कवडसे – उद्या पहाटे दुसऱ्या वाटा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> महेंद्र पाटील

कधीतरी एकदा वसंत ऋतूच्या दुपारी सहज भेटलो होतो आपण आणि ती भेट इतकी सहज होती की, त्या दुपारनंतर आपण पुन्हा कधी भेटू असे वाटले नाही मला आणि कदाचित तुलाही वाटलं नसेल, पण आपण त्याच संध्याकाळी पुन्हा एकदा भेटलो आणि एक नवा प्रवास सुरू झाला आपल्या ओळखीचा म्हणू या किंवा आपल्या मैत्रीचा. कारण हल्ली ओळख मैत्रीतून सुरू होते आणि मग ओळख गहिरी होत जाते हळूहळू. तसंच काहीसं आपलं झालं. मग आपल्या आवडीनिवडी समजून घेत आपण भेटू लागलो आणि जाऊ लागलो दूर दूर.

तो प्रवास आवडू लागला, त्या वाटा खुणावू लागल्या आपल्याला पुन: पुन्हा आणि रोज नवनवीन रस्ते शोधत आपण मनात येईल तिथे भटकू लागलो आणि प्रत्येक वळणावर एक नवी गोष्ट आपण लिहीत गेलो. प्रत्येक संध्याकाळी रोज नव्या आठवणी निर्माण होऊ लागल्या आपल्या मनात. त्या आठवणी मनातल्या मनात घेऊन आपण जगत राहिलो. ऋतूमागून ऋतू येत गेले. जसा वसंत येतो तसा ग्रीष्मसुद्धा आला आपल्या नात्यात आणि हळूहळू आपण कमी भेटू लागलो. समोर यायचेसुद्धा बंद झालो. भरधाव वेगाने सुरू झालेला आपला प्रवास अचानक एका वळणावर येऊन थांबला आणि मग हळूहळू जमेल तशा अचानक भेटी होऊ लागल्या. खूपदा ठरवूनसुद्धा पूर्वीसारखी आपली भेट झालीच नाहा. आपण त्या गोष्टीची उत्तरे शोधण्याचा प्रयत्नसुद्धा केला नाही कधीच. गरजसुद्धा वाटली नाही तशी. आपण हाकेच्या अंतरावर असूनही हाक मारली नाही कधीच आणि चुकून समोर येतो तसे चुकून कधी समोरसुद्धा आलो नाही. पण आपलं बोलणं मात्र सुरू होतं, फक्त भेट होत नव्हती.

या ऋतूत भेटू, त्या ऋतूत भेटू असे करता करता काही वर्षं सरली आणि तुझा जसा प्रवास सुरू होता तसा माझाही प्रवास सुरू होता. खूप वाट पहिली त्या क्षणांची. त्या वळणावर जेव्हा कधी मी प्रवास करतो तेव्हा जुन्या आठवणी हमखास आवर्जून भेटायला येतात आणि तुझी चौकशी करतात. तुलाही कधी त्या आठवणी भेटल्या असतील का? कधीतरी माझ्याबद्दल त्यांनी तुला विचारलं असेल का? तेच क्षण…तीच दुपार…तीच संध्याकाळ… पुन्हा एकदा तरी यावी असं तुझ्या मनाला वाटलं असेल कदाचित, पण तू कधी व्यक्त केलं नाहीस. सगळं काही मनातल्या मनात ठेवलंस.

यंदा पुन्हा वसंत आलाय आणि पुन्हा मी त्याच वळणावर एकाकी एकटा प्रवास करताना एक छान सुंदर वळण आलं. जिथे आता मन विसावू पाहतंय…आणि पुन्हा एक नवी पालवी फुटून एक नवा ऋतू येऊ पाहतोय माझ्या आयुष्यात. आपण ठरवलेली भेट…आपण पाहिलेली स्वप्नं…आपले राहिलेले अधुरे प्रवास आता काळाच्या गर्द डोहात गुडूप होतील… आणि नवे रस्ते, नव्या वाटा शोधत माझं मन हरवून जाईल. मात्र तू आता ते हरवलेले क्षण शोधत बसू नकोस. तूही आता नव्या वाटा शोध… किंवा जुन्या वाटेवर जाऊन जुन्या आठवणींचा जमाखर्च मांड. थोडं हळवं होऊन बघ. कदाचित गोष्ट समजेल तुला आपली. कदाचित चुका कळतील तुला तुझ्या. कदाचित एक वेडी हुरहुर सोडून जाशील तू या मावळतीच्या पारावर. मी आता या संध्याकाळ सावल्या पार करत एक नवा रस्ता शोधू पाहतोय… आणि मनात एकच ओळ घुमतेय आणि ती म्हणजे उद्या पहाटे दुसऱया वाटा…दुज्या गावचा वारा.