शिर्डी लोकसभा मतदारसंघात मिंधे-भाजपमध्ये बेबनाव

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यात भाजप शिवसेना मिंध्ये गट राष्ट्रवादी काँग्रेस यांची युती असली तरी नगर जिल्ह्यातील शिर्डी लोकसभा मतदार संघात मात्र बेबनाव असल्याचे दिसून येत आहे. शिर्डी मतदारसंघातील विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांना उमेदवारी देऊ नये अशी जाहीर मागणी भाजपाचे किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अंकुश काळे यांनी मुख्यमंत्री यांना पाठवलेल्या एका प्रसिद्धीपत्रकाने केली आहे. त्यामुळे युतीमधील बेबनाव जनतेसमोर आला आहे.

अंकुश काळे यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, शिर्डी मतदार संघात सुमारे 800 गाव असून अतिवृष्टी झाल्यावर दुष्काळ पडल्यानंतर खासदार फिरकले देखील नाहीत. ते भाजपा तसेच शिवसेना यांच्या कार्यकर्त्यांच्या संपर्कात देखील नाहीत. फक्त ठेकेदारांच्या समवेत त्यांची सतत उठबस असते. नरेंद्र मोदी यांच्यावर विश्वास ठेवून व बाळासाहेब ठाकरे यांना मानणाऱ्या निष्ठावान शिवसैनिकांनी त्यांना दोन वेळेस संसदेमध्ये पाठवलेले आहे. मात्र दहा वर्षात मतदार संघात म्हणावा असा विकास झालेला नसल्याने मतदारांमध्ये प्रचंड नाराजी आहे. त्यांचे विरोधाकांशी साटेलोटे असून पुन्हा त्यांना उमेदवारी दिल्यास त्यांचा पराभव नक्की होऊ शकतो, पराभव टाळायचा असेल तर कुठल्याही किमतीत त्यांना पुन्हा उमेदवारी देऊ नये, असं या पत्रात म्हटले आहे.