
>> संजय मोने
एकाच नावाच्या विविध भाषा बोलणाऱ्या, वेगवेगळ्या प्रदेशातील लोकांना एका समांतर धारेत आणलं की की त्यांच्यात साधर्म्य वाटायला लागतं, तर कधी पराकोटीचे वेगळेपण. वेगळेपण अर्थातच अपेक्षित पण साधर्म्याच्या खुणा कधी कधी रंजकता आणतात. अशीच काहीशी ही मांडणी… भेटलेल्या आणि न भेटलेल्या इम्रानची.
नाव एकच! इम्रान किंवा इमरान आणि इंम्रान खान, पण व्यक्ती तीन, वेगवेगळय़ा. त्यातल्या दोन आपल्या हिंदुस्थानातल्या. राहण्याची ठिकाणं एकमेकांपासून साधारण चारशे-साडेचारशे किलोमीटर दूर आणि तिसरा वेगळ्याच देशातला. आपला शेजारी देश. तो देश आणि आपल्या देशातले लोक साधारण दिसायला एकसारखे खाण्यापिण्याच्या पद्धतीही फार भिन्न नाहीत, निदान मांसाहारी खाणे तरी जवळपास तेच. त्यातला पहिला इम्रान म्हणजे क्रिकेटपटू इम्रान खान. पाकिस्तानला जागतिक क्रिकेटच्या नकाशावर आणणारा त्यांचा कर्णधार. त्याला मी कधीही भेटलो नाही. फक्त दूरचित्रवाणीवर सामन्यात खेळताना पाहिलंय. त्याने पाकिस्तानला 1992 साली पहिला विश्वचषक कर्णधार म्हणून जिंकून दिला. एकंदरीत त्या देशाची अवस्था पाहता पुन्हा ते तो विश्वचषक जिंकण्याची शक्यता जवळपास पुढची दहाबारा वर्षं तरी, ज्यांना क्रिकेट समजतं त्यांना वाटत नाही. उत्तम अष्टपैलू खेळाडू, दिसायला स्वप्नातला राजकुमारच, पण पुढे तो अनेक वादग्रस्त गोष्टीत अडकला आणि कदाचित म्हणूनच पंतप्रधान झाला. आता तो पंतप्रधान नाही. त्याच्याबरोबर त्या काळात गाजलेले अष्टपैलू खेळाडू म्हणजे बॉथम, हेडली आणि आपला कपिल देव. पैकी बॉथमसुद्धा काही वादग्रस्त गोष्टीत अडकून सुटला. बाकी उरलेले दोघे म्हणजे रिचर्ड हेडली आणि आपला कपिल देव कधीही कुठल्याही वादात अडकले नाहीत. असो.
दुसरा इम्रान जो एक अभिनेता आहे, आमचा मराठी माध्यमातून अप्रतिम कामगिरी करणारा एक अभिनेता आणि आता म्हणालो तो इम्रान खान, जो हिंदी भाषिक मालिकांतून काम करत होता, आताही करत असावा, यांचं एक वेगळंच नातं आहे. म्हणजे झालं असं की, वेगवान दुचाकी चालवताना एकदा मराठी अभिनेत्याला अपघात झाला. त्याची बातमी कळल्यावर सगळे त्याला भेटायला इस्पितळात गेले. पण मुळात तो तिथपर्यंत पोहोचला कसा? कारण अपघात झाल्यावर तो रस्त्याच्या कडेला पडून होता. हातवारे करून तो विनंती करत होता. येणाऱया जाणाऱया अनेक सुशिक्षित आणि पैसेवाल्या लोकांनी त्याला पाहिलं होतं, पण उगाच अपघात आणि त्यात त्याला उचलून इस्पितळात न्यायचं आणि मग पोलीस आणि त्यांचे वाकडे तिकडे प्रश्न, शिवाय त्यांचे प्रश्न इतके आडमाप असतात की, जणू काही आपणच तो अपघात घडवून आणलाय (अर्थात त्या पोलिसांचं फार काही चुकत नाही. कारण अशा गोष्टी मुंबईत किंवा इतर ठिकाणी होत असतात. मात्र एकाच बाबतीत मला असं वाटतं की, त्यांनी त्या माणसाला आधी उपचारांसाठी पाठवावं आणि मग चौकशीबीवकशी काय आहे ते रीतसर करावं).
तर ती अशी बिलामत कशाला आपल्या अंगाला लावून घ्यायची म्हणून बरेचसे लोक निघून गेले. त्याच सुमारास हा इम्रान तिथून आपल्या वाहनातून जात होता. रस्त्याच्या कडेला पडलेल्या एका तरुणाला त्याने तडफड करताना पाहिलं. एक चांगला, दयाळू आणि आदर्श नागरिक म्हणून तो आपलं वाहन थांबवून उतरला. त्या अभिनेत्याला त्याने कुठेतरी पाहिलं होतं. जवळ जाऊन त्याची अवस्था पाहिली आणि त्याला नजीकच्या इस्पितळात भरती केलं. तिथे विचारल्या गेलेल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्या मनावर ताबा ठेवून त्याने दिली. पोलिसांनी त्याला जे काही वेडेवाकडे प्रश्न विचारले त्याची त्याने समाधानकारक उत्तरं दिली. अपघातात जखमी झालेल्याच्या मोबाइलमध्ये सापडलेल्या त्याच्या घरच्या नंबरवर संपर्क केला. त्यानंतर आम्ही सगळे तो आमचा अभिनेता ज्या इस्पितळात भरती झाला होता तिथे पोहोचलो. इम्रानला त्याचा आतापर्यंत किती खर्च झाला त्याची विचारपूस केली. पण त्याने एका शब्दानेही त्याचा उल्लेख केला नाही आणि जवळ असलेली कागदपत्रं आमच्याकडे सुपूर्द करून तो निघून गेला. पुढे तो आमचा अभिनेता सुखरूप घरी परतला. तसा तो आमचा अभिनेता त्याच्या संघर्षाच्या काळातून जात होता. फारसे पैसेही त्याच्या जवळ नव्हते, पण त्याच्या इतर मित्रांनी त्या इम्रानला पैशांची विचारपूस केली, पण त्याने एका शब्दानेही त्याबद्दल उत्तर दिलं नाही. आजही तो इम्रान त्याबद्दल अवाक्षर काढत नाही.
