी रंगाचे आणि किंचित कडू व अधिक गोड असतात. बेदाणे व मनुकांचा रंग केकला येतो. केकची पाकिटं विकत घेऊन जवळची मित्रमंडळी व नातेवाईकांना दिली जातात.

ख्रिसमसच्या काळात हिंदुस्थानात काही कोटींच्या घरात केकचा व्यवसाय होतो. वाढदिवस, वर्धापन दिन, विवाह सोहळे यांसाठी विकत घेतले जाणारे केक व पेस्ट्री यांचा व्यवसाय प्रचंड आहे. याशिवाय पाई, ाढाsसों, मफिन्स, सोक्ड केक, चॉकलेट मूस, ब्राऊनी, कप केक, क्रीम रोल, ख्रिसमस कूकीज, पुडिंग, कस्टर्ड, लेमन टार्ट असे कित्येक प्रकार ही केकची सख्खी भावंडं आहेत. तरुण मंडळींना हे सारे प्रकार, त्यांचे उच्चार आणि साधारण कृती माहीत असते. अन्य देशांच्या तुलनेत हिंदुस्थानात केक, पेस्ट्री खाण्याचं प्रमाण कमी असलं तरी तरुणांमध्ये ते वाढत आहे.

मुंबईतील प्रसिद्ध व लोकप्रिय केककडे वळण्यापूर्वी केकचे प्रकार पाहूया. केरळ, पुडुच्चेरी, गोवा, कोलकाता, अलाहाबाद आणि पारसी वा इराणी असे ख्रिसमस केकचे प्रकार आहेत. काही केकमध्ये सुका मेवा, काहीत केवळ मनुका वा बेदाणे, काहीत दूध तर काहीत रम वा अंडी आणि काहीत किंचित चॉकलेट. काहींचा रंग काळसर, काहींचा गर्द तपकिरी, काहींचा किंचित तपकिरी, तर काही केक बऱयापैकी पिवळसर वा पांढरा. किती तरी प्रकारचे ख्रिसमस केक या काळात विकले जातात. केक घरी तयार करून विकणारे खूप आहेत. त्यांचे ब्रँड माहीत नसले तरी ते उत्तम असतात.

मुंबईत असंख्य केक शॉप व बेकरी आहेत, ज्यांचे केक खूप लोकप्रिय आहेत. फोर्टमधील याझदानी बेकरी, मरीन लाइन्सची कयानी बेकरी व रेस्टॉरंट, ग्रँट रोडचे बी. मेरवान रेस्टॉरंट आणि अंधेरी पश्चिमेला स्टेशनजवळील अहुरा बेकरी, मेरवान यांच्याकडील केक अत्यंत लोकप्रिय. तिथे नेहमीच गर्दी असते. मुंबईभर दुकानं असलेला केकचा माँजिनीज ब्रँडही प्रसिद्ध आहे. तिथे वाढदिवस आणि अन्य कार्पामांसाठी विविध केक व पेस्ट्रीज घ्यायला सतत लोक येतात. अनेक जण एखाद्दोन दिवस आधीच हवा त्या चव, रंग व क्रिमचा केक बुक करतात.

अंधेरीच्या लोखंडवाला मार्केटमधील एडन बेकरीचे ख्रिसमस आणि इतरही केक अतिशय मस्त व उत्तम. मरीन लाइन्सच्या धोबी तलाव भागात मेट्रो सिनेमासमोर सुमारे 20 वर्षांपूर्वी सुरू झालेलं डार्क टेम्प्टेशन हे केक शॉप तर तरुणांचं आवडतं ठिकाण आहे. मुंबईत 115 वर्षांपूर्वी आलेल्या अमेरिकन बेकरीची वांद्रे व सांपुझ पश्चिमेला आणि भायखळा येथे अशी तीन मोठी शॉप्स आहेत. मुंबईभरातील लोक तेथून केक व बेकरी प्रॉडक्ट विकत घेतात. गोरेगाव पूर्वेला गोकुळधाम परिसरात लाविस्ता आणि फ्लेवरीश यांच्याकडील केक व पेस्ट्रीज प्रसिद्ध आहेत.

सायन येथील सुफले, माय कंट्री आणि तोरता ही पूर्व उपनगरांच्या सुरुवातीची चांगली केक शॉप आहेत. या तिन्ही ठिकाणी केक व पेस्ट्रीजचे असंख्य प्रकार आहेत. चेंबूरमध्ये व जवळपास राहत असाल तर तुमच्यासाठी खात्रीचे मेरवान तर आहेच, शिवाय सेव्हन्थ हेवन, स्वीट पॅशन आणि रिबन्स अॅण्ड बलुन्स यांच्याकडील केक व अन्य पदार्थ एकदा अवश्य टेस्ट करावेत. ठाण्यातही अनेक उत्तम केक शॉप आहेत. स्प्रिंकल, फॅब्युलो, एफएनपी आणि बेक योर डे ही बऱयाच ठाणेकरांची आवडती. अर्थात ठाण्यातच काय, मुंबईभर शेकडो केक शॉप्स आहेत. पूर्वी वाढदिवसाला घरी केक यायचा, आता फळं वा भाजी आणली जाते तसा नियमित केक आणला जातो. मुलांना आवडतो वा त्याच्या डब्यासाठी हे कारण असतं. ख्रिसमसला शेजाऱयाचं ताट आलं की आपल्यापैकी अनेक जण त्यांना छोटा का होईना, पण केकच पाठवू लागले आहेत.

यंदा ख्रिसमसच्या निमित्ताने आपणही केकच्या अद्भुत दुनियेत फिरून यायला हरकत नाही. केकमध्ये अंडं असतं म्हणून पूर्वी अनेक जण तो खात नसत. आता अंडी खाणारे वाढलेत. बिनअंडय़ाचा व वेगन केकही मिळू लागला आहे. पूर्वीच्या केकमध्ये फॅट्स अधिक असत. केक खाल्ला की हात तुपकट होई. आता तसं होत नाही. केकवर असलेला धर्माचा शिक्काही पुसला गेला आहे. त्यामुळे केक खावा प्रेमानं. येणारा ख्रिसमस हे त्यासाठीचं कारणच आहे. यानिमित्ताने बेकरी व केक शॉपमध्ये जावं आणि तेथील नवनव्या प्रकारांची ओळख करून घ्यावी. ती एकदा झाली की पाककृती वाचून ते घरी करणं सोपं होईल.

[email protected]