
मोदी सरकारने शेतकऱ्यांना देशोधडीला लावणारे तीन काळे कायदे 27 सप्टेंबर 2020 रोजी आणले होते परंतु शेतकऱ्यांच्या तीव्र आंदोलनापुढे त्यांना झुकावे लागले आणि अखेर ते तीन काळे कायदे वापस घ्यावे लागले. यासाठी 15 महिन्यांचे आंदोलन व 700 शेतकऱ्यांना बलिदान द्यावे लागले आणि 19 नोव्हेंबर 2021 रोजी हरित क्रांतीच्या प्रणेत्या दिवंगत पंतप्रधान इंदिराजी गांधी यांच्या जन्मदिनी मोदींना मजबुरीने काळे कायदे वापस घ्यावे लागले. तीन वर्षानंतर पुन्हा शेतकऱ्यांना आंदोलन करावे लागत आहे, हे आंदोलनही दडपण्याचा प्रयत्न झाला. मोदी सरकारने वारंवार शेतकऱ्यांचा अपमान केला आहे. मोदी सरकारची एकच निती आहे, चंदादात्याचा सन्मान व अन्नदात्याचा अपमान, असा हल्लाबोल अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या मीडिया विभागाचे प्रभारी जयराम रमेश यांनी केला.
नाशिक जिल्ह्यातील ओझर येथे पत्रकार परिषदेशाला संबोधित करताना जयराम रमेश म्हणाले की, शेतकऱ्यांचे आंदोलन दडपून टाकण्यासाठी त्यांच्यावर अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या, गोळीबार केला, राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली कारवाई करण्याची धमकी दिली पण पुन्हा एकदा मोदी सरकारला झुकावे लागले आणि दिल्लीच्या रामलीला मैदानावर शेतकरी आंदोलन सुरु झाले तर आजच चांदवडमध्ये महाविकास आघाडीचा शेतकरी मेळावाही पार पडला. भारत जोडो न्याय यात्रेत राहुल गांधी यांनी शेतकऱ्यांना पाच गॅरंटी दिल्या आहेत. काँग्रेसचे सरकार सत्तेत आल्यानंतर डॉ. स्वामीनाथन समितीच्या शिफारशीनुसार एमएसपीचा कायदा करणार, शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार, आयात निर्यात धोरण शेतकरी हिताचे करणार, पिक विमा योजनेची पुनर्रचना करणार व शेतकऱ्यांना जीएसटीतून वगळणार.
दरम्यान, भारत जोडो न्याय यात्रा गुरुवारी सकाळी मालेगाव येथून सुरु झाली त्यानंतर चांदवडमध्ये शेतकरी मेळावा झाला. ओझर येथे यात्रेचे स्वागत करण्यात आले, दुपारच्या विश्रातीनंतर नाशिकच्या द्वारका चौकातून यात्रा पुन्हा सुरु झाली व इंदिरा गांधी चौकात जनतेला संबोधित करुन राहुल गांधींनी त्र्यंबकेश्वराचे दर्शन घेतले. यात्रेचा मुक्काम मोखाडा येथे होईल.


























































