
>>आशीष बनसोडे
मुंबई पोलीस दलाचा जगात नावलौकिक आहे. गुन्हे शाखा तर मुंबई पोलीस दलाची शान आहे. चोरी, दरोडा असो की दहशतवादी हल्ला, पोलीस प्रत्येक आव्हानाला सक्षमपणे सामोरे जातात आणि आपल्या लौकिकाला साजेशी कामगिरी करतात. मुंबई पोलिसांची ही खासीयत तर सर्वश्रुत आहेच, पण पोलीस आधिकारी-कर्मचाऱ्यांबरोबरच गुन्हे शाखेचे असेही एक पथक आहे की, तेदेखील तितक्याच ताकदीने कामगिरी बजावत असतात. अगदी शांत व अचूकपणे, तेही विना गाजावाजा करता. कितीही क्लिष्ट आणि कुठलाही गुन्हा असो, त्या पथकातील बहाद्दरांना घटनास्थळी बोलावले जातेच आणि तेही निर्णायक कामगिरी फत्ते करतात. ते बहाद्दर म्हणजे दुसरे तिसरे कोणी नसून गुन्हे शाखेचे श्वान पथक आहे.
मुंबई गुन्हे शाखेचे एक श्वान पथक असून त्यात डॉबरमन जातीचा ‘लियो’, जर्मन शेफर्ड जातीची ‘माया’ आणि ‘व्हिस्की’ तसेच बेल्जियम मेओनी जातीची ‘जेस्सी’ या चार ट्रकर श्वानांचा समावेश आहे. सध्या श्वान पथकाची धुरा हे चौघे मोठय़ा जबाबदारीने व सक्षमपणे सांभाळत आहेत. चोरी, दरोडा, अपहरण, हत्या असे कुठलेही क्लिष्ट व गंभीर गुन्हे शहरात घडले की, त्या गुह्यांची उकल करण्यासाठी लियो, जेस्सी, माया आणि व्हिस्की यांना बोलावले जाते. गुह्याची उकल करायचे खडतर प्रशिक्षण घेऊन आलेले हे चौघेही मग तपास पथकाला गुन्हेगारापर्यंत घेऊन जाण्यासाठी योग्य दिशा दाखवतात. अलीकडेच या चौघांनी अपहरण झालेल्या लहान बालकांना तसेच दरोडा, हत्येच्या गुह्यातील आरोपींना शोधून काढण्याची जबरदस्त कामगिरी बजावली आहे. गुन्हे शाखेचे सहआयुक्त लखमी गौतम, अपर पोलीस आयुक्त शशीकुमार मीना, उपायुक्त अमोघ गावकर व पोलीस निरीक्षक जान गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली हे श्वान व त्यांचे हँडलर चांगली कामगिरी करत आहेत. असे असले तरी या श्वानांची कामगिरी प्रकाश झोतात येत नाही. गुह्याची उकल झाल्यानंतर अधिकारी पत्रकार परिषदा घेऊन सविस्तर वृत्त तसेच केलेल्या कामाची माहिती देतात, पण श्वान पथकाला मात्र क्वचितच प्रसिद्धी मिळते. ही वस्तुस्थिती असली तरी हे पथक आपले कर्तव्य बजावण्यापासून थांबत नाही. 24 तास हे श्वान कर्तव्यावर तैनात असतात. गुन्हा घडल्याचा कॉल आला की, लगेच हे श्वान घटनास्थळी रवाना होतात आणि गपगुमान आपले काम करून माघारी परतात. एखादी चांगली कामगिरी झाल्यानंतर अधिकारी-कर्मचाऱयांवर मुक्तकंठाने स्तुतिसुमने उधळली जातात, परंतु लियो, मेस्सी, माया आणि व्हिस्की यांना वरिष्ठांकडून कौतुकाची थाप मिळताना फारसे दिसत नाही. असो, या श्वानांना सॅल्यूट तर बनतोच ना!



























































