अजित पवार गटाला मोठा हादरा, निलेश लंके यांची आज राष्ट्रवादीमध्ये ‘घरवापसी’ होणार?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लोकसभा निवडणुकीआधी अजित पवार गटाला मोठा हादरा बसला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील आमदार निलेश लंके यांनी पुन्हा एकदा शरद पवारांसोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवारी सकाळी शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये निलेश लंके यांची राष्ट्रवादीत घरवापसी होणार असल्याचे वृत्त माध्यमांनी दिले आहे.

अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही नेत्यांनी गेल्या वर्षी जून महिन्यात वेगळा मार्ग स्वीकारला आणि ते शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाले. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार आणि शरद पवार असे दोन गट पडले. या फुटीवेळी आमदार निलेश लंके यांनी अजित पवार यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला होता. मात्र आता नऊ महिन्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा घरवापसीचा निर्णय घेतला आहे.

दरम्यान, निलेश लंके यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून लोकसभेचे तिकीट मिळण्याची शक्यता आहे. नगर मतदारसंघातून त्यांना सुजय विखे-पाटील यांच्याविरोधात उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच शिरूर मतदारसंघाचे खासदार अमोल कोल्हे यांनी निलेश लंके यांना तुतारी हाती घेण्याचे आवाहन केले होते. त्यावेळी लंके यांनीही याचा विचार करू असे म्हटले होते आणि आता ते पुन्हा घरवापसी करणार असल्याचे वृत्त आहे.