नवीन वर्षाची नकोशी भेट, जागतिक लोकसंख्या 800 कोटींच्या पार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लोकसंख्या वाढीचा वेग जागतिक पातळीवर कमी होत चालल्याचे लोकसंख्या अभ्यास गटांचे म्हणणे असले तरी गेल्या वर्षभरात जगाची लोकसंख्या साडेसात कोटींनी वाढली आहे. नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी या पृथ्वीतलावरील लोकसंख्येने 800 कोटींचा आकडा ओलांडलेला असेल.

अमेरिकेच्या लोकसंख्या गणना विभागाने (सेन्सस ब्युरो) प्रसृत केलेल्या आकडेवारीनुसार गेल्या वर्षभरात लोकसंख्यावाढीचा जागतिक वेग 1 टक्क्याहून थोडासाच कमी होता. मात्र 2024च्या प्रारंभी जगात प्रत्येक सेकंदाला 4.3 जन्म आणि 2 मृत्यूंची नोंद होण्याची शक्यता आहे.

पृथ्वी किती लोकसंख्येला सांभाळू शकते

संयुक्त राष्ट्रांच्याच एका अंदाजानुसार 2030मध्ये जागतिक लोकसंख्या सुमारे आठ अब्ज 50 कोटी, 2050मध्ये 9 अब्ज 70 कोटीपर्यंत वाढू शकते. पण अनेक शास्त्र्ाज्ञांच्या मते पृथ्वी जास्तीत जास्त 9 अब्ज ते 10 अब्ज (900 ते 1 हजार कोटी) लोकसंख्येला सांभाळू शकेल. 2086 या वर्षी जगाची लोकसंख्या 10.6 अब्ज असण्याची शक्यता आहे.

उलटसुलट अंदाज

संयुक्त राष्ट्रांचा जागतिक लोकसंख्या अंदाज अहवाल आणि अमेरिकेच्या सेन्सस ब्युरोच्या आकडेवारीनुसार जागतिक लोकसंख्येविषयी उलटसुलट अंदाज वर्तवले गेले आहेत. संयुक्त राष्ट्रांच्या लोकसंख्या विभागाच्या अंदाजानुसार 800 कोटींचा आकडा मानवाने 15 नोव्हेंबर 2022 रोजीच गाठला आहे. सेन्सस ब्युरोचेही गेल्या वर्षी तेच म्हणणे होते. मात्र आता सुधारित आकडेवारीत त्यांनी नववर्षदिनी मानवी समुदाय 800 कोटींचा आकडा पार करेल, असे म्हटले आहे.

अंदाजांत विसंगती कशामुळे…

जगातील अनेक देशांनी गेली अनेक वर्षे जनगणना केलेली नाही. त्यात भारताचाही समावेश आहे. अनेक देशांमध्ये जन्म आणि मृत्यू अचूकपणे नोंदवणाऱया नागरी नोंदणी आणि महत्त्वाच्या सांख्यिकी प्रणालींचा अभाव आहे. अधिकृत तपशील आणि योग्य गणन प्रणालींचा अभाव यामुळे लोकसंख्येच्या अंदाजात तफावत आढळून येत असते.