इंडिगोच्या वैमानिकाला प्रवाशाची मारहाण, व्हिडीओ व्हायरल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दिल्ली विमानतळावर उभ्या असलेल्या इंडिगो विमानाच्या वैमानिकाला प्रवाशाने मारहाण केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या घटनेनंतर सदर प्रवाशाला अटक करण्यात आली होती. अर्थात काही तासांनी त्याला जामीन मंजूर झाला आहे. मात्र या प्रकरणी आता काही परस्परविरोधी खुलासे होताना दिसत आहेत.

या तरुणाचं नाव साहिल कटारिया असं आहे. तो दिल्लीहून गोव्याला निघाला होता. त्याचं दिल्लीच्या अमर कॉलनीत खेळण्याचं दुकान आहे. साहिलच्या म्हणण्यानुसार, तो हनिमूनला निघाला होता. पण, इंडिगोची फ्लाईट उशिरा सुरू झाल्याने त्याचा राग अनावर झाला आणि त्याने वैमानिकाला श्रीमुखात भडकावली. या व्हिडीओमध्ये वैमानिक उद्घोषणा करत असताना अचानक साहिल येतो आणि वैमानिकाला मारतो. त्याच्या या हल्ल्याने इतर कर्मचारी दचकतात आणि ओरडतात.

त्यानंतर इंडिगो कर्मचाऱ्यांच्या तक्रारीवरून साहिलला विमानातून उतरवण्यात आलं आणि त्याला अटक करण्यात आली. सर्वसाधारणतः विमान कंपन्यांच्या विचित्र कारभारामुळे कधी कधी प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागतो. सोमवारी पावणे आठ वाजता साहिलचं विमान उड्डाण करणार होतं. पण, हिवाळ्यातील दिल्लीच्या वातावरणामुळे धावपट्टीवर धुक्याची चादर पसरली होती. त्यामुळे कमी दृश्यमानतेच्या कारणास्तव विमानं विलंबाने सोडण्यात येत होती. त्यामुळे हा उशीर झाल्याचं विमान कंपनीचं म्हणणं आहे.