
केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दला (CISF)च्या प्रमुख पदी 54 वर्षात प्रथमच महिला अधिकारी नीना सिंह यांची निवड करण्यात आली आहे. सीआयएसएफ प्रमुख शीलवर्धन सिंग यांच्या निवृत्तीनंतर नीना सिंह यांना सीआयएसएफ महासंचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे.
केंद्रातील मोदी सरकराने गुरुवारी अनेक इंटेलिजेंस ब्यूरो (IB) अधिकाऱ्यांची तीन निमलष्करी दलांचे नवीन प्रमुख म्हणून नियुक्ती केली आहे. सर्वात मोठा बदल केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात (CISF) पहायला मिळाला. 1969 साली स्थापन झालेल्या केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (CISF)च्या नेतृत्वाची धुरा फक्त पुरुष अधिकाऱ्यांवर होती. पुरुषी वर्चस्वाला मोडून काढत पहिल्यांदाच महिला अधिकारी नीना सिंह यांची केंद्रीय सुरक्षा दलाच्या (CISF) प्रमुखपदी निवड करण्यात आली आहे. 2021 मध्ये नीना सिंह या CISF मध्ये रुजू झाल्या. नीना सिंह 31 जुलै 2024 रोजी निवृत्त होणार आहेत, तोपर्यंत त्यांच्यावर CISF च्या प्रमुखपदाची जबाबदारी असणार आहे.
राजस्थानच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक (DGP)
नीना सिंह या राजस्थान पोलिसात महसंचालकपद मिळवणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी होत्या. IPS नीना सिंह यांनी त्यांच्या कारकीर्दीत अनेक उल्लेखनीय कामे केली आहेत. 2000 साली राजस्थान महिला आयोगाच्या सदस्य सचिवपदाची जबाबदारी सांभाळली होती. तेव्हा त्यांनी महिलांसाठी एक आउटरीच मोहीम चालवली होती. या मोहिमेत आयोगाच्या सदस्यांना विविध जिल्ह्यांचा दौरा करून महिलांशी संपर्क साधणे, त्यांच्या समस्या एकून घेणे, त्यांच्या समस्या सोडविण्याचे काम सोपविण्यात आले होते.
आयपीएस अधिकारी नीना सिंह कोण आहेत?
केंद्रीय सुरक्षा दल (CISF)च्या महासंचालकपदी नियुक्त करण्यात आलेल्या नीना सिंह या राजस्थान केडरच्या 1989 बॅचच्या आयपीएस (IPS) अधिकारी आहेत. यापूर्वी त्यांच्यावर CISF च्या अतिरिक्त महासंचालक (ADG) पदाची जबाबदारी होती. नीना सिंह या बिहारमधील पटना येथील रहिवासी असून, त्यांनी महिला विद्यालय, पटना येथून शिक्षण पुर्ण केले. त्यानंतर त्यांनी दिल्लीतील जवाहरलाल नेहरु विद्यापीठ (JNU) आणि अमेरिकेच्या हार्वर्ड विद्यापीठातून शिक्षण घेतले आहे.




























































