अजित पवारांनी पक्ष चोरला तेव्हापासून ईडीने जोर धरला, निवडणुकीच्या तोंडावर मला अटक होऊ शकते

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अजित पवार यांनी पक्ष चोरलाय तेव्हापासून ईडीने जोर धरलाय, असा टोला आज राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी लगावला. प्रचारासाठी लोकांपर्यंत पोहोचू नये यासाठी निवडणुकीच्या तोंडावर आपल्याला जेलमध्ये टाकण्याची तयारी सुरू आहे, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली.

रोहित पवार यांच्या बारामती अॅग्रोने खरेदी केलेल्या संभाजीनगरातील कन्नड सहकारी साखर कारखान्यावर दोन दिवसांपूर्वी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) कारवाई केली. याबाबत माहिती देण्यासाठी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ईडीने या कारवाईची माहिती ट्विटद्वारे दिली, मात्र अद्याप याबाबत प्रत्यक्षरीत्या माझ्याकडे कागदपत्रे आलेली नाहीत असे सांगतानाच कागदपत्रे मिळाल्यानंतर कोर्टात जाण्याची तयारी केली असल्याचे रोहित पवार यांनी सांगितले.

युवा संघर्ष यात्रेला राज्यभरातील नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद लाभला तेव्हाच नोटीस येईल, असा अंदाज होता. कन्नड कारखान्यात काहीही गैरव्यवहार नसून केवळ इलेक्शनच्या तोंडावर केलेली ही कारवाई आहे, असे रोहित पवार म्हणाले. 2009 साली कन्नड कारखाना विकण्याची नोटीस होती. 32 कोटी रुपयांत ते विकणार होते. मात्र खरेदीदार न मिळाल्याने दुसऱया जाहिरातीत 45 कोटी रक्कम झाली. त्यानंतर बारामती अॅग्रोने 5 कोटी अतिरिक्त टाकून 50 कोटींना हा कारखाना खरेदी केला, अशी माहिती रोहित पवार यांनी दिली.

माझ्याकडेही सत्ताधाऱयांच्या अनेक फायली

सत्ताधाऱयांच्याही अनेक फायली माझ्याकडे असल्याचा दावा रोहित पवार यांनी केला. अज्ञात व्यक्तीने या फायली आपल्या ऑफिसला पाठवल्या, त्यात भाजपच्या दोन ओबीसी नेत्यांच्या फायली आहेत तसेच अजितदादा आणि शिंदे गटाच्या नेत्यांच्याही फायलींचा समावेश आहे, असे रोहित पवार म्हणाले. सरकारच्या अॅम्ब्युलन्स घोटाळ्याच्याही फायली माझ्याकडे आल्याचे त्यांनी सांगितले.

– हेराफेरी करायची असती तर 32 कोटी रक्कम असतानाच हा कारखाना विकत घेतला असता. आमच्या कष्टाच्या पैशाने कारखाना विकत घेतला आहे. त्यामुळे कारवाई कोर्टात टिकू शकणार नाही, असा विश्वासही रोहित पवार यांनी व्यक्त केला. जरंडेश्वर साखर कारखान्यालाही नोटीस आली होती, पण अजित पवार सत्तेत गेल्याने त्यांच्यावर त्या प्रकरणी कारवाई झालेली नाही, अशी टीकाही त्यांनी केली.