
दुसऱयाच दिवशी पहिल्या डावात द्विशतकी आघाडी घेतल्यामुळे मुंबईने 48 व्यांदा रणजी अंतिम फेरी खेळण्याची तयारी सुरू केली आहे. त्यातच तामीळनाडूविरुद्धचा उपांत्य सामना तिसऱया दिवशीच संपण्याची दाट शक्यता आहे. जर मुंबईने बीकेसीवरची उपांत्य लढतही जिंकली तर रणजी करंडकाचा अंतिम सामनाही मुंबईतच खेळवला जाऊ शकतो. त्यामुळे मुंबईतला अंतिम सामना पुन्हा बीकेसीवरच खेळविला जाण्याचे संकेत आताच मिळू लागले आहेत. याचाच अर्थ, महत्त्वाचे सामने स्टेडियमऐवजी क्लबच्या मैदानावर खेळविण्याचा नवा ट्रेंड मुंबई क्रिकेटपासून झालाय असे आपण म्हणू शकतो.
यंदाच्या मुंबईत आतापर्यंत चार सामने खेळले गेले असून बीकेसीवर खेळल्या गेलेल्या तिन्ही सामन्यांत दमदार-जोरदार कामगिरी केली आहे. त्यात एक सामना दहा विकेटस्नी, तर दुसरा सामना डावाने जिंकला होता. मग बडोद्याविरुद्धच्या उपांत्यपूर्व सामन्यात पहिल्या डावातील आघाडीच्या जोरावर उपांत्य सामन्यात धडक मारली होती. मात्र वानखेडेवर खेळला गेलेला एकमेव सामना मुंबईचे धुरंधर अनपेक्षितपणे 2 विकेटस्नी हरले होते. या पराभवाचा धक्का मुंबईचा संघ अद्यापही विसरू शकलेला नाही. या रणजी मोसमात मुंबई केवळ एकच सामना हरली आहे आणि तोसुद्धा वानखेडे स्टेडियमवरच. त्यामुळे मुंबईच्या रणजी संघात वानखेडेच्या खेळपट्टीबाबत भीती निर्माण झाली आहे की बीकेसीची खेळपट्टी विजयासाठी अधिक पोषक वाटू लागली आहे, असा प्रश्न मुंबईकर क्रिकेटप्रेमींच्या मनात निर्माण झाला आहे.
बीकेसीवर रणजी सामन्यादरम्यान सामान्य प्रेक्षकांची बसण्याची कोणतीही व्यवस्था नाही; मात्र आता सुरू असलेल्या सामन्यात मुंबई क्रिकेट संघटनेने 500 प्रेक्षकांना बसण्याची व्यवस्था केली आहे. तसेच प्रेक्षकांची गर्दी वाढली तर त्यांनाही सामना पाहण्याची व्यवस्था एमसीएकडून केली जाणार आहे. त्यामुळे मुंबईचा संघ अंतिम सामन्यात पोहोचला तर तो वानखेडेच्या खेळपट्टीच्या भीतीपोटी पुन्हा एकदा आसनशून्य बीकेसीलाच आपली पसंती देणार हे स्पष्ट आहे. परिणामतः मुंबईकर क्रिकेटप्रेमींना रणजीचा अंतिम सामना वानखेडे नव्हे, तर बीकेसीवरच पाहावा लागू शकतो. फक्त अंतिम सामन्याच्या पेंद्रात काही बदल झाल्यास मुंबईचा सामना इंदूर किंवा नागपूर येथेही खेळविला जाऊ शकतो.




























































