यवतमाळ – वाघाचा बछडा मृतावस्थेत आढळला, सुकनेगाव येथील घटना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> प्रसाद नायगावकर

यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुक्‍यातील सुकनेगाव शिवारात असलेल्‍या तलावाजवळ वाघाचा बछडा मृतावस्‍थेत आढळला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

वणी तालुक्‍यात कोळसा खाणी तसेच जंगल परीसरात वाघाचा वावर असल्‍याचे यापूर्वी स्‍पष्‍ट झाले आहे. यामुळे येथील शेतकरी वाघाच्‍या दहशतीत वावरत होते. यापूर्वी वाघाने जनावर तसेच शेतमजुरावर हल्‍ला चढविल्‍याच्‍या अनेक घटना घडल्‍या आहेत. आता सुकनेगाव येथील तलावाजवळ आईपासून विभक्‍त झालेला तीन महिन्‍यांचा वाघाचा बछडा नागरीकांना मृतावस्‍थेत आढळुन आला. नागरिकांनी तात्काळ याची माहिती वनविभागाला दिली.

वन‍परीक्षेत्रीय अधिकारी प्रभाकर सोनडवले यांनी पथकासह तातडीने घटनास्‍थळ गाठले. त्‍यावेळी सुकनेगाव बिटमध्‍ये महसुल विभागाच्‍या कक्ष क्रमांक 6 पासून 20 ते 30 मीटर अंतरावरील तलावाजवळ वाघाचा बछडा मृतावस्‍थेत पडलेला होता. घटनास्‍थळाचा पंचनामा केल्‍यानंतर मंदर येथील निलगीरी वनात वाघाच्‍या मृत बछड्यावर अंत्‍यसंस्‍कार करण्‍यात आले आहे.