
गतवर्षी झालेल्या आयसीसी वन डे वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाची कामगिरी दमदार राहिली. मात्र या कामगिरीला वर्ल्डकपचा साज चढला नाही. फायनलमध्ये पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखालील ऑस्ट्रेलियन संघाने टीम इंडियाचा पराभव केला. त्यामुळे कोट्यवधी क्रीडाप्रेमींचे डोळे पाणावले. अर्थात या स्पर्धेनंतर टीम इंडियाने विजयांची मालिका राखली असली तरी फायनलमधील पराभव आजही काट्यासारखा बोचतोय. आता याबाबत माजी खेळाडू मोहम्मद कैफ याने मोठा गौप्यस्फोट केला असून फायनलमधील पराभवास कर्णधार रोहित शर्मा आणि मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांना जबाबदार धरले आहे.
लल्लनटॉपला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये मोहम्मद कैफ याने वर्ल्डकपच्या फायनलसाठी निवडण्यात आलेल्या खेळपट्टी संदर्भात विधान केले. तो म्हणाला, मी तिथे तीन दिवस होतो आणि तिथून मी अनेक लाईव्ह शो केले. रोहित शर्मा आणि राहुल द्रविड सायंकाळच्या वेळी तिथे आले, खेळपट्टीवर फिरले, अंदाज घेतला. दोघांमध्ये या संदर्भात चर्चाही झाली. ते अर्धा-एक तास तिथे होते. दुसऱ्या दिवशी आले आणि पुन्हा खेळपट्टीचा अंदाज घेतला. तिसऱ्या दिवशीही हेच घडले.
तो पुढे म्हणाला की, मी खेळपट्टीचा रंग बदलताना पाहिला. खेळपट्टीवर गवत कमी होते आणि पाणीही कमी मारले जात होते. घरच्या परिस्थितीचा फायदा उठवण्यासाठी दोघांनी खेळपट्टी संथ केली आणि हा डाव आपल्यावरच उलटा पडला. जर तुम्ही वारंवार खेळपट्टी पहात असाल तर तुम्हाला हा बदल कळायला हवा होता आणि तुम्ही क्यूरेटरशी संवाद साधायला हवा होता.


























































