अवलिया – प्राचार्य अविनाश सरनाईक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> मंगेश उदगीरकर

आयुष्यातल्या अनोख्या अनुभवांसारखी वेगवेगळ्या टप्प्यांवर भेटलेली माणसं मनाच्या कप्प्यात अलगद विसावतात. अल्पकाळ वेडावणारी तर कधी दीर्घकाळ रेंगाळणारी, पण मनाच्या अंगणात त्यांच्यातली अपूर्वाई तशीच राहते. हे तरल अस्तर उलगडताना भेटलेल्या अवलियांविषयी.

परभणीमध्ये माझे सगळ्याच स्तरांतल्या व्यक्तींशी संबंध आले. छोट्या मोठ्या सर्वांनी मला जी साथ दिली, त्यामुळे माझे तिथले तीन तपांपेक्षाही जास्त आयुष्य खूप आनंदी होऊन गेले. त्यांनी नुसता आनंदच नव्हे, तर लहान मुलाला जसे बोट धरून चालायला शिकवतात तसे मला जगण्याचे धडे दिले. त्यातलेच एक म्हणजे प्राचार्य सरनाईक. एवढ्या मोठ्या पदावरच्या या माणसाने त्याच्याही नकळत माझ्यावर संस्कार केले. एवढा व्यासंगी, विद्वान माणूस पण विलक्षण निगर्वी. शिक्षकाची व्याख्या करायची झाली तर शब्दांचे घोळ न घालता मी सरनाईकांकडे बोट दाखवीन. केवळ शिकवण्याचीच तळमळ त्यांना होती असे नव्हे, तर विद्यार्थ्यांना समाजकारण, अध्यात्म, योग, माणुसकी यांचीही शिकवण देण्यात त्यांना प्रचंड आस्था होती आणि आहे.

सुरुवातीला मी त्यांना ‘सहज’ घेत असे. आमच्याच बँकेत कॉलेजातल्या सगळ्यांची खाती असल्याने माझा जवळून संबंध यायचा. मग कधी गप्पाही व्हायच्या.

“उदगीरकर साहेब, तुमचं बँकिंग लाईफ मला फार आवडतं बुवा!”

“का हो सर? उलट तुमच्याकडे किती बरंय. दोनचार तास काम केलं की तुम्ही मोकळे.”

“हे पहा, मला असं वाटतं की, तुम्ही लोक जशा वेळा काटेकोर पाळता तसं काहीसं आमच्याकडे व्हायला हवं होतं!”

“सर, तुम्ही बुद्धिवादी लोक, आम्ही तांत्रिक खर्डेघाशी करणारे. आमच्यावर बंधने असतात.”

“हेच! हेच आमच्याकडे यायला हवे. बुद्धिवादाच्या नावाखाली आम्ही जी मोकळीक घेतो, ती चुकीची आहे. मला एक सांगा, एखादे लोन पास करताना, शेकडो विथड्रॉवल्स, चेक्स पास करताना, डिपाझिट्सचे व्याज आकारताना तुमची बुद्धी वापरात येतेच ना? उलट एवढीशीही चूक झाली तर तुमच्या खाजगीतून त्याची भरपाई करावी लागतेच ना?”

“हे खरे असले तरी.”

“साहेब, दुर्दैवाने आमच्याकडे तशी सिस्टीम नाही. आम्ही नेहमीच निर्दोष मानले जातो, काही मोजके अपवाद वगळता बाकीचे सगळे याचा गैरफायदा घेताना दिसतात याचे दु:ख वाटते.”
मी त्यांच्याकडे ‘आ’ वासून पाहत राहिलो. पुढे पुढे मी त्यांच्या जवळ येत गेलो. त्यांची समाजसेवा पाहण्यात आली. सिव्हिल हास्पिटलमध्ये रुग्णासोबत आलेल्या उपाशीतापाशी नातेवाईकांना जेवणाचे डबे पोहोचवणे, त्यातही कल्पकता अशी की, त्यासाठी लोकांना उद्युक्त करणे. ते डबे पोहोचवणाऱया गरीब विद्यार्थ्यांना थोडे का होईना, उत्पन्न मिळण्याची व्यवस्था करणे एवढे सारे ते आपले कर्तव्य सांभाळून करत असत. याशिवाय त्यांनी विवेकानंद केंद्राचीही जबाबदारी स्वीकारली होती. या साऱयांमध्ये डॉक्टर वानखेडे या त्यांच्या जिवलग मित्राचेही सहकार्य होतेच. त्यांनीही त्यांच्यासारखाच समाजसेवेचा ध्यास घेतलेला. या केंद्रामध्ये विवेकानंदांचे विचार, त्यांची जीवनी, त्यांचे संस्कार यावर प्रबोधन व्हायचे.

याशिवाय महात्मा गांधींचे विचार, शिकवण यावर त्यांनी आपल्या स्टाफला सामील करून घेतले होते. त्यासंदर्भात परीक्षा आयोजित केल्या. हे कमी होते म्हणून की काय, कॉलेजमध्ये योगाचे क्लास स्वत: घेत असत. कहर म्हणजे कॉलेजमध्ये बांधकामावर पाणी टाकायला भल्या पहाटे हजर. कॉलेजच्या प्रांगणात त्यांनी जी बाग फुलवली होती ती केवळ लाजवाब. नंतरच्या काळात कॉलेजच्या कार्यभारातून मोकळे झाल्यावर त्यांना विद्यापीठात उच्च अधिकारपद दिले गेले. एखादे महत्त्वाचे पद ‘भूषवणे’ म्हणजे काय असते याचा आदर्श त्यांनी तिथेही निर्माण केला.

सणसणीत उंची, डोक्यावर केसांची गॅलरी फक्त शिल्लक, कमानदार भुवया, पाणीदार मोठे डोळे, सरळ नाक, कोरलेली दाढी, तशीच रेखलेली मिशी, चेहऱयावर मृदू भाव, व्यवस्थित पेहराव. प्रथमदर्शनीच छाप पडणाऱया व्यक्तिमत्त्वामध्ये नक्की किती व्यक्तिमत्त्वे लपलेली होती याचा अंदाज मला आजपर्यंत आाsाा नसला तरी त्यामध्ये एक देवत्व मला दिसत आलेले आहे. इतका नम्रपणा, सच्चेपणा मी प्रथमच अनुभवला हे मात्र खरे.

थोडक्यात, परभणीच्या वास्तव्यात मी लहानथोर सगळ्यांमध्ये वावरलो, पण ज्यांच्याविषयीचे कुतूहल मला अजूनही वाटते त्यातले एक नाव – प्राचार्य डॉ. अविनाश सरनाईक!

– [email protected]