आता तिसरा इमरान. हा मला भेटला खान्देशातल्या एका शहरात. त्याचं आडनाव खान. अत्यंत प्रेमळ, पण तिरसट माणूस. तरीही खानदेश खाना असं त्याच्या विभागाचं आणि आडनाव यांचा संगम करून चालवलेल्या एका छोटेखानी (छोटेखानीमध्ये खान येत नाही हं! किंवा असेलही) उपाहारगृहवजा ठेल्याचा मालक. आडमाप उंची आणि त्याला जुळणारी आडवी रुंदी बाळगून असलेला असा तो खान. त्याच्या दुकानात उत्तम कचोरी मिळायची. इतरही पदार्थ होते, पण कचोरी ही त्याची खासीयत. त्याच्या या पदार्थांच्या खासीयतबरोबरच त्याचा स्वभाव ही एक अजून खास अशी खासीयत होती. आलेल्या गिऱहाईकाचा चेहरा आवडला नाही तर तो पी थांबवायचा.
“चल हट! ऐसी सुरत किधरसे लेकर पैदा हो गया रे! निकल! नही मिलेगा कुछ यहां पर,” असं म्हणून तो त्याला पिटाळून लावायचा. तरीही त्याचा दिवसाचा गल्ला तगडा असायचा. म्हणजे त्या शहरात त्याला आवडणाऱया माणसांचे चेहरे चांगले असावेत. माझा मित्र मला एकदा त्याच्या दुकानात घेऊन गेला आणि मी पुढे जाऊन दोन कचोऱया मागितल्या. त्याने मला सलाम-बिलाम करून त्या गरमागरम कचोऱया बांधून दिल्या. त्यानंतर आजतागायत मला माझ्या सौंदर्याची खात्री पटली. एवढय़ात हे संपत नाही, तर त्या इमरानच्या दुकानासमोर एक माणूस एक दुसरा छोटासा ठेला लावायचा. उत्तर हिंदुस्थानी लोक वर्ष-दोन वर्षांतून एकदा आपल्या गावी महिनाभरासाठी जातात आणि दुसरा एखादा बदली माणूस तो ठेला चालवतो. तसाच एक बदली माणूस आला. त्याने सकाळी धंदा सुरू केला. काही वेळाने इमरान त्याचं उपाहारगृह सुरू करायला आला. सहज म्हणून त्याचं लक्ष त्या नव्याने आलेल्या बदली माणसाकडे गेलं. त्याच्या चेहऱयावर नापसंतीच्या रेषा उमटल्या.
“ए! इधर आओ जरा” इमरान कडकला.
तो बिचारा बदली माणूस आला.
“क्या साली सुरत पायी है! दिन का गल्ला कितने का होता है?”
बदली माणसाने आकडा सांगितला.
“कल से रोज आने का और उतना पैसा मेरे आदमी से ले जाने का! सुरत नहीं दिखाना मुझे तेरी.” इमरानने निर्वाणीच्या सुरात सांगितलं.
“लेकीन साब, दुकान ऐसा महिनाभर के लिये बंद भी नहीं कर सकता ना!” अजिजीशिवाय त्या बदली माणसाच्या स्वराला दुसरा समानार्थी शब्द नव्हता.
“चल! मालिक को फोन लगा!”
त्या माणसाने फोन लावला. इमरानने त्याला काय सांगितलं माहीत नाही, पण बदली माणसाने दुकान पुन्हा बंद केलं.
“ए! सुन तेरे खाने-पीने का क्या है?” इमरान.
“इधर से जो मिलेगा उसमेसे ही…” बदली माणूस पुटपुटला.
“ठीक है! खाने पीने का पैसा मिल जायेगा!” म्हणून त्याने गल्ल्यातून त्याला पैसे काढून दिले.
“हो गया सब! अभी दिखने का नहीं वापस,” निर्वाणीच्या शब्दात इमरान म्हणाला. पुढे काय झालं माहीत नाही, पण आजही मी प्रयोगासाठी त्या शहरात गेलो की, इमरानच्या दुकानात जातो. कचोरी उत्कृष्ट असते, पण मला खात्री करून घ्यायची असते की, माझी ‘सूरत’ पसंत पडेल अशी आहे.
[email protected]






























































