
1962च्या हिंदुस्थान-चीन युद्धात मेजर शैतान सिंह भाटी यांच्या नेतृत्वाखालील 13 कुमांऊच्या सी कंपनीतील 114 बहाद्दरांनी अखेरच्या श्वासापर्यंत चुशुलची खिंड लढवत शेकडो चिनी सैनिकांना रोखून धरले होते. लडाखचे संरक्षण करताना मेजर सिंह आणि त्यांच्या बहाद्दर जवानांनी ज्या ठिकाणी देशासाठी प्राणार्पण केले तिथे त्यांचे स्मारक उभारण्यात आले होते. आता मोदी सरकारने चीनसमोर गुडघे टेकत हे स्मारक बफर झोनच्या नावाखाली तोडले असून दोन वर्षांनंतर ही बाब उघडकीस आली आहे.
चीन आणि हिंदुस्थान यांच्यात 2021मध्ये झालेल्या वाटाघाटींनुसार निश्चित झालेल्या बफर झोनमध्ये हे स्मारक येत असल्यामुळे हे स्मारकच उखडून टाकून या वीरांचा मृत्यूनंतरही संतापजनक अपमान करण्यात आल्याचे चुशुलचे नगरसेवक कोन्चोक स्टॅन्झिन यांनी उघडकीस आणले आहे.
वास्तविक मेजर शैतान सिंह यांची तुकडी या धुमश्चक्रीत रेजांग लाच्या खिंडीत पाय रोवून उभी राहिल्यामुळेच चुशुल विमानतळही वाचला आणि लडाखही वाचले होते. चीनचे सर्वाधिक सैनीक याच लढाईत मारले गेले. इतकेच नव्हे तर पाच चिनी जिवंत पकडलेही गेले. या पराक्रमाबद्दल मेजर शैतान सिंह यांना सर्वोच्च सन्मान परमवीर चक्राने सन्मानित करण्यात आले होते. त्यांच्या तुकडीतील अन्य योद्धय़ांनाही पाच वीर चक्र आणि चार सेना पदकांनी सन्मानित करण्यात आले होते. चीनला धडकी भरवणाऱया या शूरवीरांचे स्मारकच मोदी सरकारने गुपचूप उखडून टाकले आहे. विशेष म्हणजे या अपमानस्पद कृत्याबद्दल सरकारने आजवर एक शब्दही उच्चारलेला नाही.
17 हजार फुटांवर कडाक्याच्या थंडीत लढणाऱया या तुकडीतील 120पैकी 114 सैनिकांनी हौतात्म्य पत्करले, पण चीनला पुढे सरकू दिले नाही. 1300हून अधिक सैन्यबळ असलेले चिनी अधिकारी या वीरांपुढे हतबल झाले होते. हा गड नेटाने लढणाऱया मेजर शैतान सिंह यांचा अखेर मशिनगनच्या गोळ्यांनी वेध घेतला होता. कॅप्टन रामचंदर यादव यांनी त्यांचे पार्थिव एका घळीत लपवून ठेवले होते. लढाईनंतर बर्फ वितळल्यावर तीन महिन्यांनी हातात बंदूक घट्ट धरलेल्या शैतान सिंह यांचे हे पार्थिव रेड क्रॉसच्या पथकाने ताब्यात घेतले होते.
मोदी सरकारकडून दिशाभूल आणि खोटेपणा
हिंदुस्थानच्या हद्दीत चीनने घुसखोरी केली असतानाही गेली चार वर्षे मोदी सरकारने इन्कार, दिशाभूल, खोटेपणा आणि समर्थन या नीतीचा अवलंब करत हे अतिक्रमण झाकून ठेवण्याचा प्रयत्न चालवला आहे. मे 2020पासून चिनी सैनिक पूर्व लडाख भागातील देस्पांग पठार, डेमचोक आणि इतर ठिकाणी हिंदुस्थानी गस्ती पथकांना अटकाव करत आहेत. ना कोई हमारी सीमा में घुस आया है, ना ही कोई घुसा हुआ है, असे देशासमोर खोटे बोलणाऱया मोदींना मोकळे सोडले तर ते चीनला भूभाग गिळंकृत करायला मोकळीक देतील हे चीन पक्के जाणून आहे, असे स्टॅन्झिन यांनी या दगलबाजीचे भांडेफोड करताना एक्सवर म्हटले आहे. देशासाठी हे अत्यंत चिंताजनक आणि अपमानास्पद असून मोदी आणि त्यांच्या सरकारने याचे उत्तर द्यायलायच हवे. मोदींनी चीनला क्लीन चिट दिली नसती तर असा अपमान सहन करण्याची वेळच आली नसती, असे स्टॅन्झिन यांनी म्हटले आहे.
काँग्रेसकडूनही टीकास्त्र
काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश आणि खासदार शशी थरूर यांनीही मोदींनी देश आणि सैन्याच्या केलेल्या अपमानाबद्दल एक्सवर टीकास्त्र सोडले आहे. रमेश यांनी एक्सवर अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. देशासाठी ही धक्कादायक बाब असून पंतप्रधान मोदी आणि त्यांच्या सरकारला याचे उत्तर द्यावेच लागेल अशी मागणी काँग्रेसकडून करण्यात आली आहे.

























































