
सांगली शहर आणि जिल्ह्यातून वाहणारी कृष्णा नदी पुन्हा कोरडी पडली आहे. यामुळे सांगलीतील जनता संतप्त झाली असून, आज जलसंपदा विभागाच्या कारभाराविरोधात कोरडय़ा पात्रात उतरून आंदोलन करण्यात आले. यावेळी सांगली जिह्याच्या हक्काचे पाणी कृष्णेत सोडून ती बारमाही वाहती ठेवा, अशी मागणी करण्यात आली. यावेळी शेकडो नागरिकांसह विविध सामाजिक संस्थांनी सांगली बंधाऱयावर निदर्शने केली.
या आंदोलनाचे नेतृत्व कृष्णा नियंत्रण नागरी कृती समितीचे निवृत्त अभियंता विजय कुमार दिवाण, प्रभाकर केंगार, सतीश साखळकर, ड़ॉ मनोज व्होरा, मनोज पाटील, प्रदीप वायचळ, सर्जेराव पाटील, हणमंतराव पवार यांनी केले.
आंदोलकांनी म्हटले, सध्या कोयना धरणामध्ये उपयुक्त पाणीसाठा 71 टीएमसी आहे. कोयना धरणातून विद्युत निर्मितीसाठी 49 टीएमसी पाणी शिल्लक राहत आहे. त्यापैकी कृष्णा नदीसाठी 22 टीएमसी पाण्याची आवश्यकता आहे. तसेच हक्काचे धोम, उरमोडी, तारळा या धरणांमधून टेंभू व ताकारी या योजनांसाठी मंजूर असलेले व राखून ठेवलेले 12 टीएमसी पाणी शिल्लक आहे. असे एकूण हक्काचे 34 टीएमसी पाणी सांगली जिह्यासाठी उपलब्ध आहे.
वरील सर्व धरणांत जून अखेर म्हणजे 160 दिवस सांगली शहर व जिह्याला पाणी पुरेल एवढा पाणीसाठा सध्या धरणात आहे. परंतु काही झारीतील शुक्राचार्य मंडळी कृष्णा तीरावरील लोकांना निष्कारण वेठीस धरण्याचा प्रयत्न करीत आहेत. जर पुन्हा नदी कोरडी पाडण्याचा खेळ झाला, तर अतिशय तीव्र आंदोलन केले जाईल आणि त्याच्या परिणामांची जबाबदारी ही जलसंपदा विभागाच्या अधिकाऱयांवर राहील, असा इशारा यावेळी देण्यात आला.
यावेळी कृष्णा नदी महापूर नियंत्रण नागरी कृती समिती, सांगली नागरिक जागृती मंच, सागली जिल्हा यांच्या वतीने जोरदार आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात तानाजी सरगर, पैलवान प्रमोद पाटील, आनंद देसाई, मोहन चोरमुले, संजय चव्हाण, अजितकुमार पाटील, अविनाश जाधव, उदय पाटील, जयराज बर्गे, गोपाळ मर्दा, अविनाश जाधव, अशोक माने, रवींद्र जोशी, भीमगोंडांना पाटील, सतीश दुधाळ, गजानन साळुंखे, दीपक सदलगे आदींचा समावेश होता.
पाण्यावरून राजकारण
ऑक्टोबर महिन्यात कृष्णा नदी कोरडी पडली होती. त्यावेळी पाणी सोडण्यावरून सातारा आणि सांगलीतील मंत्र्यांमध्ये राजकीय घमासान झाले होते. आता पुन्हा कृष्णा नदी कोरडी पडल्यामुळे आता पुन्हा राजकीय लढाई सुरू होते का? का पाणी जाणीवपूर्वक सोडले जात नाही? असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. लवकरच लोकसभेची आचारसंहिता लागणार असून, येणाऱया काळात पाण्याचे नियोजन कसे होणार, हा प्रश्न उपस्थित होत आहे.























































