हिंदूंमध्ये भेद निर्माण करणाऱ्या नालायकांपासून सावध रहा! उद्धव ठाकरेंनी दिला इशारा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘आम्ही गर्वसे कहो हम हिंदू है, असं म्हणतो पण आता तिथे (सत्तेत) जे बसलेत ते नालायक लोक हिंदूंमध्ये भेद निर्माण करत आहेत, त्यांच्यापासून सावध रहा’, असा इशारा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी दिला. उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ‘मातोश्री’ येथे शिवबंधन बांधून मुंबई उपनगरातील भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी पक्षप्रवेश केला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी सर्वांना मार्गदर्शन केलं.

‘तुम्ही जो भगवा हातात घेतला आहे, त्या भगव्यात फरक नसतो असं म्हणत एक जाहिरातीचा संदर्भ देत उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, जाहिरातीत दाखवतात की तुझा शर्ट माझ्या शर्ट पेक्षा सफेद कसा? तसं भगव्याचं नाही. भगवा छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे, प्रभूश्रीरामचंद्रांचा आहे, भगवान कृष्णाचा आहे, भवानी मातेचा आहे. अशा भगव्यात त्यांनी (भाजपने) भेद करण्याचा प्रयत्न केला आहे. हिंदुत्त्वात भेद करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. असे हे कोणते लोक आहेत? असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला.

‘आम्ही गर्वसे कहो हम हिंदू है, असं म्हणतो पण आता तिथे (सत्तेत) जे बसलेत ते नालायक लोक हिंदूंमध्ये भेद निर्माण करत आहेत, त्यांच्यापासून सावध रहा’, असा कडक इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला.

यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, ‘आम्ही काय केलं, कुणाला मदत केली, हे आठवण करून देऊ इच्छित नाही. मी मानतो आठवण करून द्यायला लागायला नको, आठवण राहिली पाहिजे. 92-93 ची आठवण तुम्ही केलीत. तेव्हा मुंबईला कुणी वाचवलं होतं? शिवसैनिक, शिवसेनेनंच वाचवलं. मुंबईत संकट आलं मग ते कोणतंही असो दंगल असो की मुसळधार पाऊस असो, बाळासाहेबांनी आम्हाला शिकवण दिली ती ही की तेव्हा जो त्रासात असेल त्याची मदत करा. जेव्हा आम्ही रक्तदान करतो तेव्हा हे बघत नाही की मी जे रक्तदान करतो ते कुणाला जात आहे. आपण सगळे एक आहोत. आम्ही कधी असा भेदभाव केला नाही की तुम्ही परप्रांतिय आहात, उत्तर भारतीय आहोत’, असं उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं.

हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांच्यातील आठवणीत असलेला संवाद देखील उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितला. ‘मला बऱ्याचदा ते वाक्य आठवतं की जे बाळासाहेबांनी प्रमोद महाजनांना सांगितलं होतं. तो काळ वेगळा होता, तेव्हा लोक हिंदू आहोत हे म्हणायला देखील घाबरत होते. तेव्हा बाळासाहेबांनी घोषणा केली होती की ‘गर्व से कहो हम हिंदू है’. बाळासाहेबांनी तेव्हा प्रमोद महाजनांना सांगितलं होतं की या देशात एक दिवस असा येईल की ज्या दिवशी हिंदू हा हिंदू म्हणून मतदान करेल. ते दिवस आले आहेत. तो जमाना वेगळा होता, करणारे कुणी वेगले होते, संघर्ष करणारे वेगळे होते आणि आता ते नाहीत. पण त्याचा लाभ घेणारे आता बसले आहेत. त्यांचं संघर्षाशी काही घेणंदेणं असेल असं मला वाटत नाही. तयार चपाती ते खात आहेत. मात्र त्या चपातीसाठी ज्यांनी कष्ट सोसले दुर्भाग्य आहे की ते आपल्या सोबत नाहीत आणि जे वाचले आहेत त्यांना बाजूला करण्यात आलं आहे’, अशी खंत उद्धव ठाकरेंनी बोलून दाखवली.

‘तुमच्या सगळ्यांचं मी स्वागत करतो आहे. या मातोश्रीवर अनेक लोक आले आहेत, माझ्या वडिलांकडे आले आहेत, माझ्याकडेही येतात. काही मदत मागण्यासाठी वैगरे येतात. आम्हाला वाचवा, तेव्हा बाळासाहेबांनी विचार नव्हता केला की पुढे जाऊन हा काय करेल, त्यांनी वाचवलं होतं. आता तेच लोक आहेत ज्या बाळासाहेबांनी आणि शिवसेनेनं त्यांना वाचवलं होतं त्या शिवसेनेला संपवण्याचा प्रयत्न सुरू आहे. करा प्रयत्न, माझं त्यांना आव्हान आहे की शिवसेनेला संपवण्याचा प्रयत्न करून पहा. आम्ही लढणारे आहोत, आम्हाला संपवणारे कुणी असूच शकणार नाही’, असा ठाम विश्वास त्यांनी यावेळी बोलून दाखवला.

‘आमच्या मनात काही पाप नाही. आम्ही त्यांना शत्रू समजलो नाहीत, त्यांनी आम्हाला शत्रू बनवलं’, असा आरोपही त्यांनी केला.

‘कठीण काळात जो सोबत येतो त्याचं महत्त्व वाढतं. सत्तेच्या दिशेने जाणारे अनेक असतात. मात्र सत्ता ज्या पक्षाकडे आहे त्यांना सोडून ज्यांच्यासोबत लढाई त्यांच्यासोबत जायचं हे अत्यंत कठीण असतं. तो मर्दपणा तुम्ही दाखवला’, असं म्हणत त्यांनी सोबत आलेल्यांचं कौतुक केलं.