
बृहन्मुंबईतील 58 बंद पडलेल्या गिरण्यांमधील यापूर्वी झालेल्या सोडतीमध्ये यशस्वी न झालेल्या एकूण 1,50,484 गिरणी कामगार व त्यांच्या वारसांची पात्रता निश्चिती करण्याकरिता कालबद्ध अभियान सप्टेंबर महिन्यापासून सुरू आहे. या विशेष अभियानात गिरणी कामगार व त्यांच्या वारसांकडून ऑफलाइन व ऑनलाइन पद्धतीने एकूण 01,06,851 अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यापैकी 87,695 अर्जदार पात्र ठरले असून उर्वरित अर्जांची छाननी करून पात्र-अपात्र निश्चितीची कार्यवाही सुरू आहे. गिरणी कामगार वारसांचा वाढता प्रतिसाद बघता या अभियानाला 15 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या अभियानांतर्गत ऑफलाइन कागदपत्रे वांद्रे पूर्व येथील समाज मंदिर हॉल येथे जमा करायची आहेत. तसेच ऑनलाइन पद्धतीने www.millworkereligibility.mhada.gov.in या संकेतस्थळावर कागदपत्रे अपलोड करण्याची सुविधा आहे. तसेच mill workers eligibility या नावाने अॅप उपलब्ध करून देण्यात आले आहे.





























































