
>> अभिराम भडकमकर
ज्या मातीने ग्रंथांशी खेळण्याचं, बागडण्याचं आणि त्यांचं पुनरावलोकन करण्याचं स्वातंत्र्य दिलं, त्या-त्या समाजात मूळ कलाकृतीच्या सोबत अनेक समांतर कलाकृती निर्माण झाल्या. त्यामुळे शेक्सपिअरचा शेक्सपिअर जसा आहे तसा वेगवेगळ्या अभिव्यक्तीतून उमटत गेला. कलेची अशी वेगळी रूपं, कितीतरी वेगळं आकलन, कितीतरी वेगळे जगण्याचे संदर्भ त्या कलाकृतींना चिकटतात आणि त्या कलाकृती व्यापक होत जातात.
सर पुढे सांगू लागले, “तिसरी गोष्ट अशी की, अनेक संस्कृतीत त्याच काळामध्ये किंवा त्याच्या आधी निर्माण झालेल्या अनेक पुस्तकांना हातही लावायचा नाही अन्यथा तो कापून टाकला जाईल अशा प्रकारची एक दहशत होती. जी पुस्तकं, आम्ही ज्याला ग्रंथ म्हणतो, त्या ग्रंथांशी ज्या मातीनं खेळण्याचं, बागडण्याचं आणि त्यांचं पुनरावलोकन करण्याचे स्वातंत्र्य दिलं, त्या-त्या समाजात मूळ कलाकृतीच्या सोबत अनेक समांतर कलाकृती निर्माण झाल्याच ना? त्यामुळे शेक्सपिअरचा शेक्सपिअर जसा आहे तसा जर्मनीच्या फ्रिट्झ बेनेव्हिटझचा पण आहे, के. नारायण काळेंचा आहे, सर लारेन्स ओलिव्हिएचा आहे, शिरवाडकरांचासुद्धा आहे आणि आपण जो इथे करतो आहोत ना, तो आपलासुद्धा आहे. अरे, हा मोकळेपणा आहे आणि म्हणून शेक्सपिअरच्या एकाच ‘हॅम्लेट’चे किंवा ‘लीअर’चे अनेक चेहरे आपल्याला दिसतात. आता फक्त मूळ कलाकृतीलाच खरं माना अशी दहशत कुठेच नसल्यामुळे कितीतरी वेगळे चेहरे दिसतात. वेगळी रूपं, कितीतरी वेगळं आकलन, कितीतरी वेगळे जगण्याचे संदर्भ त्या कलाकृतींना चिकटतात आणि त्या कलाकृती व्यापक होत जातात.
कैलाश, एक गोष्ट लक्षात घे. या स्वातंत्र्याचा आदर करायचा की टिंगल करायची? या स्वातंत्र्याचा अभिमान बाळगायचा की केवळ आपल्यावर प्रकाशझोत पडावा म्हणून काहीतरी विधान करायचं? याचा विचार करायला हवा. किमान तुम्ही तरी करायला हवा. कारण तुम्ही आज एका स्थानावर आहात. होय, स्थानावरच म्हणेन मी. जरी तुम्ही विद्यार्थी असलात तरी तुम्ही संपूर्ण हिंदुस्थानभरातनं निवडलेल्या शेकडो विद्यार्थ्यांपैकी फक्त वीस जण आहात. प्रश्न विचारणं हे आम्ही कधीच चुकीचं मानलं नाही. अरे, आपल्या महाभारताचा फॉर्मच मुळात प्रश्न आणि उत्तर अशातून घडलेला. नचिकेत-यम चर्चा आहे. तिथे नचिकेताचं वय आड येत नाही. अरे, प्रश्न विचारणं हा तर या संस्कृतीचा मूळ गाभा आहे. प्रश्न विचारू देणं या संस्कृतीचा मोठेपणा आहे. म्हणूनच प्रश्न विचारायचा असेल ना, तेव्हा फार जबाबदारीने विचारायला हवा,” सरांचं हे वाक्य आम्हाला खूप लागलं.
“ही जबाबदारी ओळखा अन्यथा लोक ‘तुम्हाला’ हसणार नाहीत, तर तुम्ही ज्या स्थानावर आहात ना, त्याचं स्थानमाहात्म्य कमी होईल. लक्षात ठेव, कुठल्याही कलाकृतीला विटा लावायला कोणी गेलं तर त्याला ना नसते, पण तुमचा हेतू ती कलाकृती डागाळणं हा आहे की तुमच्या तुमच्या परीने ती उन्नत करणं हा आहे? हे महत्त्वाचं आहे. एक काम कर. स्वतच्या मनाला प्रश्न विचार, मी हे का बोललो? मी हे विधान का केलं? मला यातून काहीएक विचारमंथन होऊन त्यातनं नवं काहीतरी समजून घ्यायचं आहे की फक्त थोडासा खडखडाट, आजूबाजूला चार लोकांमध्ये चर्चा, एक प्रकाशझोत इतकाच आहे?
लक्षात ठेव, इतरांच्या कलाकृतींच्या आधाराने स्वतवर प्रकाशझोत टाकून घेण्याच्या कोत्या मनोवृत्तीपेक्षा छोटंसंच, पण स्वतचं काहीतरी मोठं निर्माण करायचा प्रयत्न कर… अन्यथा तुला प्रसिद्धी मिळेल, चार लोक तुझ्याबद्दल बोलतीलही. तू चर्चेतही येशील, पण तुझं तुला कळायला लागेल की, तू पोकळ आहेस!
अरे, शेक्सपिअर आणि त्याच्या श्रेष्ठ कलाकृतींच्या सान्निध्यात येऊनही माणूस जर वयाच्या या टप्प्यावर पोकळच राहणार असेल तर मग कीवच करावी लागेल. चला, नीट वाक्यं पाठ करा. शेक्सपिअर समजून घ्या आणि मग बोला.”
त्या दिवशी आम्ही सगळेच जरा शांत झालो होतो, अंतर्मुख झालो होतो.
चंद्रया मनातून खचला असला तरी ‘कशी सरांची खेचली, कसा सगळ्यांचा अर्धा तास वाया घालवला’ याची टिमकी वाजवत होता, पण मनोमन त्यालाही त्याचा पोकळपणा कळला होता. पण काय करणार… चार लोकांनी आपल्याबद्दल बोलले पाहिजे, आपल्यावरचा प्रकाशझोत हटता कामा नये… चंद्रयाच्या या स्वभावाला औषध नव्हतं!
आम्ही मात्र पुन्हा एकदा शेक्सपिअरकडे नव्या नजरेने, नव्या आदराने पाहत होतो आणि स्वतला सांगत होतो, इतकं उन्नत झालं पाहिजे, इतकं परिपक्व झालं पाहिजे की, शेक्सपिअरलाही प्रश्न करता आला पाहिजे… आणि शेक्सपिअरच्या चिंतनाला समांतर असं चिंतन करता आलं पाहिजे… आणि त्यात भर टाकता आली पाहिजे.
कधी कधी प्रसिद्धीसाठी हपापलेल्या प्रश्नांमधूनसुद्धा खूप काही मिळून जातं, नाही?
[email protected]
(लेखक नाटय़कर्मी असून नाटय़क्षेत्राचे अभ्यासक आहेत)


























































