ठसा – साधू मेहर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> दिलीप ठाकूर

सत्तरच्या दशकात हिंदी चित्रपटसृष्टीत समांतर अथवा कलात्मक, नवप्रवाहातील चित्रपटांची चळवळ रुजवण्यात ज्या काही कलाकारांचा समावेश होता, त्यात साधू मेहर हेदेखील वरच्या फळीतील एक महत्त्वाचे नाव. मुंबईत त्यांचे 2 फेब्रुवारी 2024 रोजी वयाच्या 84 व्या वर्षी निधन झाले. विशेष उल्लेखनीय गोष्ट, या समांतर चित्रपटाचा पाया रचणारा पहिला चित्रपट मृणाल सेन दिग्दर्शित ‘भुवन शोम’. या चित्रपटात उत्पल दत्त, सुहासिनी मुळे यांच्यासह साधू मेहर यांचीही महत्त्वाची भूमिका होती. दक्षिण मुंबईतील ड्रीमलॅन्ड चित्रपटगृहात मॅटिनी शोला 1970 साली या चित्रपटाने पंचवीस आठवडय़ांचे रौप्य महोत्सवी यश संपादले. याचा समांतर चित्रपटाचे पुरस्कर्ते कायमच आवर्जून उल्लेख करतात. बंगाली चित्रपटसृष्टीत साठच्या दशकात रुजलेली समांतर चित्रपटाची वाटचाल हिंदीतही यावी अथवा असावी यासाठीची गरज ‘भुवन शोम’ या चित्रपटाने पूर्ण केली. त्यातून मग ओम पुरी, शबाना आझमी, नसिरुद्दीन शहा, अनंत नाग, अमरीश पुरी, स्मिता पाटील, दीप्ती नवल यांच्यासह साधू मेहर या चित्रपटातील एक हुकमी कलाकार ठरले. श्याम बेनेगल दिग्दर्शित ’अंकुर’मधील त्यांची लक्ष्मीचा ( शबाना आझमी) पती किश्श्त्या ही व्यक्तिरेखा विशेष उल्लेखनीय ठरली. यातील अभिनयासाठी साधू मेहर यांना राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले. वास्तव गोष्टींवर आधारित बुद्धीला चालना देणाऱया चित्रपटात विविध प्रकारच्या व्यक्तिरेखा साकारणे हे या चळवळीतील चित्रपटांचे सर्वात मोठे विशेष. त्यात अभिनयाचा कस लागत असे. त्यात ग्लॅमर अजिबात नसे. भारताच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासह अनेक देशांतील चित्रपट महोत्सवांत हे चित्रपट दाखवले जातात आणि जगभरातील अनेक चित्रपट समीक्षक, अभ्यासक, विश्लेषक यांच्यापर्यंत हे चित्रपट आणि त्यातील अभिनय पोहोचतो. साधू मेहर यांनी ‘मृगया’, ‘27 डाऊन’, ‘सफेद हाथी’, ‘कस्तुरी’, ‘सीता रानी’, ‘डिझायर’, ‘उतरन’, ‘चराचर’, ‘शीशा’, ‘दृष्टी’, ‘देबशिशू’ अशा अनेक समांतर चित्रपटांतून विविध प्रकारच्या लहानमोठय़ा भूमिका साकारल्या. त्याबरोबरच त्यांनी काही मुख्य प्रवाहातील मनोरंजक चित्रपटांतूनही लक्षवेधक भूमिका साकारल्या. त्यात विशेष उल्लेखनीय चित्रपट रोमू सिप्पी निर्मित व राज एन. सिप्पी दिग्दर्शित ‘इंकार’ या चित्रपटाचा खास उल्लेख करायला हवाच. एका श्रीमंत घरातील सीताराम या नोकराची ही भूमिका वेगळीच होती. खौफनाक खलनायकाकडून चुकून या सीतारामचा मुलगा किडनॅप होतो आणि मग या पित्याचे हृदयदावक दुःख पाहायला मिळते. या चित्रपटात विनोद खन्ना, विद्या सिन्हा, डॉ. श्रीराम लागू, हेलन, अमजद खान असे जबरदस्त तगडे कलाकार असूनही साधू मेहर कायमच लक्षात राहिले. ‘घरौंदा’, ‘हम आपके दिल में रहते है’ इत्यादी मनोरंजक चित्रपटांतूनही त्यांनी भूमिका साकारल्या. ‘जय जगन्नाथ’ या हिंदीसह पंधरा प्रादेशिक भाषांतील चित्रपटांतून ते लाखो प्रेक्षकांपर्यंत पोहोचले. त्यांनी अनेक आसामी चित्रपटांतून भूमिका साकारल्या. आसाममधीलच संभलपुरी या भाषेतील सव्यासाची मोहपात्रा दिग्दर्शित ‘भूखा’ ( 1989) या चित्रपटातही त्यांनी भूमिका साकारली. ‘भाग्य ना जाने कोई’ ( 2016) हा बहुदा त्यांचा शेवटचा चित्रपट ठरला. काही हिंदी व आसामी चित्रपटांचे त्यांनी दिग्दर्शनही केले. त्यात ‘अभिमान’ (1977), ‘परिचिता’
(1980), ‘डिझायर’ ( 1983), ‘अभिलाषा’ ( 1984), ‘बबुला’ ( 1986) इत्यादी चित्रपटांचा समावेश आहे. त्यातही त्यांनी वेगळेपणाचा ठसा उमटवला. विशिष्ट चेहरा नसलेला अभिनेता ही त्यांची ओळख कायम राहिली. त्यांच्या या कर्तृत्वाची विशेष दखल घेत त्यांना हिंदुस्थान शासनाच्या वतीने 2017 साली पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
[email protected]