
मराठा आरक्षणाचा फॉर्म्युला माझ्याकडे आहे, पण आताच्या चोरांपुढे तो मांडला तर ते त्याचे खोबरे करतील. त्यामुळे तो फॉर्म्युला मी कुणासमोर मांडणार नाही, असा दावा वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केला. जे आजपर्यंत काँग्रेसने केले, तेच आता भाजप करत असल्याचा हल्लाबोलही त्यांनी केला.
प्रकाश आंबेडकर हे आज जळगाव दौर्यावर होते. पत्रकारांशी बोलताना त्यांनी आपल्याकडे मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीवर उपाय असल्याचा दावा केला. मराठा आरक्षणाचा मुद्दा निकाली काढण्याचा फॉर्म्युला माझ्याकडे आहे, पण आताच्या सत्ताधार्यांसमोर तो मांडला तर त्याचे खोबरे करतील, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. राज्यात नवे सत्ताधारी येऊ द्या, त्यांच्यासमोर मी ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा आरक्षण कसे द्यायचे हे सांगेन, असे आंबेडकर म्हणाले.
अॅडव्होकेट जनरल आशुतोष कुंभकोणी यांनी मुंबई उच्च न्यायालयात मराठा आरक्षणाचा मुद्दा अतिशय उत्तम पद्धतीने मांडला. परंतु, त्यानंतर तत्कालीन सरकारने कुंभकोणी यांना पुढे काम करू दिले नाही. या खटल्यात लक्ष घालू नका, हजर राहू नका, असे फर्मान त्यांना सोडण्यात आले. या फर्मानाचे पुढे काय झाले याचे उत्तर गिरीश महाजनांनी द्यावे, असे आव्हान त्यांनी यावेळी दिले.
नागपुरात लोकशाहीचा तमाशा सुरू
नागपुरात लोकशाहीचा तमाशा सुरू असल्याची जोरदार टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली. विधिमंडळात कोण सत्ताधारी आणि कोण विरोधक, हेच समजत नाही. जे मुद्दे सत्ताधार्यांनी मांडायचे ते विरोधक मांडत आहेत आणि जे विरोधकांचे काम आहे, ते सत्ताधारी करत आहेत. राज्यापुढे अनेक ज्वलंत प्रश्न आहेत. पण, त्यावर कोणतीही चर्चा होताना दिसत नाही. पीक विम्याच्या मुद्द्यावर कोणताही ठोस निर्णय घेण्यात आला नाही, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.
नरेंद्र मोदी देशासाठी धोकादायक
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशासाठी धोकादायक असल्याचा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला. व्यक्ती म्हणून विचार केला तर नरेंद्र मोदी देशासाठी धोकादायक आहेत. सरसंघचालक मोहन भागवत व नरेंद्र मोदी मागील वर्षभरात एकमेकांना किती भेटले, हे भागवत यांनी स्पष्ट करावे. मोदी संघाच्या जोरावर मुख्यमंत्री व नंतर पंतप्रधान झाले, पण आता तेच संघटनेचे तीनतेरा वाजविण्याचे काम करत आहेत, असेही प्रकाश आंबेडकर म्हणाले.




























































